ब्राह्मण आणि इतर समाज

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

 
 
 
 
तरोडा या माझ्या गावी संत केजाजी महाराज यांच्या पुण्यतिथीचा फार मोठा सोहळा साजरा होत असतो. माघ शुद्ध प्रतिपदेला गोपालकाला व महाप्रसाद असतो. त्याच्या सात दिवस आधीपासून नामसंकीर्तन सप्ताह सुरू होतो. सर्व गाव या सप्ताहात सहभागी होत असते. शेवटच्या दिवशीचा महाप्रसाद तर वैशिष्ट्यपूर्ण असतो. 3500 लोकसंख्येच्या आमच्या या गावात त्या दिवशी सुमारे दहा हजार लोक महाप्रसाद ग्रहण करतात. तरोड्याचा कार्यक्रम पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मी सांगतो आहे ती घटना 90च्या दशकातील आहे. महाप्रसादासाठी लोकांच्या पंक्ती बसल्या होत्या. पत्रावळीवगैरे देऊन झाल्या होत्या. आता अन्न वाढणे सुरू करायचे म्हणून वाढणार्यांनी हातात बादल्या, वाटे वगैरे घेतले. काही मिनिटांतच मंडपात हलकल्लोळ झाला. दहा-पंधरा जण जागेवर उठून उभे झाले आणि मोठमोठ्या आवाजात बोलू लागले. झाले असे होते की, वाढणार्यांमध्ये काही मुले बौद्ध, चांभार, मांग समाजातील होती. या मुलांना कसा काय महाप्रसाद वाटण्यास दिला? त्यांचे हातचे आम्ही खाणार नाही! असे या गोंधळ करणार्या लोकांचे म्हणणे होते. आमच्या गावात बजरंग दलाचे जबरदस्त कार्य होते. 25-30 तरुणांचा एकरस, शक्तिसंपन्न व सदासिद्ध गट तयार झाला होता. कुठल्याही सामाजिक कामात बजरंग दलाचे बजरंगी तत्परतेने सहभागी होत असत. या महाप्रसादाच्या कार्यक्रमातही ही तरुण मंडळी सहभागी होतीच. या बजरंगींमध्ये समाजाच्या सर्व जातींची मुले होती. या गोंधळामुळे बजरंग दलातील कथित अस्पृश्य मुले गांगरून गेलीत. त्यांनी हातात घेतलेल्या बादल्या व वाटे खाली ठेवून दिले.
 
 
एका कोपर्यात उभे राहून ही मुले हा गोंधळ मूकपणे बघत होती. आम्ही देवस्थानचे कमेटी सदस्य बाजूच्याच घरी (जिथे देवस्थानचे तात्पुरते कार्यालय थाटले होते) होतो. थोड्याच वेळात, हे गोंधळ घालणारे दहा-पंधरा जण, वाढणारे आणि इतर गावकरी मोठमोठ्याने ओरडत, आमच्याकडे आले. वाढणार्यांबद्दल आक्षेप असणार्यांनी आपली बाजू मांडली आणि मला म्हणाले, ‘‘आता तुम्हीच सांगा? हे बरोबर आहे का?’’ मी म्हणालो, ‘‘आपल्याला असा भेदभाव करता येणार नाही.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुम्हीच तर आम्हाला हे सांगितले आहे!’’ (म्हणजे तुमच्या पूर्वजांनी, असे त्यांना म्हणायचे होते.) मी ठामपणे म्हणालो, ‘‘आमच्या पूर्वजांनी सांगितले म्हणून तुम्ही ते पाळत होते ना! आता त्यांचाच वंशज (म्हणजे मी) तुम्हाला सांगत आहे की, हा भेदभाव ठेवायचा नाही. मी कुठल्याही वाढणार्याला वाढू नको म्हणून सांगणार नाही.’’ माझा हा निर्णय ऐकताच वाढणार्यांनी हर्षध्वनी केला आणि त्या मुलांना म्हणाले, चला रे वाढायला! आणि ते वाढण्यास निघून गेले. हे जे दहा-पंधरा जण होते, ते म्हणाले की, तुम्ही काहीही सांगितले तरी आम्ही इथे जेवणार नाही. असे म्हणून ते निघून गेले. हे सर्व घडेपर्यंत आम्ही सर्व कार्यकर्ते प्रचंड तणावातच होतो. मी माझ्या एका सहकार्याला म्हटले, ‘‘रामराव, हे जे कुणी न जेवता घरी गेले आहेत, त्यांच्याकडे अन्न पोहचवून दे. गावात महाप्रसाद असताना त्यांच्या घरी चुली पेटणे योग्य नाही.’’ या अडथळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम शांतपणे पार पडला. हे सर्व झाल्यावर मी शांतपणे विचार करू लागलो. त्यांनी जे म्हटले की, शिवाशिव पाळा हे तुमच्या पूर्वजांनीच आम्हाला सांगितले, ते खोटे होते का? ब्राह्मणांनी शिवाशिव पाळा असे सांगितले असेल िंकवा ही माणसे खोटे बोलत असतील. यापैकी एकच सत्य असू शकते.
 
