परप्रांतीयत्वाचा ‘राज’राग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |
 

अन्य राज्यातील मंडळींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात रोजगाराच्या संधी शोधाव्या, मराठी शिकावे, रोजगाराबाबत त्यांच्या राज्यकर्त्यांना जाब विचारावा वगैरे मुद्द्यांची राज यांनी उजळणी केली. हिंदी भाषिकांसमोरच हिंदीला, हिंदी माध्यमांना राजद्वेषी ठरवत त्यांनाही दूषणे देऊन झाली. पण, प्रश्न हाच की, या सगळ्याचे फलित ते काय?

 

समस्येतून मार्ग काढण्याचा एक मार्ग म्हणजे संवाद. पण, फक्त संवाद साधून चालत नाही, तर तो ‘सुसंवाद’ असावा लागतो. शनिवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही असाच एकतर्फी संवाद साधण्याचा प्रयत्न केला खरा आणि म्हणूनच तो ‘सुसंवादा’पासून शेकडो मैल दूरच होता. कारण, राज यांचा हा संवाद होता उत्तर भारतीय मुंबईकरांशी. होय, तेच उत्तर प्रदेश, बिहार व अन्य राज्यातील मंडळी ज्यांना राज ठाकरे ‘परप्रांतीय’ संबोधतात. याच अन्य राज्यातील मंडळींच्या विरोधात आंदोलने छेडून प्रसिद्धीझोतात राहिलेल्या राज यांनी उत्तर भारतीय महापंचायतीचे निमंत्रण स्वीकारले आणि एरवी यांच्याच मनसेचे कार्यकर्ते चोप चोप चोपतात, त्याच लोकांसमोर उभे राहून मनसे अध्यक्षांनी ज्ञान पाजळले. फरक एवढाच की, उपस्थितांना आपण काय बोलतोय ते समजावे म्हणून एरवी हिंदीचा बेंबीच्या देठापासून तिरस्कार करणार्या राज ठाकरेंनी त्याच हिंदी भाषेचा आधार घेतला आणि वर हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचा पुनरुच्चार करायलाही ते नेहमीप्रमाणे विसरले नाहीत. राज यांची बोलीभाषा कुठलीही असो, मुद्दाही तोच जुनाच. राज ठाकरे यांनी हे निमंत्रण स्वीकारुन स्वत:च्याच हातून स्वत:च्याच पदरात मोठेपणा पाडून घेण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला. बघा, ज्यांचे ठेलेच्या ठेले मनसैनिकांनी रस्त्यावर उपडे केले, आपली दहशत बसावी म्हणून ज्या उत्तर भारतीय फेरीवाल्यांना रस्त्यावर बेदम धुतले, त्यांच्या टॅक्सी-रिक्षा फोेडून आर्थिक नुकसान केले, त्याच समाजाच्या व्यासपीठावर आज हेच राज ठाकरे डरकाळ्या फोडत भाषण झाडत होते. तिथे बसलेलेही मग अगदी गपगुमान मुद्दे पटो अथवा न पटो, राजवाणी ऐकत होते. त्यांना दुसरा पर्याय तरी काय म्हणा. कारण, त्या महापंचायतीत एखाद्याने खोडा घालण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याला तिथेच उभं-आडवं खोडायलाही राज ठाकरेंच्या मनसैनिकांनी मागे-पुढे पाहिले नसते. अन्य राज्यांतील मंडळींनी त्यांच्या त्यांच्या राज्यात रोजगाराच्या संधी शोधाव्या, मराठी शिकावे, रोजगाराबाबत त्यांच्या राज्यकर्त्यांना जाब विचारावा वगैरे मुद्द्यांची राज यांनी उजळणी केली. हिंदी भाषिकांसमोरच हिंदीला, हिंदी माध्यमांना राजद्वेषी ठरवत त्यांनाही दूषणे देऊन झाली. पण, प्रश्न हाच की, या सगळ्याचे फलित ते काय?

 

राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेपासूनच मराठी माणूस आणि अन्य राज्यातील मंडळींना विरोधाचा मुद्दा लावून धरला. तो मुद्दा ३६५ दिवस चालणार नाही म्हटल्यावर टोलचा प्रश्नही हाती घेतला. पण, मनसेच्या स्थापनेला जवळजवळ एक दशक लोटले तरी हे मुद्दे ‘जैसे थे’च आहेत. सुरुवातीला याच मुद्द्यांवर लोकप्रियता पदरी पाडून मनसेचे १३ आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडूनही आले. पण, आता या राजाला साथ द्यायला साधे सात नगरसेवकही नाहीत. म्हणजेच, राजकीयदृष्ट्या वरकरणी तरी मनसे आक्रमक, सक्रिय वाटत असली तरी राज्याच्या राजकारणात या पक्षाला विशेष दखल घ्यावी, असे स्थान नाही. राज ठाकरेंच्या या भाषणामुळे मुंबईतील उत्तर भारतीय मतदार झाले गेले गंगेला मिळाले म्हणून त्यांना मतदानही करणार नाहीत, याची राज यांना पूर्ण जाणीव आहेच. त्याचबरोबर राज यांच्या भाषणाचा उत्तर प्रदेश, बिहारमधील राजकारण्यांवर काही परिणाम होईल, याचीही सुतराम शक्यता नाहीच. बेरोजगारीमुळे उत्तर भारतात पिचलेले लोंढेच्या लोंढे राज यांच्या भाषणानंतर मुंबईवर आदळणारच नाहीत, असेही कोणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. मग अन्य राज्यातील मंडळींना संबोधित करून राज ठाकरे यांनी नेमके साधले तरी काय?

