उद्योगात गुणवत्तेला पर्याय नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 

आई-वडिलांनी खूप कष्ट केले. वडिलांनी मिळेल ते काम करीत इलेक्ट्रिशियन, वायरमनची कामे केली. रस्त्यावर (अप्पा बळवंत चौकात) रात्रीच्या वेळी पुस्तके विकली. आई त्या वेळी सातवी पास. मग पालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी केली. वडिलांचा डॉ. मणिभाई देसाई यांच्याशी संपर्क आला. ते साल होते १९६०. त्यावेळी हरितक्रांती सुरू झाली होती. शेतीभातीच्या कामांना प्राधान्य मिळू लागले. शेतीची कामे निघू लागली. शेतामध्ये पाण्याचे पाईप टाकणे व विहिरीवर मोटारपंप बसवणे अशा कामांना प्राधान्य असे. शेतीसाठी लागणारे पाईप त्या वेळी फक्त सांगलीला मिळत असत. वडिलांना त्यावेळी सांगलीहून शेतीसाठी लागणारे पाईप आणून पुणे ग्रामीणमध्ये विकत. असे पाईप विकता विकता जर स्वत:चा असा पाईप बनवण्याचा कारखाना उभा केला तर... वडिलांनी स्वप्न पाहिले. त्या स्वप्नांच्या दिशेने त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी यवत येथे शेती घेतली होती. ती शेती विकून ते पैसे बँकेत भरून १७ ह्जार ५०० रुपयांचे कर्ज काढून कुंजीरवाडी येथे जागा घेतली. ते साल होते १९७९. पहिला पाईप दसर्‍याला १९८० साली सुरू केला. हळूहळू काम मिळत गेले. त्यासाठी खूप पायपीट करावी लागली. शेतकर्‍यांना भेटणे. त्यांना पाईपाच्या गुणवत्तेविषयी सांगणे या गोष्टी सोप्या नव्हत्या. कारण, आपल्या इकडे म्हणच आहे की, ‘पिकते तिथे विकत नाही.’ मात्र, आमचे प्रामाणिक प्रयत्न आणि वस्तूची गुणवत्ता यामुळे स्थानिक शेतकर्‍यांचा विश्वास बसला. एक पाईप बनवण्यापासून सुरुवात केलेला कारखाना पुढे दोन वर्षांत स्थिर झाली.

 

डॉ. बाबासाहेबांचे विचार असायचे, ‘शिक्षीत व्हा व उच्च पदाची नोकरी असेल तर ती करा किंवा आपला एखादा व्यवसाय सुरू करा.’ त्यामुळे मी व्यवसाय करण्याचे ठरवले.१९८२ ला कारखान्याचे काम पाहायला सुरुवात केली. त्यावेळी मी शिकत होतो. कॉलेज सुटले की, बस पकडून कारखान्यात जायचो. त्यावेळी माझ्या मनात व्यवसायाबद्दल म्हणाल, तर तो वाढण्यामागची दोन कारणे आहेत. एक म्हणजे गुणवत्ता व दुसरा प्रामाणिकपणा. आम्ही आजपर्यंत कधीही दुय्यम दर्जाचा माल तयार केला नाही. दुय्यम प्रतीचा कच्चा माल वापरला नाही. आम्ही उत्पादन केलेला माल हा उच्च कोटीचा आहे, गुणवत्ता पूर्ण आहे ना, याची आम्ही आधी तपासणी करतो. ‘एव्हरेस्ट पाईप’ हा एक ब्रॅण्डनेम झाले आहे. कोणतेही शासकीय टेंडर असले, तर त्यात ‘एव्हरेस्ट ब्रॅण्ड पाईप’ असा उल्लेख असतो.

 

बाबासाहेब नेहमी सुशिक्षितांना सांगायचे की, “तुम्ही समाजाला विसरू नका.“ हा विचार आजही माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे व्यवसाय करीत असताना आपण समाजाला काही दिले पाहिजे, हे लक्षात ठेवून इतर तरुणांना प्रोत्साहित केले. दलित समाजाच्या तरुणांना उद्योगनिर्मितीसाठी वेळोवेळी मदत केली. माझ्या मते, १९४८ साली बाबासाहेबांचे एक स्वप्न होते की, माझ्या समाजानेसुद्धा उद्योग करावा आणि त्यांचे उत्पादन हे मोठ्या कारखान्यांनी खरेदी करावे. कारण, त्या वेळी टाटा, बिर्ला, बजाज या कंपन्या होत्या. हे स्वप्न पद्मश्री मिलिंद कांबळेसरांमुळे उदयास आले. त्यांनी २००५ साली ‘डिक्की’ची स्थापना केली. समाजामध्ये अनेक दलित उद्योजक आहेत पण, काही कारणास्तव ते कधीही पुढे आले नाहीत. ‘डिक्की’मुळे सर्व दलित उद्योजक एका व्यासपीठावर आले. आपण कोणता व्यवसाय कशा प्रकारे करत आहोत, त्याचे स्वरूप काय आहे याबाबत सांगू लागले. आज प्रत्येक यशस्वी दलित उद्योजक हक्काने सांगू शकतो की, “होय. मी उद्योजक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा आहे. दलित समाजाचा आहे. मी बाबासाहेबांच्या विचारांचा आहे.” आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील, तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग, हे विचार मनात ठेवत आज आम्ही स्वत:च्या हिंमतीवर व्यवसाय करीत आहोत. मी प्रत्येक तरुण दलित व्यक्तीला सांगू इच्छितो की, माणसाला आपल्या जातीची किंवा गरिबीची लाज वाटता कामा नये. लाज वाटायला हवी, ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल, तर प्रामाणिकपणाशी तुम्ही तडजोड करू शकत नाही. या प्रामाणिकपणामुळे तुमच्यावर ग्राहकांचा विश्वास दृढ होतो.

 

तुमच्या प्रामाणिकपणाला अपार कष्टाची जोड असायला हवी. नुसते अपार कष्ट करूनही जमत नाही.त्यात सातत्य, चिकाटी यांचा अंतर्भाव असावा लागतो. या गोष्टी आपल्या व्यवसायात असतील, तर तुम्हाला यश मिळतेच मिळते. सातत्याने कार्यरत राहताना तुम्ही फळाची अपेक्षा ठेवली, तर गुणवत्तेशी तडजोड करायला लागता. तुम्ही जर अंत:करणापासून काम करत असाल, तर यश आपोआपच प्राप्त होते. कोणतेही काम वाईट नसते. तुम्हाला अपयश येते तेव्हा तुमची कार्यपद्धती, विचारपद्धती यात काही चूक आहे का? हे पाहिले पाहिजे” बाबसाहेबांच्या स्मृतींना लक्ष लक्ष अभिवादन!

 

- अविनाश जगताप


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@