आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ‘सुमार’ कट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
केतकरांच्या मते, जो माणूस राजकारणातच २००२ साली उगवला त्याला पंतप्रधान करण्याचा कट शिजला कधी तर १९७५ साली! अर्थात केतकर म्हणजे काही कोणी सामान्य माणूस नव्हे, तर असले अतर्क्य तर्क करण्यासाठी प्रसिद्धी पावलेल्या काँग्रेस चरणलीन पुरोगामी पीठाचे प्रमुख आचार्यच ना! अशा गांधीघराणेकृपाकांक्षी व्यक्तीचा दावा खोटा कसा असेल? म्हणूनच सगळेच ‘सुमार’ केतकरांना अनुमोदन देऊ लागलेत ना!
 

विद्या विनयेने शोभते,’ असे मराठीत एक वचन आहे. याच उक्तीनुसार विद्वत्तादेखील विवेकाशिवाय झोकांड्या खाऊ लागली तर काय घडू शकते, याचे उदाहरण काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी दाखवून दिले. परस्परविरोधी गोष्टींचा एकमेकांशी अन्योन्य संबंध जोडणे, हे केतकरांचे पत्रकारितेतले वैशिष्ट्य. आपल्या याच वैशिष्ट्याला २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर घासून-पुसून उजाळा देत केतकरांनी राजकीय पटलावर मोठाच प्रकाश पाडला. अर्थात, हा प्रकाश केतकरांसारख्या पत्रपंडिताने पाडल्याने कित्येकांना आपल्या मन-मेंदूतला अंधार दूर झाल्याचेही भास होऊ लागले. म्हणूनच ‘केतकर बोलले, केतकर बोलले,’ असा धोशा लावत या मंडळींनी या ‘कुमार’बोलांना नाकारता येणार नाही, अशी ग्वाही माना डोलावत दिली. केतकर असे काय बोलले? तर केतकरांनी गेल्या ३५ वर्षांपासून स्वतःपाशी दडवून ठेवलेला गुप्त खजिना रिता करत आपणही शोधपत्रकारिता करू शकतो, हे सिद्ध केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सत्तासूत्रे हाती घेण्यामागे एक व्यापक आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा केतकरांनी केला. आपण ज्याचा द्वेष करतो, त्याच्याविरोधात केकाटायची संधी मिळाली की, माणूस जिभेला हाड नसल्यासारखे बोलत सुटतो, तसेच त्यांनी केले आणि केतकरांच्या कुशाग्र बुद्धीवर फिदा असलेल्यांनी त्याला नंदीबैलासारखे अनुमोदनही दिले.

 

