आर्टिफिशियल इंटेलिजन्स... आभासी दुनियेचे वास्तव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |

राज्यनाट्य स्पर्धा : समीक्षण

 
जळगाव : 
 
राज्य नाट्य स्पर्धेत गुरूवारी उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ आयोजित, राहुल बनसोडे लिखीत आणि अनिल कोष्टी दिग्दर्शित ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ ही नाट्यकृती सादर करण्यात आली.
 
आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर जग घरात आलेय अशी आज स्थिती निर्माण झालीय. याच बळावर मनुष्य प्रगती करीत असतानाच त्याच्यात आशावाद, निराशावाद आणि निष्पत्तीवादही जोपासला जात आहे.
 
त्याला पडणार्‍या असंख्य प्रश्नांची उत्तरे तो हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून शोधू पाहतोय. मात्र त्यात माणूस वाचणे विसरतोय. या नेटवर्कच्या ओढीत तो कुटुंबाला, आपल्या माणसांना कमी वेळ देऊन जास्तीत -जास्त वेळ फेसबुक, व्हाट्स अ‍ॅप, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाचे अ‍ॅप वापरून स्वतःला अपडेट करून घेत आहे.
 
स्वतःला असा अपडेट करून घेत असतानाच त्यात त्याच्याही नकळत अडकत जाऊन स्वतःची अधोगती करून घेतोय. अशी आजच्या समाजाला विळखा घालणार्‍या ज्वलंत समस्येवर या नाटकाची संहिता आधारलेली होती.
 
सॉफ्टवेअर युजर, सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, मेसेंजर, फेक अकाउंट, अ‍ॅप, अप्लिकेशन या माध्यमांचा कलात्मक वापर करून आजच्या समाजातील तरुण पिढीचे सोशल मीडियातील गुरफटणे मांडण्याचा एक प्रयत्न या नाटकाद्वारे होता.
 
या अ‍ॅप्समुळे कोवळी तरुण पिढीच नव्हे तर विवाहित जोडपे, वयस्क आई-वडील असलेले दोन भिन्न व्यक्तीतील शेकडो मैल दूर असूनही चॅटिंग, पोस्ट शेअरिंग, लाईक, व्हिडीओज, नंतर पर्सनल फोटोज शेअरिंग इ. मार्फत आकर्षण शक्ती वाढत जाऊन आपण प्रेमात आहोत असे दावा करतात.
 
या गर्दीच्या आभासी जगात प्रेमाच्या एका नव्या अवकाशात उडाण घेतात. विविध इमोशनसाठी स्मायलीची मुक्त उधळण करीत असतानाच कालांतराने एकमेकांचाच वीट येऊन डॉमिनेटही करायला लागतात आणि कंटाळून सर्व फेक अकाउंट, अ‍ॅप बंद करून आपल्या स्वतःच्या दुनियेत येऊ पाहतात.
 

 
 
अशी इंटरनेटच्या नशेत ंअडकलेली साधी सोपी मात्र तरुणाईला त्यातून बाहेर पड म्हणणारी अत्यंत गरजेची शिकवण देऊन जाणारी आजची संहिता होती.
 
या नाटकाला फॅन्टसीकडे नेण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न होता. अ‍ॅपवर वापरल्या जाणार्‍या जाहिराती, अकाउंट यांच्यामार्फत आवाका वाढवण्याचा प्रयत्न होता..नाटकाला रचना महाजन यांचे नेपथ्य, प्रथमेश जोशी यांची प्रकाश योजना संजय चव्हाण यांची रंगभूषा, श्रीकांत कुलकर्णी यांची वेशभूषा, नयन पवार यांचे संगीत पूरक असे असले तरी संगीताची जादू खूप उशिरा ऐकायला मिळाली.
 
रेकॉर्डेड साउंड खूपच कमी आवाजात ऐकू येत होता. त्यातही काही कलाकारांचे मुळात आवाज कमी तीव्रतेचे होते. शिवाय ‘सेंथील’ची भूमिका साकारणार्‍या अनिल कोष्टी यांच्या वेगवान संवादफेकीमुळे कान टवकारून नाटक ऐकावे लागले.
 
 
मशीन अपडेट करता येतात, अ‍ॅप डाऊनलोड करता येतात मात्र माणसे, नाती नाही डाऊनलोड करता येत. आधुनिक इन्स्ट्रुमेंटवरील आकर्षण कधीच प्रेम नाही बनू शकत.
 
विवाहबाह्य नात्यांची स्टोरी अकाउंट बनू शकते, अ‍ॅप्लिकेशनचा तो एक एक्सपिरिमेंट होऊ शकतो मात्र त्यात सुख मिळत नाही. तेथे फक्त समस्याच वाढतात.
 
या नात्यांचे सिलसिले वाढतात, मात्र मंजिले नाही- असा संदेश देणारा हा नाट्यप्रयोग काहीसा डोईजड होता. त्याला सोपा करून सादर केले असते तर नाटक अधिक भावले असते. नाटकास भावी निकालासाठी शुभेच्छा.
@@AUTHORINFO_V1@@