समांतर रस्ते विकासात मनपाचा पुढाकारच राहणार !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

मनपा आयुक्त डांगे यांची समांतर रस्ते कृती समितीला ग्वाही

 
 
जळगाव : 
 
जळगाव शहराच्या हद्दीत सुमारे 8 किलोमीटर महामार्ग चौपदरीकरण आणि समांतर रस्ते विकासाच्या कामात मनपा प्रशासन पुढाकार घेऊन कार्यवाही करेल.
 
यासाठीच प्रशासनाने महामार्गालगत जलवाहिन्यांच्या स्थलांतरासाठी 2 कोटींची तरतूद करणारा ठराव विशेष महासभेत आयत्या वेळेच्या विषयात मांडला आहे, अशी ग्वाही मनपाचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आज समांतर रस्ते कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली.
 
दरम्यान महामार्ग चौपदरीकरणाची टप्पा एकची निविदा शक्यतो शुक्रवारी (दि. 7) प्रसिद्ध होण्याची शक्यता भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी व्यक्त केली.
 
 
जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या सूचनेनुसार महामार्ग विस्तार व समांतर रस्तेसंदर्भात गेल्या रविवारी (दि. 25 नोव्हेंबरला) सर्व संबंधित अधिकार्‍यांची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाली.
 
 
त्यानंतर आठवडाभर अधिकारी व प्रशासनस्तरावर काय कार्यवाही झाली, याचा आढावा आज कृती समितीने घेतला. त्या बैठकीत काही विभागांनी कालबद्ध नियोजन केल्याचे म्हटले आहे. त्याचाही आढावा घेण्यात आला.
 
 
कृती समितीचे सदस्य शंभू पाटील, शिरीष बर्वे, डॉ. राधेश्याम चौधरी, विष्णू भंगाळे, फारुक शेख, सरिता माळी, दिलीप तिवारी, गिरीश कुळकर्णी यांनी मनपात आयुक्त डांगे यांची भेट घेतली.
 
समितीने आयुक्तांचे खास आभार मानून अधिकार्‍यांच्या बैठकीत योग्य भूमिका घेतल्याबद्दल अभिनंदन केले. भाराराप्राकडून डीपीआर संदर्भात लिखित प्रस्ताव नसतानाही प्रशासनाने मनपाच्या विशेष सभेच्या अजेंड्यात आयत्या वेळेचा विषय म्हणून जलवाहिन्या स्थलांतराचा ठराव समाविष्ट केला असून त्यावर अंदाजित 2 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे.
 
 
याबरोबरच महामार्ग विस्तार व समांतर रस्त्याच्या डीपीआरनुसार रेखांकन झाले की, अतिक्रमण हटाव व अडथळा येणारे वृक्षतोडसंदर्भातही कालबद्ध काम करण्याची तयारी मनपा प्रशासनाने केली आहे.
 
 
आयुक्त डांगे म्हणाले, महामार्ग विस्तार व समांतर रस्ते तयार होणे गरजेचे आहे. या कामाला मनपा कोणताही अडथळा होऊ देणार नाही. भाराराप्राच्या गरजेनुसार मनपा कार्यवाही करेल. यात अनेक बाबी तांत्रिक आणि वेळ घेणार्‍या आहेत. पण त्यात मनपा प्रशासन पुढाकार घेईल. जेणेकरून भाराराप्राला काम लवकर सुरू करता येईल.
 
 
शिरीष बर्वे आणि शंभू पाटील यांनी हरित लवादानुसार महामार्ग विस्तारचा आग्रह धरला. आगामी काळात महामार्गालगत अतिक्रमण हटाव, जलवाहिनी स्थलांतर, वृक्ष कटाई अशा विषयांबाबत कृती समितीला विश्वासात घेण्याचेही आयुक्त डांगे यांनी मान्य केले.
मी कामावर आलोय : सिन्हा
 
समांतर रस्ते कृती समिती सदस्यांनी भाराराप्राचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांचीही आज भेट घेतली. सिन्हा यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर विधी उरकून तब्बल दोन आठवड्यांनी सिन्हा आज कामावर परतले.
 
त्यांची भेट कृती समितीच्या सदस्यांनी घेतली. ते म्हणाले, मी आज कार्यालयात आलो. आता रोजच याचा आढावा घेऊ. टप्पा क्रमांक 1 ची निविदा तयार होत आली आहे.
 
ती बहुतेक शुक्रवारी प्रसिद्ध होईल, असेही ते म्हणाले. यापुढे धोरणात्मक कार्यवाही व कृती समितीलाही सोबत घेऊ, असेही सिन्हा म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@