अडाण : शेतकरी जीवनाची व्यथा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

राज्यनाट्य स्पर्धा : समीक्षण

 
जळगाव : 
 
सोमवारी 58व्या राज्य नाट्य स्पर्धेत साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय, दीपनगरचे राजेश पवार लिखित, दिग्दर्शित अडाण ही नाट्यकृती सादर झाली.
 
दीपनगरसारख्या लहान शहरातील हौशी कलाकार दरवर्षी या राज्य नाट्य स्पधत उत्स्फूर्त सहभाग घेत असतात. अडाण म्हणजे शेतात पिकांसोबत अनावश्यक वाढणारे तण होय.
 
शेतासोबतच आपल्या मनातही अनावश्यक असे विचार येत असतात. याच नकारात्मक विचारांना अडाण असे संबोधून, दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी मनाची व्यथा लक्षात घेतात.
 
परिस्थितीने हतबल झालेल्या मनावर नकारात्मक विचारांनी ताबा मिळवला तर माणूस आत्महत्येकडे कसा परावृत्त होतो आणि त्याचबरोबर त्या आत्महत्येने आपलं कुटुंब आपल्या पश्चात कसे पोरके होते हे दोन्ही विचारप्रवाह घेऊन राजेश पवार यांनी संवेदनशील अशी नाटकाची संहिता लिहिली आहे.
 
बळी हा शेतकरी असून तो महागाई, दुष्काळ, गरिबी अशा अनेक अडचणींनी आणि परिस्थितींनी ग्रासलेला आहे.त्याला आपल्या बायको-मुलांना सुखात ठेवावे आणि मुलांना चांगले शिक्षण द्यावे, आपल्या बहिणीचा संसार व्यवस्थित व्हावा, असे वाटत असते.
 
 
मात्र, तो गरिबीमुळे काहीही करू शकत नाही. आपण आपली शेती विकून शहरात जाऊन नवीन व्यवसाय करावा, म्हणून आपल्या वडिलांना तो नेहमी सांगत असतो.
 
मात्र, त्याचे वडील आबा तयार नसतात. यामुळे त्याचे नेहमी वडिलांशी वाद होत असतात. प्रसंगी तो घरी मद्यपान करून येत असतो. सावकाराचे कर्ज फिटेल, आपली मुले त्यामुळे सुखात राहतील म्हणून त्याच्या मनात बर्‍याचदा आत्महत्येचे विचार येत असतात.
 
 
मात्र, त्याच्यातील सद्सद्विवेक बुद्धी त्या वाईट विचारावर मात करते आणि बायकोच्या साथीने कष्ट करून पुन्हा उभ राहण्याचं तो ठरवतो. आपल्या बहिणीच्या घरी जाऊन बोलणी करून येतो आणि सुखी संसारासाठी तो सिद्ध होतो.
 
 
अशी थोडक्यात शेतकरी कुटुंबावर आधारित, शेतकर्‍यांच्या ज्वलंत समस्येवर आधारित या नाटकाची संहिता होती. संहितेची ग्रामीण बोलीभाषा आणि प्रासंगिक लहान लहान विनोद रसिकांची दाद मिळवत होते.
 
 
रमाकांत चौधरी व विष्णू तायडे यांचे नेपथ्य, संगीता पवार यांची रंगभूषा आणि वेशभूषा पूरक. सारांश पवार यांची प्रकाश योजनाही ओक्के. मात्र, महेश चव्हाण यांचे संगीत हवे ते प्रभाव टाकू शकले.
 
 
त्यातही मध्येच गीत, नृत्य सादरीकरण नाटकाची लांबी आणि चिमुरड्या बालकलाकारांच्या नृत्य आविष्कारावर टाळ्या या पलीकडे काहीही परिणाम साधू नाही शकले.
 

 
 
 
खुशाल चौधरी आणि लावण्या लाहुडकर या बालकलाकारांची नाम्या आणि चंद्रा या लहानश्या भूमिका गोड झाल्या. करुणा लाड यांनी उमाच्या भूमिकेला न्याय देण्याचा योग्य प्रयत्न केला. मात्र, इतर कलाकारांच्या अभिनयाच्या बाबतीत दिग्दर्शक कमी पडले.
 
 
संवाद फेक, आवाजाची तीव्रता, स्पष्ट उच्चार(ल,ळ,ज,ड, च) आणि नैसर्गिक अभिनय यावर मेहनत घेणे खूप गरजेचे आहे. त्यांनी योग्य ते मार्गदर्शन नक्कीच घ्यावे. काही प्रसंग लांबलचक वाटले.
 
 
मात्र, नाट्यसंस्कृतीचा अभाव असलेल्या दीपनगरसारख्या शहरातील या कलाकारांचा खेळाडूपणा, सहभाग आणि त्यांचा स्पर्धेप्रति असलेली आस्था हेच त्यांचे खरे यश आहे. त्यांच्या या प्रयत्नाचे खरोखरच कौतुक. त्यांच्या नाटकास भावी निकालासाठी
शुभेच्छा.
@@AUTHORINFO_V1@@