जलसंपदामंत्र्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, शिवसेना आ. किशोर पाटलांचा टोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |

पाचोरा :
 
2007 मध्ये आर.ओ.पाटील आमदार व जिल्हाधिकारी विजय सिंघल हे असताना तालुक्यातील उतावळीसह अनेक गावात नदीजोड प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली होती.
 
 
आता मतांच्या राजकारणासाठी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोला शिवसेनेचे आ. किशोर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत लगावला आहे.
 
उतावळी नदीजोड प्रकल्पाचे काम आपण केले, अशी बॅनरबाजी जलसंपदामंत्री महाजन यांनी केली आहे. त्याला उत्तर देण्यासाठी शिवसेना आ. किशोर पाटील यांनी मंगळवारी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद बोलावली होती.
 
यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आ. आर.ओ.पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, अ‍ॅड. दिनकर देवरे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील, भरत खंडेलवाल, बाजार समितीचे माजी संचालक अनिल धना पाटील, वाल्मीक पाटील, विजय भोई, नितीन पाटील आदी होते.
 
 
आ. किशोर पाटील पुढे म्हणाले की, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा माजी आ. आर. ओ.पाटील हे आमदार असताना सन 2007 मध्येच उतावळी नदीचे काम हाती घेण्यात आले होते.
 
तालुक्यातील कुर्‍हाड - लोहाच्या जि. प. गटातील 22 गावे जामनेर मतदारसंघात जोडली गेल्याने सन 2009 मध्ये आर.ओ. पाटील यांचा दुर्दैवाने पराभव झाला.
 
 
यातील उतावळीचे काम अपूर्ण राहिले. तेव्हापासून आजपर्यंत 14 वर्ष गिरीश महाजन हे त्या मतदारसंघाचे आमदार आहेत. गेल्या 4 वर्षापासून जलसंपदामंत्री आहेत तरीदेखील उर्वरित फक्त 10 टक्के काम मंत्री महाजन पूर्ण करु शकलेले नाहीत.
 
 
मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ना. गिरीश महाजन हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी बहुळा प्रकल्पाजवळ बॅनर लावून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करत असल्याची प्रखर टीका पाटील यांनी केली.
 
 
मी स्वत: विधानभवनात प्रश्न मांडून उतावळीचा विषय मार्गी लावला. थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होईपर्यंत प्रयत्न केला. केवळ या कामाचे श्रेय घ्यावे यासाठी जलसंपदामंत्री महाजन हे ठिकठिकाणी बॅनर लाऊन फुकटचे श्रेय घेत आहेत, ते त्यांनी घेऊ नये असे आवाहन आ. पाटील यांनी केले.
@@AUTHORINFO_V1@@