 

मी म्हणजे महाराष्ट्र, माझा आवाज म्हणजेच मराठी माणसाचा आवाज’ वगैरे आविर्भावात वावरणार्‍या यांच्या पक्षासमोर मग निवडणुकांत कुठे माशी शिंकते? का लोक राज ठाकरेंचे भाषण, सभा चवीने ऐकतात, पण मतदान कक्षात इंजिनासमोरचे बटनही दाबत नाही, याचा राज यांनी विचार करावा. याच महापंचायतीत बोलताना राज्याराज्यांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध-स्पर्धा असावी, असेही राज म्हणाले. पण, याच राज यांना तरीही मग गुजरातची प्रगती इतकी का खुपते? ज्या गुजरातच्या प्रगतीचे ते कोडकौतुक करायचे, ते गुजरात यांना एकाएकी शत्रू राज्य का वाटू लागले? ‘मोदींना पंतप्रधान म्हणून समर्थन देणारा पहिला मीच’ हे आज जिथे-तिथे कंठशोष करून सांगणारे राज ठाकरे मोदींवर किती खार खातात, ते वेगळे सांगायला नकोच. ‘मोदी मुख्यमंत्री म्हणून असे होते, पंतप्रधान म्हणून तसे झाले,’ या त्यांच्या तर्काला काय म्हणावे? माणसाची भूमिका बदलली की साहजिकच त्याची ध्येयधोरणेही बदलतात. मोदींनी मुख्यमंत्री म्हणून गुजरातचा विचार केलाच, पण आता ते पंतप्रधान म्हणून ‘राष्ट्र प्रथम’ हेच तत्त्व अवलंबताना पावलोपावली दिसतात. पण, ज्यांना ‘मोदी’ नावाची कावीळच झाली असेल, त्यांना सुस्पष्ट चित्र दिसणार तरी कसे म्हणा... राज यांचीही तीच गत. मोदीविरोधकांच्या सूरात सूर मिसळून राज ‘मीटू मीटू’ म्हणून पोपटपंची करत असले तरी त्यांना मोदीविरोधी महाआघाडीत कदापि स्थान मिळणार नाही. महाराष्ट्राच्या तथाकथित ‘जाणत्या राजा’ची तुम्ही प्रकट मुलाखत घ्या किंवा मांडीला मांडी लावून विमानप्रवास करा, घडाळ्याच्या काट्यावर काही इंजिन धावणार नाही, हे निश्चित. राजकारणात अशा भाबड्या आशेवर जगणारे राज नसले तरी त्यांना आज जवळ करणारा कोणताही पक्ष नाही. त्यांनी दिलेल्या टाळीची उद्धव ठाकरेंनी साधी दखल तरी घेतली का? त्यामुळे हे दोन भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘किंगमेकर’ वगैरे ठरतील, याची सध्या तरी सुतराम शक्यता नाहीच. म्हणून, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तुमचे वैयक्तिक संबंध अगदी दृष्ट लागावी इतके उत्तम असले तरी शेवटी राजकारणात राज ठाकरे आज एकटेच आहेत.

 

त्यामुळे राजकीय पक्ष चालवणे हे बंगल्यात काचेच्या दाराआड बसून कॅनव्हासवर फटकारे मारण्याइतके सोपे नाही. चित्रांमध्ये एकवेळ मारलेल्या उभ्या-आडव्या रेषा खोडताही येतात, कॅनव्हासही बदलता येतो, पण राजकारणात एकदा ओढलेली रेष सहजासहजी कधीही पुसता येत नाही. राजकारणाचा कॅनव्हास हा म्हणूनच सर्वांना झेपणारा नाही. जसे कॅनव्हासवरील सगळ्याच रेषा सरळ नसतात, तसाच राजकीय प्रवासही सरळ नसतो. एका विशिष्ट समाजाला, जातीला किंवा धर्माला सोबत घेऊन राजकारण दीर्घ काळ चालत नाही. तुम्हाला सर्वांना सोबत घेऊनच पुढच्या धोपट मार्गावर वाटचाल करावी लागते. पण, दुर्देवाने मनसेच्या बाबतीत हे होणे नाही. एकांगी मुद्दे, पक्ष पातळीवर निसटत चाललेली पकड आणि कार्यकर्त्यांसमोर नसलेला कुठलाही ठोस कार्यक्रम यामुळे मनसेच्या इंजिनाला दिशा बदलण्याचीही नामुष्की वारंवार ओढवली. “एकहाती सत्ता द्या, बघा मी महाराष्ट्र कसा चालवून दाखवतो,” या उक्तीत आणि प्रत्यक्ष कृतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. पण, ते समजून घेण्यासाठीची राजकीय लवचिकता दुर्देवाने मनसेपाशी आजघडीला तरी दिसत नाही, असेच खेदाने म्हणावे लागेल.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@