सुप्रजा आयुर्वेदीय दृष्टिकोन भाग - १

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |
 
 

‘सुप्रजा’ म्हणजे चांगली (उत्तम) संतती. प्रत्येक विवाहीत दाम्पत्याची आपले मूल धष्टपुष्ट, सुंदर, बुद्धिमानी आणि दीर्घायुषी व्हावे, अशी आंतरिक इच्छा असते. हल्लीच्या काळात एकच मूल (मुलगा किंवा मुलगी) प्रामुख्याने प्रत्येक घरात जन्मते. (याला अपवाद नक्कीच आहेत) जर एकच संतती असली, तर ती सुखरूप, सुस्वभावी, आरोग्य संपन्न आणि अन्य उत्तमोत्तम गुणयुक्त दिसावी, ही अभिलाषा मनोमनी पल्लवीत होणे, स्वाभाविक आहे. हे सर्व शक्यही आहे. ते कसे? ते या लेखातून जाणून घेऊया.

 

हल्ली बहुतांशी महिलांमध्ये मासिक स्रावाचा त्रास आढळतो. काही आजार- जसे PCOD, Hyper-thyroidism, Obesity इ. ने ग्रस्त असतात. शिक्षण, नोकरी, आर्थिक स्थैर्याच्या स्पर्धेत विवाहेच्छुक असूनही लग्नाची वेळ खूप उशिरा येते. पौगंडावस्था संपवून तारुण्यावस्था जेव्हा सुरू होते, अशा वेळेस स्त्री व पुरुष यांच्या शरीरात विविध बदल होऊ लागतात Secondary Sexual Characters विकसित होऊ लागतात आणि हळूहळू शरीर प्रजननक्षम होते. वयाच्या १८व्या वर्षापर्यंत मुली आणि २१व्या वर्षापर्यंत मुलगे हे प्रजननशील होतात. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात तिच्या जन्माच्या वेळेसच प्रत्येक अंग-अवयव उपस्थित असतात. केवळ वेळ आली की, ती ती संस्था (System) कार्यान्वित होते. कार्य करायला सुरुवात करते. बीजकोषामध्ये (Ovaries) ठराविक संख्येने बीजे (Ovum) असतात. रजस्वला (Menarche), बोली भाषेत यालाच ‘वयात येणे’ असे म्हटले जाते. पूर्वी ही संस्था (Reproductive System - प्रजनन संस्था) विकसित नसते, सुप्तावस्थेत असते. मासिक पाळी सुरू होणे म्हणजे ही "ovum bank' सुरू होणे होय. प्रत्येक महिन्यात बीजकोषातून एकदा उजव्या, एकदा डाव्यामधून (Alternate Ovaries) एक-एक स्त्रीबीज निघते. जेव्हा हे स्त्रीबीज, पुरुष बीजाशी संयुक्त होते, तेव्हा गर्भधारणा होते. जर पुरुष बीजाशी स्त्रीबीजाचा संपर्क आला नाही, तर मासिक स्रावावाटे ते शरीराबाहेर निघते. हे चक्र दर महिन्याला स्त्रीशरीरात घडत असते. वयाच्या १५-१६व्या वर्षापासून ४२-४५व्या वर्षापर्यंत प्रजननक्षमता स्त्रीमध्ये असते. याला ‘प्रजननक्षम वय’ (Fertile Age) म्हणतात. पण, आधी म्हटल्याप्रमाणे काही आजारांमुळे हे नियमित असणारे हे चक्र बिघडते. ते सुरळीत करणे महत्त्वाचे आहे.

 

शरीराचा, मनाचा, संवेदनांचा खूप घनिष्ठ संबंध आहे. मन त्रासलेलं, उद्विग्न, हताश असल्यास खूप चिंतातूर असल्यास झोपेचे तंत्र विस्कटते. त्याचप्रमाणे पचनशक्तीही मंदावते. या सगळ्याचा परिणाम शरीरावर तर होतोच. पण, अंत:स्रावी ग्रंथींच्या स्रावांवर लगेच परिणाम होताना आढळतो. PCOD इ. आजारांमध्ये मनाचाही विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही वेळेस शारीरिक व्याधींमुळे, तर काही वेळेस करिअरमध्ये स्थिर होईपर्यंत थांबल्यामुळे, उशिरा लग्न होते. आधी सांगितल्याप्रमाणे बीजकोषामध्ये ठराविक स्त्रीबीजं असतात. मर्यादित वेळेपुरते (१५-४५ वर्षे) ती कार्यरत असतात. जसजसे वय वाढत जाते, याची संख्या कमी होत जाते. शरीराची क्षमता कमी होते आणि मग गर्भधारणा होण्यास कष्ट पडतात, त्रास होतो. त्यामुळे जसे खूप लवकर (१६ ते १८ वयापर्यंत) शरीर संपूर्णपणे गर्भधारणेसाठी सक्षम नसते, कोवळे असते. तसेच ३५व्या वयानंतर प्राकृत गर्भधारणा होणे आणि विनासायास संपूर्ण गर्भारावस्था निभावणे खडतर होते. जसजसे गर्भिणीचे वय वाढते, साधारणत: ३०व्या वर्षानंतर Hip Girdle आपल्या कमरेची हाडे व सांधे (Joints) अधिक स्थिर होतात. सांध्यांमधील लवचिकता कमी होऊ लागते. म्हणून काही वेळेस प्राकृत प्रसुती होत नाही. सिझरीयन शस्त्रक्रिया करावी लागते. हे झाले शारीरिक बदल. याच सुमारास मानसिक बदलही खूप घडत असतात. करिअरमध्ये जर प्रगती होत असल्यास त्यात अडथळा येईल का गर्भधारणेमुळे? ही एक भीती मनात मनात डोकावते. आहे ती परिस्थिती चांगली आहे, रुटिन सुरळीत सुरू आहे. ते का मोडा? इ. विचारही काही दाम्पत्य करतात. उशिरा लग्न झाल्यावर लगेच गर्भधारणा नको असते, अजून एकामेकांना नीट ओळखले नाही, असे मत असते किंवा लगेच अडकायचे नसते. एन्जॉय करायचे असते. या विचारांनी गर्भनिरोधक गोळ्यांसारखे उपाय केले जातात. जेव्हा आंतरिक इच्छा जागृत होते तेव्हा गर्भधारणा होत नाही, असे कित्येक वेळा घडलेले आहे.

