समाधी परिपूर्ण बैसले ज्ञानेश्वर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Dec-2018
Total Views |



संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्तं मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. आपले संसारताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक, अमूल्य अश्रू ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते.


सुमारे ७२२ वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. सात शतकं उलटून गेली तरी, हा समाधी सोहळा भक्तांच्या अंत:करणाच्या पटलावरून पुसला गेला नाही. त्याचा अमीट ठसा उमटला. हजारो घराण्यात परंपरेतून आळंदी वारी चालत आली आणि आजही चालू आहे. लाखो वारकरी माऊलींच्या समाधी दर्शनासाठी राज्यभरातून येतात. ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष होऊन अवघी अलंकापुरी इंद्रायणी नदी अंतर्बाह्य थरारते. पंढरीचा पांडुरंगदेखील माऊलींच्या दर्शनासाठी येतो. त्याला ज्ञानेश्वरांना भेटल्याशिवाय चैन पडत नाही. या पालखी सोहळ्यात २६ दिंड्या सहभागी होतात. कार्तिक कृष्ण त्रयोदशीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यात सुखाचा स्वानुभव घेण्यासाठी लाखो भाविकांची पावले आळंदीकडे वळतात. विविध धार्मिक कार्यक्रम होतात. सगळ्यात भावपूर्ण कार्यक्रम म्हणजे ‘समाधीच्या अभंगांचं गायन!’ पिढ्यान्पिढ्या घराण्यामध्ये ‘समाधी अभंग’ म्हणण्याचा मान चालत आलेला आहे. वेगवेगळे फडकरी, दिंड्या यांच्याकडे हा ‘समाधी अभंग’ उभे राहून गायन करण्याचा मान आहे. माऊलींच्या संजीवन समाधीचे साधारणपणे ७० अभंग आहेत. हे संत नामदेव महाराजांच्या स्फुरणामधून साकारलेले अभंग आहेत. नामदेव महाराजांच्या प्रारंभीच्या अभंगात समाधीची पूर्वपीठिका व्यक्त झाली आहे. ते म्हणतात,

 

महा उत्सव त्रयोदशी।

केला त्या ज्ञानदेवासी॥

मग नाम म्हणे विठोबासी।

चरण धरूनिया॥

समाधिसुख दिधलें देवा।

ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा॥

अजानवृक्षी बीज वोल्हावा।

ज्ञानांजनासीऽऽ कृपा आली विठ्ठालासी॥

म्हणे ज्ञानदेवा परियेसी।

तीर्थ भगिरथी अहर्निशी ॥

तुज नित्य स्नानाशी।

दिधली इंद्रायणी दक्षिणवाहिनी॥

 

कार्तिक त्रयोदशीच्या शुभदिवशी साधा उत्सव नाही, तर महाउत्सव केला. ज्ञानदेवांना विठ्ठलाने परमात्मा परमेश्वराने समाधी सुखाचा सुरेख अनुभव दिला. अलंकापुरी पुण्यभूमीमध्ये हा महाउत्सव संपन्न झाला. अजानवृक्षातळी ज्ञानदेवांवर श्रीविठ्ठलाने कृपा केली. ही कृपा अत्यंत आगळीवेगळी असून तिचं वर्णन करण्यास शब्द अपुरे पडतात. भागिरथी तीर्थ कायम जवळ ठेवून नित्य स्नानासाठी इंद्रायणी ही दक्षिणवाहिनी नदी दिली. अलंकापुरीच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा वरील अभंग आहे. संत नामदेव महाराज वर्णन करतात,

 

वोसंडोनी निवृत्ती आलिंगो लागला। आणिकांच्या डोळा अश्रु येती॥

अमर्यादा कधी केली नाहीं येणें। शिष्यगुरूपण सिद्धी नेलें।

गीतार्थांचा अवघा सोहळा।

गुह्यगोप्यमाळा लेवविया॥

फेडिली डोळ्यांची अत्यंत पारणी।

आता ऐसें कोणी सखे नाहीं॥

काढोनिया गुह्य वेद केले फोल।

आठवती बोल मनामाजीं॥

 

