जिद्द आणि जिंकण्याची ‘अभिलाषा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Dec-2018
Total Views |



 
 
 
महाराष्ट्राची महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव झळकविले आहे. तिचा हा प्रेरणादायी प्रवास...
 

महाराष्ट्रातील आघाडीची महिला कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव झळकविले आहे. तसेच विविध पुरस्कारांनी तिला वेळोवेळी सन्मानितही करण्यात आले आहे. अभिलाषाने कबड्डीमधील आपल्या खेळाच्या जोरावर अनेक पदकांची कमाई केली. तिला कबड्डी खेळताना अनेकदा दुखापती झाल्या, आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागले. परंतु, तिने कधीही हार पत्करली नाही. पुन्हा तितक्याच जोशाने खेळात पुनरागमन केले. अभिलाषाचा हा प्रवास महिला खेळाडूंकरिता निश्चितच प्रेरणादायी आहे. सध्या अभिलाषा नवी मुंबई महानगरपालिकेत क्रीडाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

 

अभिलाषा राहायला नवी मुंबईत असली तरी फक्त कबड्डी खेळायला ती चेंबूरच्या स्वामी मुक्तानंद विद्यालयात जायची. तिथूनच खरं तर तिच्या कबड्डीची सुरुवात झाली. त्यामुळे तिला कधी कधी रात्री घरी यायला उशीर व्हायचा. तेव्हा काहीही लागले, तर ती भावाला बोलावून घ्यायची. नववी ते बारावीपर्यंत सलग चार वर्षे तिने राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकविले. २००६ मध्ये पहिल्यांदा कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत अभिलाषाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. खरेतर अभिलाषा कबड्डीकडे करिअर म्हणून किंवा नोकरी मिळवायची संधी म्हणून पाहत नाही, तर आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, तसेच आपल्या नावाने आपल्याला ओळखले जावे, हीच एक गोष्ट तिच्या मनात होती. महाराष्ट्राच्या कबड्डी संघाने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणे ही एक सर्वात मोठी कामगिरी असल्याचे अभिलाषाला तिच्या सरांनी सांगितले होते. त्यामुळे ती जेव्हापासून कबड्डी खेळू लागली, तेव्हापासून महाराष्ट्राच्या कबड्डी संघात आपली निवड व्हायला हवी आणि निवड झाल्यानंतर महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून द्यावे, हेच तिचे एक स्वप्न होते.

 

जेव्हा अभिलाषाने खुल्या स्पर्धेत कबड्डी खेळायला सुरुवात केली, तेव्हा ती अतिरिक्त खेळाडू म्हणून खेळायची. मोक्याच्या क्षणी किंवा संघाला गरज असताना मैदानात उतरून गुण मिळवून द्यायची. मात्र, नंतर ती जेव्हा संघातील प्रमुख चढाईपटू बनली, तेव्हा संघाची सर्व भिस्त तिच्यावर आली. प्रतिस्पर्धी संघही तिला लक्ष्य करायला लागले. प्रतिस्पर्धी संघ तिच्याविरुद्ध रणनीती आखायचे. परंतु, अभिलाषाने आपल्या डावपेचात बदल करत प्रतिस्पर्धी संघाला वेळोवेळी धूळ चारली. प्रत्येक स्पर्धेत चढायांमध्ये आणि एकूणच खेळांमध्ये विविधता आणली. कोणताही खेळ म्हटले की, दुखापती आल्याच. त्यामुळे अभिलाषालाही काही काळ खेळापासून लांब राहावे लागले. त्यासोबत आर्थिक अडचणीही आल्या. जेव्हा तिला पहिल्यांदा दुखापत झाली, तेव्हा शस्त्रक्रिया करण्यासाठी पुरेसे पैसे तिच्या कुटुंबीयांकडे नव्हते. तिच्या वडिलांनी मोठ्या मेहनतीने त्यावेळी ते जमा केले. दुसर्‍यांदाही जेव्हा तिच्या पायाला दुखापत झाली, तेव्हा तिला चालताही येत नव्हते. तेव्हा तिच्या वडिलांनी उचलून तिला घरी आणले होते. मात्र, त्यांनी कधीही कबड्डीला विरोध केला नाही. १७ वर्षांची असताना अभिषालाने २००५ साली पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व केले. २००७ साली तिला प्रथम दुखापत झाली आणि २००८ साली पहिल्या दुखापतीतून ती सावरलीही नसताना पुन्हा एकदा दुखापत झाली. परंतु, तिच्या मनात एकदाही कबड्डी सोडण्याचा विचार आला नाही. अभिलाषा सांगते, “काहीही झाले तरी, मला कबड्डी खेळायचीच होती. त्याकाळात भरपूर काही शिकायला मिळाले. लोकांचे खरे चेहरे कळले. जे कालपर्यंत तुमची स्तुती करत होते ते आज अभिलाषा संपली... वगैरे म्हणत होते. जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीवर मात करून यश मिळवता, तेव्हाच त्याची खरी किंमत कळते,” असे ती सांगते. दुखापतींना अभिलाषा धैर्याने सामोरे गेली. आपली जिद्द, खेळावरचे प्रेम तिने तीळमात्रही कमी होऊ दिले नाही.

 

२०१० साली नव्या दमाने अभिलाषा मैदानात उतरली. तिने जोरदार पुनरागमन केले. २९ ऑगस्ट, २०१५ रोजी नवी दिल्लीत क्रीडादिनाचे औचित्य साधून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिलाषा म्हात्रेने २०१२च्या महिला विश्वचषक स्पर्धेत, तसेच २०१४ च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय महिला कबड्डी संघात उत्तम खेळ करीत देशाचे प्रतिनिधीत्व केले होते. २०१६ साली झालेल्या १२ व्या आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकाविले. ‘प्रो कबड्डी लीग’मध्ये ‘आईस दिवाज’ संघाची कर्णधार म्हणून अभिलाषाने उल्लेखनीय कामगिरी बजाविली. “कबड्डीसारख्या क्षेत्रात महिलांनी पुढे येणे आवश्यक असून, येत्या काळात कबड्डीपटूंना स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी आणखी चांगली संधी या माध्यमातून मिळणार आहे,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करत खेळातही चांगले करिअर करता येत असल्याचा तिने मोलाचा सल्ला तरुणींना दिला.

 
 
 - नितीन जगताप
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@