परिस्थितीवर विजय मिळवणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |


धारावीला माझा बॅग्स, भेटवस्तू बनवण्याचा कारखाना आहे. ६०० मशीन्स आहेत आणि १५० कॉर्पोरेट कार्यालयांशी माझा व्यवसाय सुरू आहे. उद्योगाचा हा वृक्ष रूजवला तरी कसा केवळ आणि केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून. त्यांनी परिस्थितीला शरण न जाता परिस्थितीवर विजय मिळवला. त्यांच्या जीवनातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. त्या प्रेरणेतूनच मी काहीतरी करू शकलो. मी काही ठरवून उद्योगपती किंवा व्यावसायिक झालो नाही. चिरा बाजार मरिन लाईन्सच्या चाळीत आमचे कांबळे कुटुंब राहायचे. जगन्नाथ हे माझे वडील आणि शोभा ही माझी आई. आम्ही एकूण चार भावंडं. त्यातला मी सर्वात लहान.

 

वडील कापडी पिशव्या शिवण्याची ऑर्डर घेत. कापडी पाऊचही बनवत. घरात दोन शिलाई मशीन्स आणि दोन कामगार. बाबा आणि आम्ही चारही भावंडं हे काम करीत असू. चौथीला असल्यापासून मी घरच्या व्यवसायात वरवरचे काही काम करायचो. एकदिवशी बाबांना मोठी ऑर्डर मिळाली. पाच हजार कापडी पाऊचची. काही दशकांपूर्वी चाळीस हजार रुपयांचे काम एकहाती मिळणे सोपे नव्हते. पण, ती ऑर्डर मिळाली होती. आम्ही ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक केले. ऑर्डर पूर्ण झाली, पण ऑर्डर देणारा माणूस पाच हजार कापडी पिशव्या घ्यायला आलाच नाही. त्या पिशव्या बनवण्यासाठीची मेहनत, ऊर्जा, कच्चा माल भांडवल वाया जाणार होते, हे निश्चित. घरगुती व्यवसाय करणार्‍या अत्यंत छोट्या व्यावसायिकासाठी तर हा मोठा आघात होता. त्यावेळी मी सातवीत शिकत होतो. मी निर्णय घेतला. नुकसान का सोसायचे? शाळेतून आल्यावर मी ते पाऊच रस्त्यावर विकू लागलो. रेल्वे स्थानकावरही विकू लागलो. त्यावेळी मला जगाचे नियम कळले. पाऊच विकताना मला स्थानकावरच्या सराईत गुन्हेगारांनी, नशाखोरांनी आणि पोलिसांनीही अनेकवेळा हटकले असेल. या दिवसांमध्ये मी शिकलो की सर्व संकटांना, व्यत्ययांना, प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आपला उद्योग कसा करायचा. त्याचवेळी कायदा व सुव्यवस्थेशी, प्रशासनाशीही कसे वागायचे, हेही शिकलो. काम करता करता मी शिकू लागलो.

 