वैराग्याचा मेरूमणी असलेले ज्ञानदेवांचे सद्गुरू निवृत्तीनाथांची अवस्था कशी झाली, ते या अभंगातून लक्षात येते. त्यांच्या नयनांमधून अश्रुंच्या धारा बरसू लागल्या. ज्ञानदेवांचे गुणवर्णन करून, ते आठवून त्यांना गहिवरून आले. भावना अनावर झाला. अत्यंत विनम्र मर्यांदांचे उल्लंघन न करणारा असा अलौकिक शिष्य असलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहून गीतेमधील गुह्याची उकल केली. अशा ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ वारंवार आलिंगन देऊ लागले. आपल्या शिष्याचा संजीवन समाधी सोहळ्यामुळे विरह होणार, या विचारामुळे ते व्याकुळ झाले. अशा या अवघड वेळी स्वत: पांडुरंग सकल संतांना सांगतात,

 

देव म्हणे असे आठवाल फार ।

लागेल उराशी समाधीस॥

रुक्माबाई म्हणे याजलागीं जाण।

ब्रह्मखूण मेळविलीं॥

 

अर्थात, तुम्ही सगळेजण ज्ञानदेवांच्या वेगवेगळ्या आठवणी सांगाल, प्रसंग आठवाल, तर समाधी सोहळ्याला फार उशीर होईल. सोपानदेव, मुक्ताबाई, अनेक संतांना ज्ञानदेवांना दूर करावेसे वाटेना. प्रत्यक्ष जगन्माता रुक्मिणीदेखील तिथे हजर होती. ज्ञानदेव मोठे भाग्यवान! ब्रह्मखूण घेऊन अवतरलेल्या चारही भावंडांचं मूळ रूप किंवा अवतार सांगण्याची विनंती त्यांनी विठ्ठलाला केली. कोणतीही उपाधी नसलेले ज्ञानदेव समाधी घेण्यास परिपूर्ण आहे. समाधी सोहळ्याचा तपशील नेत्रांसमोर समाधी सोहळयाचे दृश्य साकार करणारा नामदेवांचा अभंग आहे.

 

निवृत्तींने बाहेर आणिलें गोपाळा।

घातियेली शिळा समाधीसी ॥

सोपान मुक्ताई सांडिती शरीरा।

म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥

आणिकांची तेथे उद्विग्न तीं मनें।

घलिताती सुमनें समाधीसी॥

नामदेवें भावें केली असे पूजा।

बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥

 

अवघड असा समाधीचा क्षण आला. निवृत्तीनाथांनी गोपाळाला ज्ञानदेवांच्या भुयारामधून बाहेर आणले. समाधीच्या स्थानी शिळा ठेवून स्थान बंद केलं. सोपान, मुक्ताई, निवृत्ती यांना शोक अनावर झाला. अनेक संतांनी उद्विग्न मनांनी ज्ञानदेवांच्या समाधीवर फुले अर्पण केली. नामदेवांनी अत्यंत मनोभावे पुण्यपुरुषाच्या, ज्ञानराजांच्या समाधीचे पूजन केले. प्रत्येक अभंग म्हणता म्हणता भक्तांचा कंठ दाटून येणं स्वाभाविक आहे. संजीवन समाधी ही जागृत असून ज्ञानदेव आजही प्रचिती देतात. प्रत्येक भक्ताचा जसा भाव असेल, तसे ज्ञानदेव अनुभवाला येतात. त्या समाधी स्थानाची स्पंदनं अफाट, अलौकिक अशी आहेत. समाधी सोहळा लाखो भक्तं मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. आपले संसारताप विसरून ज्ञानदेवांना अश्रूंचा अभिषेक करतात. ते मौलिक, अमूल्य अश्रू ज्ञानेश्वरांना भावतात. ते माऊली होऊन आपल्या लेकरांना सांभाळतात. लौकिकातील माय ही जन्मदात्री, तर ज्ञानेश्वर माऊली ही विश्वाची माऊली. ती आपल्या लेकरांच्या प्रगतीसाठी सदैव हात पुढे करते. आशीर्वादाचा प्रेमळ हस्त भक्तांच्या शिरावर ठेवते. त्यांचा जन्मोजन्मी सांभाळ करते. अशा अलौकिक ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी सोहळा थेट हृदयाला जाऊन भिडणारा आहे.

 

अवघी जयजयकारे पिटियेली टाळी।

उठली मंडळी वैष्णवांची॥

सहमंडळी सारे उठले ऋषिश्वर।

केला नमस्कार समाधीसी॥

 

-कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@