कृषिव्यंगचित्रकार : ल. हु. काळे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |
 

व्यंगचित्र म्हटलं की, आपल्याला विनोदी चित्र, मार्मिक चित्र, अर्क चित्र, अश्लिल किंवा चावट चित्र, मिश्किल चित्र इत्यादी प्रकार आठवतात. आर. के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे अशा ख्यातकीर्त व्यंगचित्रकारांनी तर सामाजिक विषयांना राजकीय बाज देऊन जी व्यंगचित्रे काढली, त्यामुळे ‘राजकीय व्यंगचित्र’ हा विषय अधिक लोकप्रिय झाला. व्यंगचित्रांवर आणखी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने विचार करत वरील व्यंगचित्रांबद्दल जे लोकांचे मत बनलेले आहे, त्याला जरा वेगळ्याच मार्गाने नेऊन व्यंगचित्रकार ल. हु. काळे यांनी केवळ ‘कृषी’विषयावरच व्यंगचित्रे रेखाटली आहेत.

 
 
दै.‘ग्रोवन’मध्ये त्यांनी २००७ ते २०१८ या दशकात एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल चार हजार व्यंगचित्रे रेखाटली आहेत. ‘चकाट्या’ या शीर्षकाखाली त्यांची ही व्यंगचित्रे फक्त ‘कृषी’ विषयातील सामाजिक आणि ‘कृषी’ विषयक दैनंदिनीवरही व्यंगचित्रे आहेत. सकारात्मक भाव डोळ्यांसमोर ठेवून आवाहनात्मक, मार्गदर्शपर, सूचक आणि सहज-सोप्या पद्धतीने क्लिष्ट विषयसुद्धा सफाईदारपणे हाताळून काळेंनी वैश्विक स्थान मिळविले आहे. त्यांनी ‘शेतकरी आत्महत्या’ हा विषय कधी हाताळला नाही. ‘आत्महत्या’ हा विषय ‘व्यंग’या मथळ्याचा नाही. सातत्याने फक्त सकारात्मक पद्धतीने व्यंगचित्रकार काळे यांनी स्मृतिप्रवण ‘चकाट्या’ रेखाटल्या. याच्या ‘चकाट्यां’ची दखल घेतली जाऊन त्यांना ‘वर्ल्ड रेकॉर्ड अवॉर्ड २०१८’ मिळाले आहे. “दै. ‘ग्रोवन’ची साथ आणि बळीराजाच्या आशीर्वादाने मला हा विक्रम करता आला,” असे व्यंगचित्रकार ल. हु.काळे नम्रतेने सांगतात. अत्यंत साध्या, सोपा तसेच बोधपर आशय असणार्‍या रेषा, सपाट किंवा फ्लॅट रंगलेपन, तितकाच सिप्लिफाइड बॅकग्राऊंड... मग तिथे घरं, झाडं, प्राणी, आकाश काहीही असो, ते इतकं नेटकेपणाने असतं की, रेखांकनांसह रंगभरण ‘प्लेन’ पद्धतीने जरी रंगविलेलं असलं तरी, चित्रकलेच्या कुठल्याही वैशिष्ट्याला बाधा न येऊ देता ‘चकाट्या’ वाचकांबरोबर संवाद साधतात. त्यांच्या प्रत्येक
 

 
 

कार्टुनबॉक्समध्ये विषयाला अनुसरून यथायोग्य ‘डेप्थ ऑफ फिल्ड’ साधलेले असते. हेच त्यांच्या व्यंगचित्रांकनाचे वैशिष्ट्य ठरावे. पिवळा, निळा, लाल, हिरवा, काळा हे मुख्य रंग आणि त्यांच्या फिक्कट वा गडद छटा यांचा विषयानुरूप उपयोग करून त्यांचं कृषिव्यंग सजतं. औरंगाबादच्या शासकीय कलामहाविद्यालयात पेंटिंगची पदवी घेऊन पुढे मुंबईला डीपए.एड. हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी विविध नोकर्‍यांचे अनुभव घेतले. अनेक पुरस्कार, अनेक प्रदर्शने आणि अनेक ठिकाणी विषयतज्ज्ञ म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. आजच्या वृत्तपत्रीय जगतात व्यंगचित्रकारांची वानवा आहे. फारच थोडे व्यंगचित्रकार या क्षेत्रात आहेत. म्हणून कृषिव्यंगचित्रकार ल. हु. काळे म्हणतात की, “व्यंगचित्रांना चांगले दिवस आणण्याची जबाबदारी व्यंगचित्रकार आणि प्रसारमाध्यमांची आहे.” त्यांना नुकताच जागतिक पातळीवरील पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्या व्यंगचित्रांतील सामाजिक बांधिलकी जपणार्‍या माणुसकीला शुभेच्छांसह सदिच्छा!

 
- गजानन शेपाळ  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@