आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडणे महत्त्वाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |
 

माझा जन्म दि. १३ जुलै, १९६९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध गाव नेवासा जिथे ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली अशा गावात झाला. माझे शक्तिस्थान माझी आई, तर प्रेरणास्थान माझे वडील. दोघेही जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित झालेले. १९८९ साली वडिलांना काविळ झाल्याने व आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांचा नोव्हेंबर १९८९ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर बर्‍यापैकी आर्थिक संकट उभे राहिले. खर्‍या अर्थाने सभोवतालचे जग काय असते? कोण आपले? असे बरेच काही कळले व अनुभवास आले. आम्ही चार भावंडे. दोन्ही बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या, तर भाऊ लहान. आईच्या उत्तम संस्कारांमुळे वाह्यातपणा नव्हता. आईने गोष्टीरुपी चर्चेतून-संवादांतून सांगितलेले महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगे महाराज असे बालपणीच मनी ठसले.

 

आई-वडिलांची नोकरीतील दैनंदिन व्यस्तता पाहून मोठेपणी नोकरी करायची नाही, असा मनात निश्चय केला होता. त्यातच पुणतांबा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेतून शाखेच्या विविध स्तुत्य उपक्रमांमुळे माझ्या सुप्त गुणांना प्रदर्शित करण्याची संधी मिळाली. यावेळी मनामध्ये आकांक्षा निर्माण झाली. ती म्हणजे, भविष्यात काहीतरी उद्योग- व्यवसाय करायचा व स्व अस्तित्व निर्माण करायचे . बारावीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेतून लोणी (प्रवरावगर) येथे पूर्ण झाले. मात्र, याच कालावधीत चुलत्यास कर्जत येथे पेट्रोलपंप मंजूर झाला व आई-वडिलांनी त्याच्या मदतीसाठी बदली करून घेतली.पेट्रोलपंपावर १९८८ पासून पेट्रोल-डिझेल सोडण्यापासून व्यवसायाशी संबंधित सर्वच कामे केली. अगदी झाडण्यापासून, तर हिशोब, बँक व्यवहार, डेपोतून टँकर आणणे वगैरे... सर्व काही महाविद्यालयीन शिक्षण सुरू होते. बी.एस्सीचे शिक्षण करून पेट्रोलपंप सांभाळला. व्यवसायाप्रती आणखीन आकर्षण वाढले व ऊर्जा निर्माण झाली.शिक्षणावेळी काही व्यापारी कुटुंबांतील मित्र स्वप्नील देसाई, सचिन जेवरे यांच्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय झाला.

 

एके दिवशी पेट्रोलपंपाचा मालक माझा भाऊ यांने काहीतरी ताण-तणावात असल्याने की काय, तोच जाणे... माझ्या अक्षरक्ष: कानाखालीच मारली. (काहीच चूक नसताना) खूप वाईट वाटले. आईला सांगितले, ती तर रडलीच आणि त्याचदिवशी मनात ठरवले की, आपल्यालाही पेट्रोलपंपाचा मालक व्हायचं आहे. मग, यासाठी काही जवळच्या सक्षम मित्रांना मदत करण्याची इच्छा वक्त केली. तीन मुलाखती दिल्या. मात्र, चौथ्यावेळी पूर्ण मानसिक तयारीसह सकारात्मक दृष्टिकोन घेऊनच अर्ज केला. मुलाखत दिली. यात विशेष मानांकनाने (गुणांनी) निवड झाली. विश्वासच बसत नव्हता. मुलाखतीनंतर लगेचच निकाल जाहीर झाला होता. जीवनातील अविस्मरणीय आनंदाचा क्षण म्हणजे जेव्हा मी पेट्रोलपंपाचा मालक झालो. उद्घाटनासाठी एचपीसीएलतील मोठ-मोठे अधिकारी आले होते दिमाखदार सोहळ्याला. मात्र, वैभव बघायला, कौतुक करायला आई-वडील हयात नव्हते, एवढीच खंत. चळवळीच्या माध्यमातून सामाजिक कार्याला १९८९ मध्ये सुरुवात झाली. डॉ. आंबेडकरांच्या विचारांशी बांधिल राहून राष्ट्रीय एकता, अखंडता अशी भावना विकसित करून समाजातील पात्र घटकांस मदत करण्याचे कार्य सुरू केले. अनेक कुटुंबांना आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत केली. आजही सुरूच आहे.

 

यात सायकलचं पंक्चर काढणार्‍यापासून चहापट्टी, पानपट्टी, छोटी बेकरी, आयते पदार्थ, हातगाडीसारख्या छोट्या व्यवसायापासून, तर खानावळ, हॉटेल, कापडदुकान, शेळीपालन, पिठाची गिरणी, ते अगदी पेट्रोलपंप यासारख्या व्यवसायांपर्यंत उभारणीसाठी पुढाकार घेऊन शासकीय मदत, बँकांची मदत मिळवून दिली. ग्रामीण भागातील किमान १५०च्यावर कुटुंबे उभी करण्यात यश मिळवता आले आहे. खरंतर मलाही पेट्रोलपंप डॉ. आंबेडकरांनी अधोरेखित केलेल्या आरक्षणामुळेच मिळाला आहे. युवा अवस्थेत असताना डॉ. आंबेडकरांनी सामाजिक आणि राजकीय विचारांची भूमिका महत्त्वाची वाटलीच पण, बांधव आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा विचार निश्चितच प्रभावशाली वाटला. बाबासाहेबांच्या या विचारांनी मी झपाटलो आहे. दलित समाजाने केवळ सामाजिक, शैक्षणिक विचार न करता आर्थिक सुबत्ता कशी होईल, यासाठी आर्थिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठीची क्रियाशील कृती महत्त्वाची आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी ‘दलित इंडियन चेंबर ऑफ कॉसर्म अ‍ॅण्ड इंडस्ट्री’ (डिक्की) या उद्योजकांच्या चळवळीत सहभागी, तर नगरजिल्हा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळतो आहे. या माध्यमातून पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली डॉ. आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्याचा मानस घेऊन प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. यातीलच एक भाग जिल्ह्यातील नवउद्योजकांचे एकत्रीकरण करून त्यांना मार्गदर्शन केले व शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामूहिक प्रोत्साहन योजने’त सहभागी होण्यास प्रोत्साहित केले. डॉ. आंबेडकरांना आदर्श मानणारा उद्योजक म्हणून हे थोडेसे पण महत्त्वपूर्ण काम सुरू केले आहे.

 

- चंद्रकांत काळोखे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@