राज कपूर यांच्या हवेलीचे होणार संग्रहालय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
पेशावर : बॉलिवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते आणि निर्माते राज कपूर यांच्या वडिलोपार्जित हवेलीचे रुपांतर वस्तू संग्रहालयात होणार आहे. पाकिस्तानातील पेशावर शहरात ही हवेली असून तिचे वस्तूसंग्रहालयात रुपांतर करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. अशी माहिती पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारतीय प्रसारमाध्यमांना दिली. पेशावरच्या किस्सा ख्वानी बाजार येथे ही हवेली आहे.
 

राज कपूर, ऋषी कपूर, शशी कपूर, शम्मी कपूर, रणधीर कपूर अशी कलाकारांची मांदियाळीच कपूर घराण्याने बॉलिवुडला दिलीय. करिश्मा कपूर, करिना कपूर आणि रणबीर कपूर ही कपूर घराण्याची नवी पिढीदेखील सिनेरसिकांनी पाहिली. कपूर घराण्याच्या अनेक आठवणींचा ठेवा या वडिलोपार्जित वास्तूत दडला आहे. या हवेलीला आता पाकिस्तानच्या राष्ट्रीय संपत्तीचा दर्जा प्राप्त झाला आहे.

 

 
 

या हवेलीविषयी बोलताना पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री कुरैशी यांनी म्हटले की, आम्ही ऋषी कपूर यांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतलेले आहे. या हवेलीचे वस्तू संग्रहालयात रुपांतर व्हावे. असे ऋषी कपूर म्हणाले होते. यावर पाकिस्तान सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील प्रांत आणि केंद्र सरकारचेही या हवेलीच्या बाबतीत आता एकमत झाले आहे.

 
 

राज कपूर यांचे आजोबा आणि पृथ्वीराज कपूर यांचे वडील बशेस्वरनाथ यांनी ही हवेली उभारली होती. राज कपूर यांचा जन्म याच हवेलीमध्ये १९२४ साली झाला होता. त्यावेळी ही हवेली पाच मजली होती. काही वर्षांपूर्वी या हवेलीचा वरचा मजला कोसळला होता. ६० खोल्या असलेली ही हवेली आहे. १९४७ पर्यंत कपूर कुटंबीय या हवेलीमध्ये राहत होते. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर कपूर कुटुंबीय मुंबईत येऊन स्थायिक झाले.

 

 
 

बॉलिवुडचा एक काळ आपल्या अभिनयाने गाजवणारे अभिनेते दिलीपकुमार यांचा जन्मदेखील १९२२ मध्ये पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे वडिलोपार्जित घरदेखील किस्सा ख्वानी बाजाराजवळ आहे. दिलीप कुमार यांचे घरदेखील पाकिस्तान सरकारने काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित केले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@