जिद तो उसकी है, जो मुकद्दर मे नही!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |



 
 
 
जर माझ्या आयुष्यात बाबासाहेबांचे विचार नसते तर? तर मीसुद्धा परिस्थितीला शरण गेले असते. आयुष्यात आलेल्या वादळांना घाबरून राहिले असते. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेने मी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ठरवले.
 

माझे वडील एअर इंडियामध्ये मॅनेजर म्हणून निवृत्त झाले. माझे बालपण खूप छान गेले. माझे आई-वडील दोघांनी माझ्या लहानपणापासून बाबासाहेब म्हणजे काय, आणि पंचशील पालन कसे करावे हे शिकवले. एवढेच नव्हे तर लहान असताना वडिलांनी आम्हा चौघा भावांकडून बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा पाठ करून घेतल्या होत्या. माझे लहानपण उल्हासनगरला गेले. माझी आई दर रविवारी सकाळीच आम्हाला छान पांढरे कपडे घालून उल्हासनगर मुख्य टेकडी या विहारात धम्म वंदना करण्यासाठी घेऊन जात असे. ते मला खूप आवडायचं. याला कारण विहारातले भंते खूप छान जातककथा सांगायचे. त्या जातककथांमधून नकळत माझ्या मनावर संस्कार होत होते. त्या कथांतून धम्म माझ्या मनात रूजत होता. इतकेच काय भंते बाबासाहेबांची जीवनगाथाही सांगत. त्यावेळी बाबासाहेबांच्या जीवनावरचे प्रसंग ऐकून मनात विचार येत की, “बाबासाहेबांनी किती कष्ट केले, त्याग केले. त्यामुळे माझ्यावर बाबासाहेबांच्या विचारांचा विलक्षण प्रभाव झाला. आत्मविश्वासाने प्रामाणिक कष्टाने लक्ष्य प्राप्त होते, हे मला बाबासाहेबांच्या जीवनगाथेने कळले होते. बाबासाहेब खूप शिकले आणि त्यांच्या प्रेरणेने करोडोंचे आयुष्य बदलले होते. मलाही मोठेपणी सीए व्हायचं होतं.

 

१९९१-१९९५ कॉलेजचे दिवस मलाही आठवतात. जातीयतेचा विखार मी अनुभवला आहे. महाविद्यालयामध्ये शिकत असताना मला प्रशिक्षणाची संधी मिळाली, पण ती संधी महाविद्यालयाकडून नाकारली गेली. का? याचे उत्तर कुणाकडेच नव्हते. पण पुढे त्याच कंपनीमध्ये मी उत्तम काम केले, हीसुद्धा माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे. खरं तर लहानपणापासून स्वतःची ओळख स्वतः निर्माण करण्याकडे माझा कला होता. लहानपणी नेहमी एक म्हण ऐकायचे की, ‘अंथरूण पाहून पाय पसरा.’ ती म्हण लहानपणीही मला आवडायची नाही. मी म्हणत असे, “अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा अंथरूण वाढविण्याची ताकद ठेवायला हवी.” या एकाच सूत्रातून मी जिद्दीने आयुष्यात व्यवसायाकडे वळले. उद्योजिका होणे हे जन्मावर नसते, तर कर्मावर असते, हे मला मनातून वाटत होते. त्यादृष्टीने मी काम करायला सुरुवात केली. त्यामुळे माझे दोन व्यवसाय आहेत. ‘ओरिफ्लेम’ या कंपनीअंतर्गत स्वतःचे व्यवसाय विश्व विणले आहे. मी व माझ्या गटाने मिळून १५ हजार महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून दिले तसेच त्यांना स्वावलंबी व सक्षम केले. बाबासाहेबांचे विचार होते की, कोणत्याही समाजाची स्थिती त्या समाजाच्या स्त्रीच्या परिस्थितीवरून समजता येते. आज हजारो महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास मदत करताना मला आनंद होतो.

 

माझी दुसरी कंपनी आहे पॅसिफिक रिलोकेशन आणि विस कन्सल्टन्सी. या कंपनीच्या माध्यमातून कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये लोकांचे कुटुंबासहित स्थलांतर करतो. माझ्या या कंपनीने आतापर्यंत २०० कुटुंबीयांना कॅनडामध्ये व ऑस्ट्रेलियात स्थायिक केले. हे काम मोठे जिकीरीचे आहे. या व्यवसाय क्षेत्रामध्ये सहसा महिला कार्यरत नाहीत. पण मला मात्र हे आवाहानात्मक काम व्यवसाय म्हणून स्विकारावेसे वाटले. कारण डर के आगे जित है. होय, भिती, न्यूनगंड या सगळ्यांना मागे सारत मी व्यवसायात स्वताचे स्थान निर्माण केले. मात्र २०१३ साली माझ्या आयुष्याला वेगळे वळण लागले. माझे पती हृदयविकाराने मृत्यू पावले. ते व्यवसायाने वकील होते. अर्थातच आर्थिक स्थैर्याची गोष्ट नव्हतीच. पण देवाची कृपा होती की, मी माझ्या पायावर सक्षम होते. कोणापुढे हात पसरायची वेळ आली नाही. आयुष्याचा विचार करताना वाटते की, बाबासाहेबांच्या विचारांनी माझ्या मनात जिद्द निर्माण केली. चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता निर्माण केली. जर माझ्या आयुष्यात बाबासाहेबांचे विचार नसते तर? तर मीसुद्धा परिस्थितीला शरण गेले असते. आयुष्यात आलेल्या वादळांना घाबरून राहिले असते. बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरणेने मी स्वतःची ओळख निर्माण करण्याचे ठरवले. त्यामुळेच व्यवसाय सुरू केला. आर्थिक स्थैर्यामुळे पतीनिधनानंतरही दोन मुलींचं संगोपन व्यवस्थित करू शकले.

 

तरुणांसाठी माझी कळकळीची विनंती आहे. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा, शिक्षणाचा उपयोग नोकरी शोधण्यासाठी वाया न घालवता स्वतःचा व्यवसाय निर्माण करावा. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या जीवनातून संदेश दिला आहे की,

 

मिल सके आसानी से,

उसकी ख्वाहिश हम रखते नही।

जिद तो उसकी है जो,

मुकद्दर मे लिखा ही नही।

 
 

- विजया साळवे

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@