बहिणाबाईंच्या काव्याचा प्रभाव अनेक पिढ्यांवर कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

बहिणाबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. भालेराव यांचे प्रतिपादन


 
 
जळगाव : 
 
बहिणाबाई हा चमत्कारच असून काळालादेखील बहिणाबाई पुन्हा घडवता येणार नाही. जात-धर्म-प्रांत आणि भाषेच्या सीमा ओलांडलेल्या या कवयित्रीचा प्रभाव अनेक पिढ्यांवर कायम राहिला आणि भविष्यातही राहील, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी केले.
 
 
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त 3 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रा. इंद्रजित भालेराव यांचे व्याख्यान झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
 
 
कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.अनिल डोंगरे, कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.आशुतोष पाटील यांची उपस्थिती होती.
 
 
प्रा.भालेराव म्हणाले की, वङ्मय हे आयुष्याशी निगडित असते. ज्ञान अथवा विज्ञान काळानुरूप बदलत असते. मात्र वाङ्मय चिरंतन असते. बहिणाबाईंचे वाङ्मयदेखील चिरंतन आहे.
 
बहिणाबाई हा चमत्कारच समजला पाहिजे. विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव देता येते. मात्र विद्यापीठाला बहिणाबाई निर्माण करता येणार नाही. काळालाही बहिणाबाई घडविता येणार नाही.
 
 
जगातील कोणत्याही भाषेत बहिणाबाईंसारखी कवयित्री निर्माण झालेली नाही. बहिणाबाईंना कोणी घडविले नाही. त्या शिकलेल्या नव्हत्या, म्हणूनच त्यांना एक चमत्कारच म्हटले पाहिजे.जाती-धर्माच्या सीमा त्यांनी कधीच ओलांडल्या. विज्ञान न शिकतादेखील त्यांच्या कविता अंधश्रद्धेच्या आहारी जाणार्‍या नाहीत.
 
 
त्यांच्या कविता मराठी स्त्री साहित्यात मॉडेल झालेल्या आहेत, असे सांगताना प्रा.भालेराव यांनी बहिणाबाईंच्या काव्यनिर्मितीची प्रक्रिया आणि काही कवितांचे पदर उलगडून दाखविले.
 
प्रा. भालेराव यांनी विद्यापीठातील बहिणाबाई चौधरी अध्ययन केंद्राने लेवा समाजाचा इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करावा तसेच बहिणाबाईंच्या कवितांचा हिंदी व इंग्रजी अनुवाद करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
 
 
याशिवाय बहिणाबाईंच्या कवितेचा मूळ लेवा बोलीभाषेत शोध घ्यावा, अशा काही सूचना केल्या. इंद्रजित भालेराव यांनी स्वत:च्या दोन कवितादेखील सादर केल्या.
 
 
प्रारंभी केंद्राचे प्रमुख डॉ.आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नेत्रा उपाध्ये या विद्यार्थिनीने केले. संगीत विभागप्रमुख प्रा.संजय पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती जोशी व भाग्यश्री भंगाळे यांनी बहिणाबाईंची गीते सादर केली. हार्मोनियमवर अक्षय गजभिये व तबल्यावर राहुल कासार यांनी साथ दिली. उत्कर्षा माळी, कल्याणी वाणी यांनी साथसंगत केली.
नाव दिल्यामुळे जबाबदारी वाढली : कुलगुरु
 
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्यापीठाला बहिणाबाईंचे नाव दिल्यामुळे जबाबदारी वाढली असल्याचे सांगून महिला सक्षमीकरणासाठी विद्यापीठ पावले उचलत असल्याचे सांगितले.
 
बहिणाबाईंच्या कवितांमध्ये तत्त्वज्ञान सांगण्याची ताकद आहे. जगण्याबद्दल, माणसांबद्दल त्यांनी कधीच कुरकुर केली नाही. निसर्ग, पाऊस, शेतीतील कामे, घरातील कामे, सण-उत्सव नातीगोती अशा सगळयांशी समरस होऊन बहिणाबाई जगल्या, असेही ते म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@