चिरा बाजारामध्ये २७ सराफांची दुकाने होती. सणासुदीला हे सराफ आपल्या गिर्‍हाईकांना पाऊच, बॅग भेट देत असत. माझ्या मनात विचार आला. या सराफांकडून ऑर्डर घेतली तर... मी घरातील पाऊच व बॅग्सचे नमुने घेऊन एका दुकानात गेलो. काचेचा दरवाजा असलेले भव्य दुकान. दुकानाची भव्यता पाहून दारात घुटमळलो जाऊ की नको जाऊ? मनाचा हिय्या करून आत गेलो. समोरच्या शेठजींना आपल्याकडील पाऊचचे नमुने दाखवले. भव्य दुकानातील तो शेठ माझ्याकडे पाहत होता. मला वाटले की, तो ऐकतो आहे. मी आणखी काही बोलणार इतक्यात शेठ ओरडला, “गुरखा, इसको बाहर निकाल। ये अंदर कैसे आ गया।” दु:ख व संताप यांनी डोळ्यात आणि मनातही दाटी केली. मी तिथून बाहेर आलो. पाच-सहा दिवस विमनस्क अवस्थेत गेले. मी ठरवले, आपण व्यवसाय करूच शकत नाही. यावेळी त्यांना आई-बाबा आणि मित्रांनी समजावले. आई तर म्हणायची, “तुला तर टाटा-बिर्ला व्हायचे आहे.” पुन्हा कामाला लागलो. २७ दुकानांपैकी सहा दुकांनाची ऑर्डर मिळाली. उत्तम दर्जा, गुणवत्ता आणि उच्च दर्जाचे व्यावसायिक संबंध यामुळे पुढच्या वर्षी १८ दुकानांच्या ऑर्डर मिळाल्या. चिरा बाजारामध्ये आमचे नाव झाले आणि तो दिवस उजाडला. ज्या दुकानदाराने मला दुकानाबाहेर काढले होते, त्याने मला अगत्याने बोलावले. परिसरात सगळ्यांना पाऊच बनवून देता, ते आमच्याकडे का देत नाही? म्हणून विचारले. पाऊच बनवूनच दे, असे आग्रहाने सांगितले. माझ्या मनात वादळ सुरू होते. दुकानदाराने मला ओळखले नव्हते, पण मी दुकानदाराला कसे विसरणार? मी त्याला काहीही म्हणालो नाही. पण, त्याने केलेल्या अपमानाची परतफेड म्हणून मी एका पाऊचची किंमत बारा रुपयांनी वाढवून सांगितली. त्याने केलेल्या अपमानाचा बदला व्यवसायातला नफा वाढवून फेडला.

 

पुढे इंजिनिअर झालो. खाजगी कंपनीत कामाला लागलो. एके दिवशी वडिलांनी सांगितले की, “घरच्या व्यवसायात मदत कर.” मी नोकरी सोडून व्यवसायात लक्ष द्यायला सुरुवात केली. हजारोंचा व्यवसाय लाखोंचा झाला. लाखोंचा व्यवसाय कोटींचा झाला. पुढे ‘डिक्की’चा सदस्य झालो. तिथेही अथक प्रयत्न, संपर्क यांच्या माध्यमांतून ‘डिक्की’चा मुंबईचा अध्यक्ष झालो. ‘डिक्की’ हे व्यावसायिकांसाठी चांगले व्यासपीठ आहे. सातत्यपूर्ण मेहनत, कामाप्रती निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे यश मिळतेच मिळते. तसेच ‘डिक्की’ ही अशी संस्था आहे की, तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला उद्यमशील, मेहनती आणि यशस्वी तरुण इथे घडतात. आज उद्योगामध्ये स्थिरावताना मला जाणवते की, समाजामध्ये प्रचंड उर्जा आहे. तरूणांमध्ये खूप इच्छा आहेत. या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या तर आपल्या देशाला खूप सकारात्मक फायदा आहे. समाजामध्ये वेगवेगळ्या स्तरातून विभिन्न स्थिती निर्माण होत असताना, एक उद्योजक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक म्हणून मी अस्वस्थ होतो. मला वाटते की, समाजातील प्रत्येकाचे भले माझ्याकडून होईल न होईल, पण माझ्यापरीने जितके होईल तितके प्रयत्न मी करायला हवेत. यासाठी ‘डिक्की’च्या मदतीने आणि मिलिंद कांबळे सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही ठिकठिकाणी उद्योजकता शिबीर भरवतो. त्या त्या परिसरातील होतकरू आणि व्यवसाय करायचाच अशी इच्छा असणार्या व्यक्तींना या शिबिरामधून उद्योजिकतेचे मार्गदर्शन करतो. सरकारी योजना आहेत, त्या योजना उद्योजक होऊ इच्छिणार्‍यांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे आज समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तरूण उद्योजकतेकडे वळले आहेत. ‘डिक्की’मुळे डॉ. बाबासाहेबांचे स्वावलंबी समाजाचे स्वप्न पूर्ण होईल यात शंका नाही.

 

- संतोष कांबळे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@