बाबासाहेबांच्या विचारांतून मिळाली उद्योगउर्जा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 


माझा जन्म १९७० साली नागपूरला झाला. माझे वडील आरबीआयमध्ये सर्व्हिस करायचे. त्यामुळे बालपण मजेत आणि व्यवस्थित शिक्षण घेण्यात गेले. पण, लहानपणापासूनच घरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना प्रमाण मानले जायचे. त्यातच मोठे वडील रिपब्लिकन पक्षात विधानसभेच्या अध्यक्षपदी असल्यामुळे आंबेडकरी विचारांच्या चळवळीमध्ये आमच्या सर्व कुटुंबाचा सहभाग असायचा.

 

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आमच्या कुटुंबातील थोरामोठ्यांनी मनावर घेतलेले. त्यामुळे घरी शिक्षणाला प्राधान्य. तसेच आम्ही जिथे राहतो ते नागपूर हे तर आंबेडकरी विचारधारेचे पवित्र स्थान. इथेच तर बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्याचा प्रभाव आम्हा नागपूरकरांवर प्रचंड आहे. बाबासाहेबांची कर्मभूमी असलेल्या नागपूरचे वातावरणच वेगळे. धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेले विचार प्रत्यक्ष जगावे यासाठीच आमचा प्रयत्न असे. त्यातूनच की काय, बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पाळण्याचा आम्ही लहानपणापासूनच प्रयत्न करत असू. नव्हे तसे घरातून संस्कारच होते. आधीच सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी दिलेला, “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा,” हा विचार आमच्या घरात रूजलेला. त्यामुळे घरी शिक्षणाला महत्त्व फार होते. वडिलांना जरा उसंत भेटली की, ते बाबासाहेबांचे विचार आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, ”बाबासाहेबांनी आपण माणसात यावे म्हणून कष्ट केले, यातना भोगल्या. समाजाला कायद्याने माणूसपण मिळण्यासाठी किती कष्टाने संविधान लिहिले. बाबासाहेबांना स्वतःच्या गुणवत्तेवर विधी मंत्रालय मिळाले व त्यांनी त्याचे सोने केले. ते सोने आयुष्यभराचं अमृत बनून आपल्या समाजाला मिळाले आहे. बाबासाहेब शिक्षणाला इतके महत्त्व द्यायचे की, २४ तासांतून १८ तास अभ्यास करायचे.”

 

पुढे ग्रॅज्युएशन करत असताना माझे वडील आजाराने ग्रस्त झाले. त्यामुळे घरची आर्थिक स्थिती बिघडली. मग मी नागपूरच्या कंपनीमध्ये नोकरी केली. तिथे मी माझ्या कामात शंभर टक्के निष्ठेने काम करत असे. दिलेले काम वेळेवर आणि अगदी योग्य गुणवत्तेमध्ये पूर्ण झालेच पाहिजे, यावर माझा कटाक्ष असे. २००० साली मी त्या कंपनीचे दहा वर्षांचे Sale Tax Audit झपाट्याने करत होतो. माझ्या कामाचा वेग आणि अचूकता यामुळे कंपनीच्या मालकाला खात्री पटली की, मी हे काम वेळेआधी पूर्ण करेन. त्यामुळे त्या कंपनीच्या मालकाने संपूर्ण स्टाफ माझ्या हाताखाली दिला व त्यामुळे १५ दिवसांत पूर्ण ग्रुपचे ऑडिट पूर्ण करू शकलो. हे काम करताना मला अनेक अनुभव आले. छोट्या छोट्या गोष्टी, बारकावे मला कळले. त्यामुळे पुढे आत्मविश्वास आला की, कोणतेही काम कितीही मोठे असले तरी त्याचा सांगोपांग अभ्यास, नियोजन, प्रामाणिक मेहनत करून त्या कामाला आपण न्याय देऊ शकतो. त्यामुळे कोणतेही कठीण काम पूर्ण करण्याचे आवाहन घेण्यात मला मौज वाटू लागली. आव्हानात्मक काम योग्य रीतीने करत असल्यामुळे माझे नाव झाले. त्याचा फायदा हा झाला की, मी ती कंपनी सोडली तरी पुढच्या आयुष्यात कंपनीने मला काम मिळावे म्हणून सहकार्य केले. माझ्यासाठी ही मोठी गोष्ट आहे. मी ज्या कंपनीमध्ये काम करायचो त्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या मोठ्या अधिकार्‍यांशी ओळख झाली. कामाच्या गुणवत्तेेसंबंधी कोणतीही तडजोड न करण्याच्या वृत्तीमुळे त्यांचा आणि माझा स्नेह जमला. गुणवत्तापूर्ण काम वेळेआधी पूर्ण करू शकतो म्हणून मग त्यांच्या ओळखीच्या कितीतरी लोकांची कामे ते मला देऊ लागले. भारतभर काम करण्याची संधी मला मिळाली. मी २५० उद्योगांकरिता Subsidy Consultant म्हणून काम केले. या उद्योजकांच्या यशामध्ये खारीचा वाटा म्हणून सहभागी होताना मला समाधान वाटते. २०१५ साली मला TCS ची एक IRM² Infrastructure ची ऑफर दिली. त्यासाठी मी IFCI Venture Capital for SC ला लोनसाठी अर्ज केला. पुढे त्या माध्यमातून मी माझे टीसीएस केंद्र बनवू शकलो.आज मागे वळून पाहताना वाटते की, हे सगळे शक्य झाले ते लहानपणापासूनच बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला म्हणून. त्या महामानवाला माझे कोटी कोटी प्रणाम!

 
 

- विजय सोमकुंवर

 
@@AUTHORINFO_V1@@