 

गर्भधारणा म्हणजे स्त्री बीज व पुरुष बीजाचे मिलन एकत्रीकरण. गर्भामध्ये जे जे गुण येतात, ते सर्व या बीजांमधूनच. स्त्री शरीर हे गर्भधारणेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. गर्भधारणेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट आहे. गर्भधारणेसाठी आयुर्वेदाने चार गोष्टी गरजेच्या मानल्या आहेत. त्या म्हणजे ॠतू, शेत्र, अम्बु आणि बीज. ‘ऋतू’ म्हणजे Fertile Period. (याबद्दल पुढे विवेचन करेन) ‘क्षेत्र’ म्हणजे गर्भाशय. गर्भाशय उत्तम स्थितीत राहणे ही एक गर्भधारणेसाठी Prerequisite period आहे. ‘अम्बु’ म्हणजे गर्भाशयात गर्भ राहिल्यानंतर ते ज्या स्रावात राहते ते आणि ‘बीज’ म्हणजे स्त्री बीज आणि पुरुष बीज. म्हणजे चार घटकांपैकी पुरुष बीजाव्यतिरिक्त सर्व काही स्त्रीबीजाशी निगडीत आहे. उत्तम प्रजा निर्माण होण्यासाठी हे चारही घटक उत्तम असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जसे शेतात चांगले पीक येण्यासाठी त्याची आधी मशागत केली जाते, त्यातील तृणे काढली जातात आणि उत्तम बियाणे वापरले जाते, तसेच उत्तम संततीसाठी नियमित मासिकस्राव चक्र, उत्तम स्वास्थ्य हे स्त्री व पुरुष दोघांसाठी गरजेचे आहे.

 

गर्भामध्ये मातेचे व पित्याचे गुण सूक्ष्म स्वरूपात असतात. काही गुण मातेचे येतात, तर काही गुण पित्याचे. जसे गुण त्याच्यात येतात तसेच अवगुणही येतात. मातेला व पित्याला जे काही आजार, संसर्ग, अॅलर्जी, रोग, वाईट सवयी इ. असतात ते कळत-नकळत पालक पाल्यांमध्ये सोडतात. जर संतती निरोगी आणि सुदृढ हवी असेल, तर त्याला मिळणारे खत-पाणी, बीज इ. ही उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी आयुर्वेदाने संपूर्ण शरीरशुद्धी योजिली आहे. ही शरीरशुद्धी गर्भधारणेपूर्वीकरून घेणे महत्त्वाचे आहे. दोन्ही बाजूंनी गर्भनिर्मिती होत असल्यामुळे दोन्ही भविष्यात होणाऱ्या पालकांनी शरीरशुद्धी करून घेणे अनिवार्य आहे. उदा. मातेला किंवा पित्याला जर सर्दीचा त्रास असल्यास, दमा, आम्लपित्त, त्वचा विकार, टक्कल इ. असल्यास तर ते गर्भधारणेच्या वेळेस बीज स्वरूपातून गर्भाला प्राप्त होते. ते सुप्तावस्थेत राहावे किंवा गर्भामध्ये उत्पन्न होऊ नये म्हणून उभयतांनी पंचकर्मातील वमन, विरेचन व बस्ती ही कर्मे वैद्यांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली करून घ्यावीत. यासाठी दोन ते तीन महिने लागतात. मासिकचक्र जर अनियमित असेल, तर ते आधी नियमित करावे. त्यासाठी विविध औषधी चिकित्सा व पंचकर्मांचा उत्तम फायदा होतो. 'Fertile Period' म्हणजे गर्भधारणा होण्यासाठीचा उत्तम काळ बघून त्यानुसार गर्भधारणेसाठी तयार व्हावे. 'Fertile Period' हा रज:स्रावापूर्वी १०व्या दिवसापासून १८-२०व्या दिवसापर्यंत असतो. यातील १२ ते १६ हा उत्तम काळ आहे. हे वैद्याच्या सल्ल्याने व मार्गदर्शनाखालीच अवलंबावे. याबद्दल अधिक विस्तृत विवेचन पुढच्या भागात...

 
 
 - वैद्य किर्ती देव
 

(क्रमशः)

 

(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@