१९७५ साली बांगलादेशचे अध्यक्ष शेख मुजीबूर, १९७९ साली पाकिस्तानचे माजी अध्यक्ष झुल्फिकार भुट्टो, त्यानंतर १९८४ साली इंदिरा गांधी, १९९१ साली राजीव गांधी यांच्या झालेल्या हत्या हा १४ ऑगस्ट, १९४७ पूर्वीच्या अखंड भारतातील व्यापक कट असल्याचे केतकरांनी छातीठोकपणे सांगितले. विशेष म्हणजे, या हत्यासत्राच्या व्यापक कटाचा लाभार्थी २०१४ साली पंतप्रधानपदी आलेला नरेंद्र मोदी नामक व्यक्ती असल्याचा दावा त्यांनी केला. आहे की नाही कमाल? कारण, वरील सर्वच नेत्यांच्या हत्या कोणी आणि का केल्या, याचा तपास त्या त्या वेळी झाला आहे. शिवाय तपासातून या हत्यांमागे कसलाही आंतरराष्ट्रीय संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले. पण, ज्यांना गांधी-नेहरू घराण्याशिवाय अन्य कोणी सर्वोच्चपदी विराजमान झाल्याचे बघवत नाही, ते याला मान्यता कशी देतील? उलट अशा चौकशांना धुडकावत गांधी-नेहरू घराण्याची महत्ता सिद्ध करण्यासाठीच ते आपले बुद्धीकौशल्य पणाला लावतील ना! केतकरांनीही तेच केले. केतकरांच्या म्हणण्यानुसार, जो माणूस भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर उगवलाच २००२ साली, त्याला पंतप्रधान करण्याचा कट शिजला कधी तर १९७५ साली! व्वा! केतकरांचा हा दावा सर्वसामान्य बुद्धीच्या माणसालादेखील पटणारा नाही. पण, केतकर म्हणजे काही कोणी सामान्य माणूस नव्हे, तर असले अतर्क्य तर्क करण्यासाठी प्रसिद्धी पावलेल्या काँग्रेस चरणलीन पुरोगामी पीठाचे प्रमुख आचार्यच ना! मग त्यांच्या प्रत्येक वाक्यात खोल अर्थ, सत्य आणि तथ्य दडणे ओघाने आलेच ना! यामुळेच तर ते नावाजले गेलेले पुरोगामी बुद्धिमंत झाले आहेत ना! यातूनच त्यांना अशी बडबड करण्याचा अधिकार मिळालेला असतो ना! म्हणूनच केतकरांनी आपला तोच अधिकार पुन्हा एकदा वापरून शेंडा बुडखा नसलेल्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध लावून टाकला. अर्थात, आपला अधिकार गाजविण्याच्या नादात केतकरांसारख्यांना अशी हुक्की येतेच आणि त्या भरात ते काहीतरी असंबद्ध बरळतात, हे देशातले वास्तवच!

 

दुसरीकडे याच हुक्कीच्या अमलात केतकरांनी आणखी एक भाकीत वर्तवले. २०१९ च्या निवडणुकीत मोदी पराभूत झाले तर ते नव्या विजेत्यांना सत्तेचे हस्तांतरण सहजासहजी करणार नाही आणि जर विजयी झालेच, तर २०२४ साली निवडणुकाच होणार नाहीत! आहे की नाही गंमत? म्हणजे एका बाजूला मोदी सत्तेत येणार नाही, असे म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला मोदींना थेट २०२४ नंतरही सत्ताधीशाच्या रूपात पाहायचे! जनतेशी संबंध तोडून इतरांशीच संबंध जोडत गेले की, ही अशी अवस्था होते आणि कोणत्याही एका भाकितावर ठाम राहता येत नाही, त्याचाच हा दाखला नव्हे काय? उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, कुमार केतकरांच्या बेताल बोलाची लागण महाराष्ट्रातल्याच आणखी एका कुमारालाही झाली. केतकरांच्या कुमाराच्या स्पर्धेत आपण मागे पडू नये म्हणून सप्तर्षींच्या कुमाराने कालच २०१९ साली मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे भविष्य सांगितले. पण, या दोन्ही कुमारांच्या लीलांमुळे नेमक्या कोणाच्या पोपटपंचीवर विश्वास ठेवावा, असा प्रश्न त्यांच्या समर्थकांना निश्चितच पडला असेल. असो. आंतरराष्ट्रीय राजकारण हे नेहमीच चकव्यासारखे असते. या चकव्यानुसार तुम्ही जसे असता, तसेच जग दिसत राहते. सोनिया गांधी यांच्या राजीव गांधींशी झालेल्या विवाहाच्या बाबतीतही अशा कटांची चर्चा झाली होती. काँग्रेसच्याच मस्तकावर सत्तासूर्य प्रदीर्घ काळ तळपत राहिल्याने पुढे ही चर्चा फार चालली नाही. नियतीचा काव्यगत न्याय असा की, ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वीच ख्रिश्चियन मिशेल या इटालियन कंपनीच्या दलालाला अटक करण्यात आली. यापूर्वी बोफोर्समध्येही असाच एक इटालियन दलाल ताब्यात आला होता. क्वात्रोची, ख्रिश्चियन या दोन्ही दलालांचे संबंध इटलीशी आहेत आणि गांधी घराण्याच्या सूनबाईही इटलीच्याच आहेत. हे नेमके काय गौडबंगाल आहे? देशातल्या दोन मोठ्या संरक्षण सामग्री खरेदीप्रकरणी ही दोन इटलीशी नाते सांगणारी माणसे सापडली असताना त्यासंदर्भात यापूर्वी ज्या बाजारगप्पा वा चर्चा झाल्या, त्याची शोधपत्रकारिता का केतकरांना करावीशी वाटली नाही? वा या सगळ्याच घटनाक्रमात केतकरांना कुठलाच कट का बरं दिसला नाही? त्याची मुळे गांधी-नेहरू घराण्याशी वाहिलेल्या निष्ठेपर्यंत जातात, म्हणूनच तर केतकरांना समोर संशयास्पद घटना घडत असतानाही त्याचा संबंध जोडण्याची बुद्धी झाली नाही. पण, ज्याचा संबंध लावणेच अशक्य आहे, त्याचा संबंध लावण्याची लहर मात्र आली.

