हजारो लोकांना रोजगार द्यायचा आहे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Dec-2018
Total Views |



 
 
 
बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे, संघर्ष करण्याचा तो डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही संघर्ष करीत आहोत. आज माझ्याकडे १४० लोकं काम करतात. १४० कुटुंबांना त्यामुळे स्थिरता आली आहे. आपल्या उद्योगामुळे इतक्या कुटुंबातल्या कितीतरी व्यक्तींची आयुष्यातली फरपट थांबली आहे. हे अनुभवून मनाला शांती मिळते.
 
 
सध्या मी राहायला बारामतीला असतो. माझे बालपण इंदापूर तालुक्यातील गोखळी या छोट्याशा गावात गेले. प्राथमिक शिक्षण याच छोट्या गावात झाले. वडील पेशाने शिक्षक होते. आई गृहिणी होती. वडिलांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या इतर भावंडांचा सांभाळही त्यांनीच केला. त्यामुळे आमचे जीवन हे काटकसरीचे होते. तसेच आम्ही गोपालन व आई टेलरिंगचा व्यवसाय करायची. त्यामुळे शाळेतून घरी आलो की, जनावरांचा सांभाळ करावा लागे. दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर लगेच नोकरी मिळावी म्हणून आयटीआयला प्रवेश घेतला व आयटीआय पूर्ण केल्यानंतर एक-दोन कंपन्यांमध्ये काम केल्यावर एसटीमध्ये साहाय्यक मेकॅनिकची नोकरी मिळाली. नोकरी करत असताना सामाजिक संघटनेशी माझा संबंध आला. सदरच्या चळवळीत काम करत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मिळाली. बाबासाहेबांचे सर्व लिखाण वाचल्यावर आत्मविश्वास वाढला. नेतृत्वगुण आत्मसात केले आणि नेतृत्वगुणामुळे मानसन्मान वाढला. नेतृत्वगुणामुळे युनियन लिडर म्हणून काम करू लागलो. याच काळात लिडर म्हणून काम करत असताना अधिकारी लोकांशी वैर निर्माण झाले व एकेदिवशी मला काढून टाकण्यात आले. मागे वळून पाहिले, तर संसाराचा गाडा माझ्या जीवावर व मानसन्मानाने जगायचे, तर नोकरीशिवाय जगू शकत नाही, हे लक्षात आले. म्हणून व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले व नोकरीत असताना सोसायटी काढून किरणा मॉल चालू केला.
 

दोन-तीन वर्षे मॉल चालविल्यानंतर माझ्या लक्षात आले की, कुटुंब याच्यावर चालू शकते. नंतर मी नोकरीचा राजीनामा दिला पण, जेव्हा मी मॉल चालू केला होता त्यावेळी आजूबाजूचे लोक असे म्हणाले होते, हे तुझे काम नाही.तुमचे पारंपरिक काम दुसरे आहे. खूप नकारात्मक प्रचार झाला होता. पण मी रात्रंदिवस काम करून किंमती आटोक्यात आणून हा मॉल यशस्वी केला. सदर मॉल हा माझी पत्नी ज्योती हिने सहकार्य केल्यामुळे मी उभा करू शकलो. राजीनामा दिल्यानंतर मी गारमेंट्सच्या पाच मशीन्स घेऊन कापड दुकानात लागणाऱ्या शॉपिंग बॅगचा व्यवसाय केला. सदरचा व्यवसाय एका गाळ्यात चालू होता. हळूहळू चार गाळ्यात चालू केला. नंतर तिथे बॅगसोबतच मी युनिफॉर्मचे व टी-शर्टचे काम सुरू केले. सदरची जागा कमी पडल्याने एमआयडीसीची आठ गुंठे जागा घेऊन व्यवसाय चालू केला. हे करत असताना मला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. खूप अडचणी आल्या. माझे खाते बँक ऑफ इंडियामध्ये होते. कितीतरी वेळा प्रस्ताव दिले. पण, मंजूर झाले नाही. या कामी मला कुठूनही सहकार्य मिळाले नाही. विषादाने म्हणावे लागेल की, त्यावेळीही जातपात पाहून काम देण्याची जणू पद्धतच होती. त्याचा खूप मोठा फटका माझ्या व्यवसायाला झाला व माझा व्यवसाय डळमळीत झाला. आजपर्यंत मला मागासवर्गीय म्हणून कोणत्याही योजनेचा लाभ मिळाला नाही. परंतु, न डगमगता मी माझ्या मित्रांच्या सहकार्याने बारामतीमध्ये टेक्स्टाईल पार्कची निर्मिती होत होती. त्यामध्ये प्लॉट बुकिंग केला व काम चालू केले. आज एक एकरमध्ये माझी इंडस्ट्री असून दहा कोटी त्याचे व्हॅल्युएशन आहे. माझे काम बऱ्यापैकी सुरळीत चालू आहे. मी होम डेकोरेटर्सचा ब्रॅण्ड तयार केला असून येणाऱ्या दोन वर्षांत ५० आऊटलेट चालू होतील, असे नियोजन केले आहे. पण, मागासवर्गीय असल्याने बँकर्स व इतर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे.

 

परंतु, बाबासाहेबांनी जो विचार दिला आहे, संघर्ष करण्याचा तो डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही संघर्ष करीत आहोत. आज माझ्याकडे १४० लोकं काम करतात. १४० कुटुंबांना त्यामुळे स्थिरता आली आहे. आपल्या उद्योगामुळे इतक्या कुटुंबातल्या कितीतरी व्यक्तींची आयुष्यातली फरपट थांबली आहे. हे अनुभवून मनाला शांती मिळते. असेही वाटत राहते की, बाबासाहेबांनी समाजाला सुख मिळावं म्हणून आयुष्यभर कष्ट केले. ते म्हणाले होते, ‘समाजाला विसरू नका.’ आज कळत नकळत का होईना, मी समाजासाठी काही तरी करतो ही जाणीव मनाला सुख देते. बाबासाहेबांनी मोठी स्वप्न पाहिली. त्या स्वप्नांमधूनच कोट्यवधी लोकं माणसात आली. मीसुद्धा एक मोठे स्वप्न पाहिले आहे. ते म्हणजे येणऱ्या पाच वर्षांमध्ये एक हजार लोकांना रोजगार देण्याचे. बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी आज त्यांना मानवंदना म्हणून या स्वप्नांची पूर्ती करण्याचा प्रयत्न मी करत आहे.

 
 

- मनोज श्यामराव गायकवाड

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@