अर्थव्यवहार : डिसेंबर महिनाही तेजीच्या बैलांचाच! मंदीच्या अस्वलांच्या विश्रांतीचाही..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |


 
 
 
सध्याचा डिसेंबर महिनाही ‘तेजीच्या बैलांच्या चौखूर उधळण्या’चाच असून ‘मंदीच्या अस्वलांच्या विश्रांती’चाही असल्याचे आढळून आले आहे !
 
गेल्या नोव्हेंबरात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेन्सेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे पुन्हा अनुक्रमे 36 हजार बिंदू व 10 हजार 800 बिंदूंवर आले होते.
 
जर अशीच स्थिती डिसेंबरात कायम राहिली तर निफ्टी लवकरच 11 हजार बिंदूंच्याही पलीकडे जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे.
 
या आधीचा इतिहास पाहिला तर गेल्या महिन्यातील तेजी या महिन्यातही कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या दशकभरा(दहा वर्षा)तील आकडेवारी पाहिली तर असे दिसून येईल की दहा पैकी सात वर्षांच्या डिसेंबरात शेअर बाजारात तेजीचेच वातावरण राहिलेले आहे.
 
सर्वात जास्त वाढ 2008 मध्ये झालेली असून सेन्सेक्सने त्यावेळी 9.1 टक्के इतकी वाढ नोंदविली होती. त्यानंतर नऊ वर्षांनी म्हणजे 2017 मध्ये डिसेंबरात 3.7 टक्के तर डिसेंबर 2010 मध्ये सेन्सेक्समध्ये 3.3 टक्के वाढ झालेली होती. मंदीच्या अस्वलांना मात्र 10 पैकी तीनच वर्षांच्या डिसेंबर महिन्यात धुमाकूळ घालता आलेला आहे !
 
2011 च्या डिसेंबरमध्ये सेन्सेक्स 6 टक्के तर 2014 मध्येही तो 3.7 टक्क्यांनी तर 2017 मध्ये तो 0.20 टक्क्यांनी घसरलेला होता.
गेल्या नोव्हेंबरात विदेशी गुंतवणुकदारांनी तब्बल 12 हजार 260 कोटी रुपये भारतीय शेअर बाजारात ओतले आहेत.
 
 
दहा महिन्यातील ही सवार्र्र्त जास्त खरेदी त्यांनी केली होती. गेल्या दशकभरातही विदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारात सर्वात जास्त खरेदी केलेली आहे.
 
 
2012 मध्ये त्यांनी सर्वात जास्त 24 हजार कोटी रुपये, त्याखालोखाल 2013 मध्ये 15 हजार 425 कोटी रुपये तर 20009 मध्ये 10 हजार 367 कोटी रुपये गुंतविले होते. या वर्षीच्या डिसेंबरातही अशीच अपेक्षा असून त्यामुळे निफ्टी 11 हजार बिंदूंपर्यंत जाऊ शकतो.
 
 
त्याचबरोबर डिसेंबर महिन्यात सर्वात जास्त चारदा विक्री विदेशी गुंतवणुकदारांनी केलेली आहे. सर्वात जास्त विक्री 2016 च्या डिसेंबरात 8494 कोटी रुपयांची केली होती.
 
 
त्याखालोखाल 2017 च्या डिसेंबरात 4747 कोटी रुपयांची तर 2014 मध्ये 864 कोटी व 2011 मध्ये 128 कोटी रुपयांची विक्री केली होती.
 
 
आता या डिसेंबरात निफ्टी सकारात्मकच राहण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे. कारण कच्च्या खनिज तेला(क्रूड ऑईल)च्या घटलेल्या किंमती व रुपयाची वाढलेली किंमत हे आहे.
 
 
मात्र क्रूडची किंमत 60 डॉलर प्रति पिंपाच्या वर गेल्यास आणि रुपया घसरल्यास पुन्हा एकदा शेअर बाजार अस्थिर होऊ शकतो. अशाही परिस्थितीत निफ्टी 10 हजार 950 बिंदू ते 11 हजार बिंदूंपर्यत जाऊ शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे.
 
 
उद्या मंगळवारी 4 रोजी भारतीय रिझर्व बँकेच्या नाणेधोरण समितीची महत्वपूर्ण दोनदिवसीय बैठक सुरु होत आहे. या बैठकीकडे शेअर बाजाराचे लक्ष लागून राहिलेले आहे.
 
 
या बैठकीत रिझर्व बँक व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण गेल्या महिन्यातील तेजी पाहता ती या महिन्यातही कायम राहण्याची शक्यता दिसत आहे.
 
 
अमेरिकेच्या फेडरल बँकेची बैठकही याच महिन्यात असून तीत व्याजदर वाढविले जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास बाजार थोडा अस्थिर होऊ शकतो.
 
 
भारतीय रुपयादेखील पुन्हा आपल्या प्रति डॉलर 68 रुपये 50 पैसे ते 69 रुपये 20 पैसे या स्तरावर जाऊ शकतो. कारण त्याने प्रति डॉलर 70 रुपयांची मानसशास्त्रीय पातळी (सायकॉलॉजिकल लेव्हाल) ओलांडलेली आहे.
 
 
या महिन्यापासून काही बदल झालेले आहेत. पॅन कार्डासाठी अर्ज करतांना पित्याच्या नावाच्या जागी मातेचेही नाव लिहिता येणार आहे. ही व्यवस्था ज्यांचे आई-वडिल काही कारणांनी एकमेकांपासून दुरावले आहेत त्यांच्यासाठी करण्यात आली आहे. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या ज्या ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक दिलेला नाही त्यांची इंटरनेट बँकिंग सेवा बंद होणार आहे.
नफावसुलीमुळे घसरलेला शेअर बाजार सावरला, सपाटीवर बंद
 
 
आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज सोमवारी नफावसुलीमुळे थोडा घसरलेला शेअर बाजार नंतर सावरुन सपाटीवर (फ्लॅट) बंद झाला. त्याच्या दोन्ही निर्देशांकात किंचित वाढ झाली.
 
 
मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक (सेंसेक्स) व राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) हे आज सकाळी अनुक्रमे 36 हजार 396 बिंदू व 10 हजार 930 बिंदूंवर उघडून दिवसभरातील व्यवहारात 36 हजार 446 बिंदू व 10 हजार 941 बिंदूंच्या उच्च आणि 36 हजार 99 बिंदू व 10 हजार 845 बिंदूच्या निम्न पातळीवर जाऊन आल्यानंतर अवघ्या 36 बिंदू व 7 बिंदूंनी वाढून 36 हजार 241 बिंदू व 10 हजार 883 बिंदूंवर बंद झाले.
 
 
बँक निफ्टीही फक्त 5 बिंदूंनी घसरुन दिवसअखेरीस 26 हजार 857 बिंदूंवर बंद झाला. भारतीय रुपया तब्बल 78 पैशांनी घटून प्रति डॉलरमागे 70 रुपये 37 पैशांवर आला होता.
 
 
कच्चे खनिज तेल(क्रूड) 178 रुपयांनी वाढून 3754 रुपये प्रति पिंप या दरावर तर सोने 407 रु. नी वाढून प्रति दहा ग्रॅममागे 30 हजार 647 रुपये असे ‘चकाकले’ होते.
@@AUTHORINFO_V1@@