बाबासाहेबांच्या स्वप्नातील सक्षम समाज घडवायचा आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |


 


सुगत वाघमारे माझे नाव. नावात तसे काही नसतेच. केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आयुष्यात काही करू शकलो. मला सुपर्ब हाऊसिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. कंपनी ही कंपनी स्थापन करताना माहीत नव्हते की, लवकरच बाराशे कोटींचा एक हाऊसिंग प्रोजेक्ट मुंबईसारख्या ठिकाणी सुरू होईल. जेव्हापासून आयुष्यात मोठी मोठी संकटे आली तेव्हापासून छोटी स्वप्न तर दूरच, चुकूनही छोटे विचार येणेही बंद झाले. ध्येय मोठे असले की, ध्येय गाठता गाठता संकटांकडे दुर्लक्ष होते, याची अनुभूतीसुद्धा आली. माझा जीवनप्रवास या सर्वांपेक्षा जरा वेगळाच आहे. कारण, मी एक मजुराचा मुलगा म्हणून जन्माला आलो. आईबाबांनी मजुरी करून करून आपले जीवन सुरू केले. ते करत असताना बाबा मजुराचे मिस्त्री कामगार झाले आणि त्यांना बांधकाम व्यवसायात स्वबळावर छोटी छोटी कंत्राटे मिळू लागली आणि तेथूनच बाबांना या व्यवसायाची एक नवीन दिशा मिळाली आणि त्यांनी अकोला या शहरात पहिल्यांदा फ्लॅट सिस्टिम म्हणजेच अपार्टमेंट बांधणे सुरू केले. आमच्या कुटुंबामध्ये पाच बहिणी आणि मी एकटाच भाऊ, असा आमचा परिवार. बाबा स्वतः अशिक्षित असल्यामुळे त्यांना आमच्या सर्वांच्या शिक्षणाची काळजी असायची. ते आवर्जून आमच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन असायचे. माझे शिक्षण सुरू असतानाच अचानक बाबांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली व ते घर सोडून निघून गेले. ५ बहिणी आणि आई. घरात मी एकटाच पुरुष व्यक्ती. त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी माझ्यावर आली. आमच्यासमोर उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला. शिक्षण सुरू असतानाच कमाई सुरू करण्याची वेळ आली, परंतु अगदी लहानपणापासूनच वडिलांसोबत विहारांमध्ये वंदना करणे व विचारवंतांचे विचार ऐकणे, याची सवय वडिलांनी आधीच लावून दिलेली होती. त्यातूनच बाबासाहेबांचे विचार, त्यांचा संघर्ष व त्या संघर्षातूनही स्वतःची, समाजाची व राष्ट्राची परिस्थिती सुधारण्याची हिंमत ठेवणाऱ्या या लोहपुरुषाचे जीवन मला ज्ञात होते व सदैव प्रेरणा देत होते. त्याच प्रेरणेतून मी विचार केला की, जर बाबासाहेब त्या काळात जर इतक्या गरीब परिस्थितीतून देशाच्या या पातळीवर पोहोचू शकतात आणि माझ्या वडिलांचा जीवनसंघर्ष माझ्या डोळ्यासमोर ठेवून मी हिंमत बांधली व पुढच्या वाटचालीसाठी सुरुवात केली. माझ्या जीवनातले पहिले बांधकामाचे कंत्राट वयाच्या १७ व्या वर्षी मिळवले. असे करत करत मी माझे शिक्षण व पारिवारिक जबाबदारी सांभाळली. जसे ४ बहिणींचे लग्न व माझे स्वतःचेही लग्न, मी लहान वयातच स्वबळावर केले.

 

त्या दरम्यान देशात आलेल्या आर्थिक मंदीला मीसुद्धा बळी पडलो व पुन्हा एकदा आर्थिक स्थिती ढासळली. मग मी २००५ मध्ये माझी लहान मुले, पत्नी आणि आईसमवेत मुंबई गाठली व तेथे नव्याने याच व्यवसायाला सुरुवात केली. याचबरोबर आपणसुद्धा समाजाला काही देणे लागतो, ही माझी सामाजिक जबाबदारी स्वीकारून मी ‘तीक्ष्णगत मल्टिपर्पज वेल्फेअर सोसायटीया संस्थेची स्थापना करून आपल्या सामाजिक कार्यास सुरुवात केली आणि प्रथमतः आम्ही लहान मुलांमध्ये कार्य सुरू केले आणि मुलांच्या हक्क, अधिकार आणि संरक्षण संदर्भात जनजागृती करण्याचे काम सातत्याने सुरू केले. हे सर्व सुरू असतानाच एक दिवस पद्मश्री मिलिंद कांबळे सरांबद्दल मी वाचले, ऐकले आणि त्यांना भेटायचे ठरवले. त्यांना भेटल्यानंतर व त्यांचे विचार ऐकल्यानंतर मी ठरवले की, खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित समाज, युवक आणि राष्ट्र घडवायचे असेल तर आदरणीय पद्मश्री मिलिंद कांबळेसरांनी सुरू केलेल्या मागासवर्गीय व महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या या चळवळीमध्ये मी व माझ्यासारख्या बहुतांश उद्योजकांनी त्यांची प्रेरणा घेऊन सहभागी झाले पाहिजे. त्यामुळेच मी माझे पुढील कार्य यांच्याच मार्गदर्शनात करायचे ठरविले व मी ‘डिक्की’ (दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज) सोबत जोडला गेलो. मला सरांनी मुंबई रिजनचा सिनिअर व्हाईस प्रेसिडेंट व कोकण रिजन समन्वयक या पदांवर नियुक्त केले. मी माझी जबाबदारी स्वीकारून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्य सुरू केले आणि ‘डिक्की’ने तयार केलेल्या व भारत सरकारने लागू केलेल्या अनेक योजनांचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा, या उद्देशाने अनेक बेरोजगारांना उद्योग निर्माण करता यावा, यासाठी आम्ही मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अकोला, वाशिम या सर्व ठिकाणी स्टॅण्ड अप इंडिया क्लिनिक अर्थात मोफत व्यवसाय मार्गदर्शन केंद्र सुरू केले. माझ्या व्यावसायिक जीवनाबरोबरच मी सामाजिक जबाबदारी आणि समाजाबरोबर सर्वसामान्य लोकांसोबत जोडून राहावे यासाठी मी विविध सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेला समाज व राष्ट्रनिर्मितीचे काम दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज (DICCI) चे संस्थापक पद्मश्री मिलिंदजी कांबळे सर करत आहेत. मिलिंदजी कांबळे यांनी स्वीकारलेल्या आर्थिक लढ्यासाठी आपण सर्वांनी मिळून त्यांना सहयोग द्यावा, जेणेकरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित एक सक्षम समाज आपण निर्माण करू शकू.

 

- सुगत वाघमारे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@