 

खरेतर कुमार केतकर हे अत्यंत व्यासंगी पत्रकार. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा अर्थ लावणे, त्यावर भाष्य करणे हीदेखील त्यांची खुबी. विशेष म्हणजे, आम्हाला त्यांची मते पटो अथवा ना पटो, पण अग्रलेख मागे घेणाऱ्या किंवा आपल्या अग्रलेखांबाबत माफीनामा सादर करणाऱ्या संपादकांत केतकर कधीच नव्हते, हेही वास्तवच! पण, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे दुर्दैव असे की, केतकरांच्या विद्वत्तेला विवेकाचे परिमाण कधीही लाभले नाही. २०१४ साली काँग्रेसला पदच्युत केल्यानंतर नरेंद्र मोदींनी दमदारपणे देशाच्या राजकारणावर आपली मजबूत पकड बसवली. त्यातून केतकरांसारखी एक विचित्र समज असलेल्यांचा तिळपापड होणे, हेदेखील अपरिहार्यच होते. बहुराज्यीय, वैविध्यतापूर्ण रचना असलेला आपला देश एका प्रांतातून, एका विशिष्ट धर्मातून, एका विशिष्ट जातीतून आलेली व्यक्ती चालवू शकत नाही, असे कुमार केतकरांना वाटते. पर्यायाने (कधीकाळी) स्वतःचा धर्म अधोरेखित न करणारा, जातीबाबत सुस्पष्टता नसणारा गांधी परिवार केतकरांना देश चालवण्यासाठी एकमेव पात्रताधारक वाटतो. या स्वतःच्या तर्काला अनुसरून आज कुमार केतकर राहुल गांधींसारख्या यंत्रामध्ये एका बाजूने बटाटे टाकले की, दुसऱ्या बाजूने सोने काढण्याच्या बाता करणाऱ्या माणसाच्यादेखील समर्थनार्थ उभे राहिले आहेत. २०१४ साली जसे गांधी परिवाराच्या ताब्यातील काँग्रेसी सत्तेत माजलेल्या घोटाळ्यांचे पीक आले, देशात कठपुतळी बाहुला पंतप्रधानपदी बसवल्याने अराजकसदृश्य स्थिती निर्माण झाली, तीच त्यांना प्रिय वाटते. म्हणूनच २०१९च्या निवडणुकीतही वरीलप्रमाणे परिस्थिती निर्माण करणारी काँग्रेसच सत्तेवर यावी, अशी त्यांची इच्छा आहे. पण, केतकरांसारख्या असामान्य व्यक्तीने आपली सगळीच बुद्धिमत्ता काँग्रेसकडे गहाण टाकलेली असली तरी देशातल्या कोट्यवधी अतिसामान्यांना स्वतःची बुद्धी स्वतःच्याच तारतम्याने वापरायची आहे ना! मग ती जनता या असल्या सुमार कटाचा गौप्यस्फोट केल्याची बतावणी करणाऱ्यांना कशी भुलेल?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@