दिव्यांगांनी शारीरिक व्यंगाला हटवून मतदान करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Dec-2018
Total Views |

दिव्यांग दिनानिमित्त जिल्हाधिकारी निंबाळकर यांचे प्रतिपादन


 
जळगाव : 
 
भारत निवडणूक आयोगाने ‘सुलभ निवडणुका’ हे घोषवाक्य जाहीर केले आहे. निवडणूक कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढावा, यासाठी त्यांना अतिविशेष व्यक्तीचा दर्जा देण्यात आला आहे.
 
त्यामुळे दिव्यांग व्यक्तींनी आपल्यातील शारीरिक व्यंगाला हटवून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा निश्चय करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले.
 
 
जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून जिल्हा निवडणूक अधिकारी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचालित जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मतदार दिवस साजरा करणे व दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थित साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
 
 
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, निवडणूक उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील, तहसीलदार अमोल निकम, भडगावचे नायब तहसीलदार मुकेश हिवाळे, चाळीसगाव येथील स्वयंदीप स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षी निकम, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे गनी मेमन, विनोद बियाणी, प्रसन्नकुमार रेदासनी, मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
नायब तहसीलदार मुकेश हिवाळे म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात दिव्यांगत्व बोचत असते. परंतु दिव्यांगांनी त्यावर मात केली पाहिजे. मला जे काही करायचे आहे ते मी करणारच, हा ध्यास घेतल्यास यश नक्की मिळेल.
 
 
मीनाक्षी निकम म्हणाल्या की, जिल्हाधिकारी निंबाळकर हे दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच संवेदनशील असतात. त्यामुळे दिव्यांगांच्या अडचणी लवकर दूर होत आहे.
 
 
आयोगाने आपल्याला अतिविशेष व्यक्तीचा दर्जा दिलेला असल्यामुळे आपलीही जबाबदारी वाढली असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. यावेळी गनी मेमन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
 
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व डॉ. हेलन किलर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविकात मुकुंद गोसावी यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगताना शारीरिक व्यंगाला हटवू, चला मतदान करू असे सांगून आयोगाने दिव्यांगांना अतिविशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याबद्दल आभार मानले.
 
 
चाळीसगाव येथील संगीत शिक्षक अभय कसबे यांनी स्वागतगीत म्हटले. सावखेडा येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित श्रवण विकास कर्णबधिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिव्यांग मतदार दिनानिमित्त प्रबोधनात्मक नाटिका सादर केली तर दीपस्तंभ संचालित मनोबलची विद्यार्थिनी आशा हिने ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत सादर केले.
 
 
यावेळी मान्यवरांच्या हस्ते इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा, जळगाव संचालित जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राच्या वतीने दिव्यांगांना सायकल व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
 
 
कार्यक्रमास शेख अल्ताफ, गणेश पाटील, भरत चौधरी यांच्यासह दीपस्तंभ, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, निवडणूक शाखा, समाजकल्याण विभाग व विविध संस्थांचे विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सहायक आयुक्त, समाजकल्याण योगेश पाटील यांनी मानले.
@@AUTHORINFO_V1@@