 
हे सर्व आठवायचे कारण म्हणजे, आरक्षणावरून सध्या ब्राह्मण समाजात खूप अस्वस्थता आहे. अनुसूचित जाती/जमातींना तसेच इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) आरक्षण दिले, तेव्हा ब्राह्मण समाज इतका अस्वस्थ नव्हता, जितका मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर आहे. वेगवेगळ्या चर्चा, लेख, वाद सुरू झाले आहे. आपल्या भारतीय समाजरचनेत ब्राह्मणांचे काय स्थान आहे, हे समजून न घेताच या बहुतेक चर्चा आणि वाद सुरू आहेत, असे वाटते.
चातुर्वण्य रचनेत ब्राह्मण वर्णाला सर्वोच्च स्थान देण्यात आले. परंतु, त्याच्यावर काही मर्यादाही घालण्यात आल्या. ब्राह्मण सदासर्वदा समाजावर अवलंबून राहील अशी व्यवस्था करण्यात आली. तो निष्कांचन राहील. सदासर्वदा अध्ययन व अध्यापन कार्यात असेल. नित्यनेम, व्रतवैकल्ये तसेच खाण्यापिण्याची बंधने याबाबतीत बाकी वर्णांना जी मोकळीक आहे, ती ब्राह्मणाला नाही. आजचा ब्राह्मण तसा आहे का?
 
 
दुसरी एक घटना सांगण्याचा मोह आवरत नाही. ती देखील आमच्या गावातीलच आहे. माझा एक मित्र, जो ब्राह्मण होता, सर्व व्यसनात पारंगत होता. दारू आणि मांसाहार तर दररोजचेच ठरले होते. बरेचदा तो रस्त्यावर झिंगलेल्या अवस्थेत पडून असायचा. लोक त्याला घरी घेऊन यायचे. त्याच्यात काही सुधारणा व्हावी म्हणून एकदा मी व माझ्या भावाने त्याला त्या भागातील एका प्रसिद्ध हनुमान मंदिरात नेले. शपथ घ्यायला लावली. पण त्याने काही फायदा झाला नाही. पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरू झाले. त्याचे व्यसनाचे हे प्रमाण खूपच वाढले तेव्हा गावातील काही वयस्कर व मान्यवर मंडळी माझ्याकडे आली. तुमच्या त्या मित्राला काही समजावून सांगा म्हणाली. मी थोडे तिरसटपणे त्यांना म्हणालो, ‘‘दारू, मटन वगैरे काय तुम्हीच खायचे का? त्याचा आनंद एक ब्राह्मण घेत असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? तो तुमच्या पैशाने खात-पित नाही ना!’’ माझ्या या हल्ल्याने ते हबकले. थोड्या वेळाने एक जण म्हणाला, ‘‘मग आम्ही कुणाकडे पाहायचे?’’ मी म्हणालो, ‘‘म्हणजे काय?’’ तो म्हणाला, ‘‘अहो, आम्ही ब्राह्मणांकडे खूप आशेने बघत असतो. घरच्या लोकांना नेहमी सांगत असतो- बघा जरा ब्राह्मणांकडे! त्यांची मुले आपापसात भांडत नाही. सुनांची भांडणे रस्त्यावर येत नाही. ते दारू पीत नाहीत, मटन वगैरे खात नाहीत. त्यांच्यासारखे बना थोडेतरी... आता त्यांना असे सांगितले तर ते या तुमच्या मित्राकडे बोट दाखवून आमचे तोंड बंद करतात.
 
