बाबासाहेबांचे राजकीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान मोठे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

प्रसिध्द नाटककार प्रा.दत्ता भगत यांचे प्रतिपादन


जळगाव : 
 
1930 मध्ये झालेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला स्वतंत्र राज्यघटना हवी आणि मतदानापासून वंचित असणार्‍या वर्गांना मतदानाचा हक्क हवा अशी ठाम भूमिका मांडली व इंग्रज मंत्री परिषदेने या भूमिकेला सहमती दर्शवली.
 
यावरुन बाबासाहेबांचे राजकीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान किती मोठे होते याची कल्पना येते, असे प्रतिपादन प्रसिध्द नाटककार प्रा.दत्ता भगत यांनी केले.
 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विचारधारा प्रशाळेच्यावतीने महात्मा फुले पुण्यतिथी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त गुरुवारी विद्यापीठात प्रा.भगत यांचे ‘राजकीय स्वातंत्र्य चळवळीत बाबासाहेबांचे योगदान’ या विषयावर व्याख्यान झाले.
 
 
अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.जे.बी.नाईक उपस्थित होते.
 
 
प्रा.भगत म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर हे समाज सुधारक होते. त्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध काय ? असा प्रश्न विचारला जातो. हा प्रश्न अज्ञानातून विचारला जातो. बाबासाहेबांनी सातत्याने राजकारणाविषयी मांडणी केली आहे.
 
 
राजकारण आणि धर्म ही रथाची दोन चाके आहेत असे सांगणारे बाबासाहेब धर्मविरोधी नव्हते. केवळ जे तुरुंगात गेले, स्वातंत्र्य लढयात मृत्यूमुखी पडले, जखमी झाले त्यांचीच नावे स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीबाबत घेतली जातात.
 
 
वास्तविक बाबासाहेबांनी स्वातंत्र्याविषयीचे मूलभूत चिंतन केले होते. पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील मोठे नेते उपस्थित नसताना बाबासाहेबांनी स्वतंत्र राज्यघटना आणि मतदानाचा सर्वांना हक्क याबद्दलची मागणी मान्य करुन घेतली.
 
 
त्यानंतर महात्मा गांधी आणि बाबासाहेब यांची भेट झाली. गुलामीचे ओझे उतरवून फेकणार्‍या बाबासाहेबांना राजकीय चळवळीतील महत्त्वाचा नेता मानले जाणार नसेल तर ते करंटेपण ठरेल असेही प्रा.दत्ता भगत म्हणाले.
 
 
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे जाती-धर्माच्या पलिकडे बघितले जावे अशी अपेक्षा व्यक्त करुन संशोधकांनी या महापुरुषांच्या दुर्लक्षित झालेल्या पैलूंवर संशोधन करावे, असे मत व्यक्त केले.
 
 
सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ.सुनील पाटील यांनी केले. विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक डॉ.अनिल डोंगरे यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@