आपले ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |


 


आपण ज्या समाजातून वर आलेलो आहोत त्या समाजाप्रती आपले काही देणे लागते, ही भावना मनात ठेवून आपल्या समाजबांधवांचे कसे भले होईल, याचा सतत विचार करून योग्य ती मदत करणे, हे प्रत्येक समाजबांधवाचे कर्तव्य आहे,’ असे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे. हीच संकल्पना उराशी बाळगून समाजाच्या आर्थिक विकासासाठी हातभर लावणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

 

माझा जन्म भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला माईन्स या लहानशा गावचा. आम्ही पाच भावंड असलेले कुटुंब. त्यात मी सर्वात लहान. वडिलांच्या प्रदीर्घ आजारामुळे मी अडीच वर्षांचा असतानाच त्यांचा मृत्यू झाला. माझे मोठे भाऊ त्या वेळेस फक्त १३ वर्षांचे होते. आई आणि मोठ्या भावांनी मिळून आमच्या परिवाराचे पालनपोषण केले. टेलरिंगचा वारसा आमच्या कुटुंबाला माझ्या वडिलांकडून मिळालेला असल्यामुळे माझे भाऊ टेलरिंगचे काम करायचे. आई फुलवंता वासनिक मोयलमध्ये खडी फोडून (ब्लास्ट झालेल्या खनिजांतून मॅगनीज व दगड वेगळे करून) कुटुंबाला हातभार लावायची. तिने सिंडिकेट बँकेतून १५० रुपयांचे कर्ज घेऊन माझ्या मोठ्या भावाला शिलाईमशीन घेऊन दिले. त्या दिवसापासूनच आमच्या कुटुंबात व्यवसायाची सुरुवात झाली. व्यवसायाला प्रारंभ करताना माझ्या मोठ्या भावाचे वय अवघे १५ वर्ष होते. कपडे शिवताना लागणारे कौशल्य त्यावेळी त्याच्याकडे नसल्यामुळे कधी कधी लोकांनी शिवण्याकरिता दिलेले कपडे बिघडायचे व त्यातून पैसे मिळण्याऐवजी वादच निर्माण व्हायचे. मोठ्या बहिणीने बीडी बांधण्याचे काम एका मुस्लीम महिलेकडून शिकून घेतले व त्या कामाची सुरुवात आमच्या कुटुंबात होऊन पैशाची आवक सुरू झाली. मोठे भाऊसुद्धा टेलरिंगच्या कामात तरबेज झाले व त्यांचाही व्यवसाय योग्यरीत्या चालू लागला.

 

त्या काळी संपूर्ण पिढीच बाबासाहेबांच्या ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ या घोषवाक्याने प्रेरित झालेली होती. ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो जो ते प्राशन करेल, तो तो गुरगुरायला लागेल,’ असे बाबासाहेब म्हणायचे. आई शिक्षणाचं महत्त्व जाणून होती. तिने आम्हा भावंडांचे नाव शाळेत घातले व शिक्षणाकरिता आग्रह करीत होती. अभ्यास करण्यास ती नेहमी प्रवृत्त करायची व वेळोवेळी बाबासाहेबांचे उदाहरण द्यायची. त्याकाळी बहुतांश मुले शाळेत जाणे टाळायची. त्यामुळे फक्त १० ते १५ टक्के मुले चौथ्या वर्गापर्यंत पोहोचायची. चौथ्या वर्गापर्यंतची शाळा एक किमी अंतरावर, पाचवी ते सातवीपर्यंतची शाळा अडीच किमी अंतरावर, आठवी ते दहावीपर्यंतची शाळा सहा किमी अंतरावर होती. त्यामुळे दहावीपर्यंत पोहोचणाऱ्या मुलांचे प्रमाण नगण्य होते. त्यातही खूप कमी मुले दहावी पास व्हायची व पहिल्या प्रयत्नात पास होणारी खूपच कमी असायची. अशा परिस्थितीत माझा थोरला भाऊ चंद्रसेन हा पहिल्याच प्रयत्नात दहावी पास झाला व त्यातूनच मला शिकण्याकरिता प्रेरणा मिळाली. नापास झालेली मुले मोलमजुरीचे काम करायचे व हीच प्रथा गावात होती. दारू पिणे, चोऱ्या करणे, भांडण करणे, जुगार खेळणे असले प्रकार गावात नेहमीच व्हायचे. आपल्याला अशा प्रकारचे जीवन जगायचे नाही, असे आमची आई आम्हाला सतत सांगायची. सन्मानाने, चांगलं जीवन जगण्यास आम्हाला ती सतत प्रवृत्त करायची. सन १९८२ पर्यंत सायन्स (टेक्निकल) पहिल्या प्रयत्नात पास होणारा आमच्या गावात मी पहिलाच होतो.

 

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर मी गर्व्हमेंट पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश घेऊन स्थापत्त्य अभियांत्रिकीमध्ये पदविका प्राप्त केली. पदविका प्राप्त झाल्यानंर नोकरी केली. पण, लोकांची गुलामगिरी करण्याऐवजी आपण आपला स्वतंत्र व्यवसाय करावा असे वाटू लागले. त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम खात्यातील कार्यकारी अभियंता नी. कोसे यांची भेट घेऊन काही टेंडर देण्याची विनंती केली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला रस्ते बनविण्याच्या कामाचे टेंडर मिळाले व माझे उद्योगजगात पदार्पण झाले. तेथून मी मागे वळून पाहिलेच नाही. ‘आपले ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे. तुम्ही महत्त्वाच्या जागा काबीज करा. सामाजिक व आर्थिक गुलामगिरी विरुद्ध बंड पुकारा,’ ही बाबासाहेबांची शिकवण त्या काळी आमच्या आठवणीत होती. माझा जीवनसंघर्ष हाच माझा संदेश आहे. त्यामुळे ‘जीवनात पुढे जायचे असल्यास संघर्षाशिवाय पर्याय नाही,’ असे बाबासाहेब म्हणायाचे. जीवनाचा तोच मूलमंत्र समोर ठेवून मी जीवनाची दिशा ठरवू लागलो होतो. उद्योजकाच्या स्वरूपात काम करीत असताना माझा तळागाळातील लोकांशी संपर्क होत गेला. मी अनेक सामाजिक व व्यावसायिक संघटनांशी जुळत गेलो व एक यशस्वी उद्योजक म्हणून लोक मला ओळखू लागले. मी सध्या ‘डॉ. आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स’ या संस्थेच्या कोषाध्यपदी आहे. तसेच ‘डिक्की’ या संस्थेचा विदर्भ विभागाचा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. ‘आपण ज्या समाजातून वर आलेलो आहोत त्या समाजाप्रती आपले काही देणे लागते, ही भावना मनात ठेवून आपल्या समाजबांधवांचे कसे भले होईल, याचा सतत विचार करून योग्य ती मदत करणे, हे प्रत्येक समाजबांधवाचे कर्तव्य आहे,’ असे बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे. हीच संकल्पना उराशी बाळगून समाजाच्या आर्थिक विकासासाठी हातभर लावणे हे मी माझे कर्तव्य समजतो.

 

- गोपाल वासनिक

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@