 
आम्ही तुमच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. तुम्हीच जर असे वागायला लागतात तर आम्ही कुणाकडे बघावे?’’ मी सुन्न झालो. मी शहरात जन्मलो, शिकलो असल्यामुळे जे सामाजिक वातावरण मला लाभले होते त्यामुळे, आपण ब्राह्मण असल्याची हीन भावना मनात निर्माण झाली होती. परंतु, इथे खेडेगावात बघतो तर, हा बहुजन समाज (त्यात बौद्धही होते) ब्राह्मणांकडे समाजाचा आदर्श म्हणून बघत होता आणि ब्राह्मण समाजाने समाजाचा आदर्श म्हणून कायम राहावे, असा आग्रह धरत होता. बहुजन समाजाच्या या अपेक्षेवर आजचा ब्राह्मण समाज किती टक्के उत्तीर्ण होईल, असा प्रश्न माझ्या मनात आला व तो आजही आहे.
 
 
 
ब्राह्मण समाजावर अनेक वर्षांपासून हल्ले होत आहेत. ब्राह्मण व ब्राह्मणेतर यांच्यात संघर्ष पेटावा म्हणून सतत प्रयत्न सुरू असतात. ब्राह्मण समाजाविरुद्ध इतर समाजामध्ये विषपेरणी सुरू असते. असे असतानाही, या समाजामध्ये ब्राह्मण समाजाबाबत इतकी आदराची भावना अजूनही कशी काय शिल्लक राहिली, याचे मला आश्चर्य वाटत असते.
समाजाच्या आचारविचारांच्या विधिनिषेधाचे वैचारिक नेतृत्व पूर्वीपासून ब्राह्मण समाजाकडे सोपविले असताना, तसेच समाजातील इतरांनी ब्राह्मणांकडे आदर्श म्हणून बघावे, अशी शिकवण दिली असताना, ब्राह्मण समाजाने आपले आचरण कसे ठेवले पाहिजे, याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि हे आरक्षणापेक्षा अधिक महत्त्वाचे व मोलाचे आहे, असे मला वाटते.
 
 
ब्राह्मण समाजाकडून काही सामाजिक चुका झाल्या असतील/नसतील. त्याचे परिणाम भोगावेच लागणार. ते भोगत ब्राह्मण समाज पुढे जात आहे. नवनव्या क्षेत्रात यशाची शिखरे काबीज करत आहे. असे कुठलेही क्षेत्र उरले नसेल की जिथे त्याने आपले पदचिन्ह उमटवले नाही. ज्या ज्या वेळी ब्राह्मण समाजाला संधी नाकारण्यात आल्या, त्या त्या वेळी ब्राह्मण समाजाने त्याचे ‘सोने’ केले. हे सर्व करत असताना, समाजाच्या आदरस्थानी आपल्याला राहायचे आहे, ती आपली जबाबदारी आहे, याचे भान ठेवून या समाजाने तदनुसार आचारविचार ठेवला तर काय हरकत आहे?
@@AUTHORINFO_V1@@