चंद्राबाबूंचा विचित्र निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



चंद्राबाबूंनी विवाहित दाम्पत्यांना दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन करत इन्सेंटीव्ह देण्याची घोषणा केली. सोबतच अशा दाम्पत्यांना निवडणुका लढवता येतील, असेही सांगितले. चंद्राबाबूंच्या या एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णयामुळे मनोबल वाढलेल्या परिजनांनी पाच-पन्नास वर्षांपूर्वीचे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’चे आशीर्वाद दिल्यास नवल वाटणार नाही!


आज देशासह जगभरात ख्रिस्ती नववर्षाचे जल्लोषात स्वागत होत आहे. सोबतच देशात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जामनगरपासून दिब्रुगडपर्यंत कुठे गुलाबी, तर कुठे बोचरी, तर कुठे हाडे गोठवणारी थंडीही जाणवतेय. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी मात्र हा नववर्षाचा आणि थंडीचा क्षण राज्यातल्या नागरिकांनी दुप्पट आनंदाने साजरा करावा, या हेतूने एक मजेशीर घोषणा केली. राज्याची लोकसंख्या गेल्या १० वर्षांत १.६ टक्क्याने कमी झाल्याचे कारण पुढे करत चंद्राबाबूंनी विवाहित दाम्पत्यांना दोनपेक्षा अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले. राज्याच्या जन्मदरात घट होऊन तो २०१८ मध्ये १०.५१ टक्क्यांवर आल्याचेही त्यांनी सांगितले. सोबतच नायडूंनी जपान आणि चीनच्या लोकसंख्येचा दाखला देत या देशांत वृद्धांचे प्रमाण जास्त तर तरुणांचे प्रमाण कमी झाल्याचेही म्हटले. परिणामी, या देशांना अनेक संकटांचा व समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगत नायडूंनी राज्याच्या प्रगतीसाठी युवकांचे लोकसंख्येतले प्रमाण अधिक असावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. अर्थातच, यासाठी आतापासूनच तयारी करावी लागेल आणि तीदेखील विवाहित दाम्पत्यांनाच! विवाहित दाम्पत्यांनी जर अधिकाधिक मुले जन्माला घातली, तर लोकसंख्येतले युवकांचे प्रमाण साहजिकच वाढेल, काम करणारे आणि कुटुंबातील सदस्यांचे पोषण करणारे हातही वाढतील, याचा फायदा राज्याच्या विकासाला होईल, ही चंद्राबाबूंची यामागची धारणा. आता चंद्राबाबूंची ही विचित्र धारणा कोण किती मनावर घेतो आणि त्याबरहुकूम कामाला लागतो, हा समाजशास्त्रज्ञांच्या संशोधनाचाच विषय ठरावा.

 

चंद्राबाबू नायडूंनी आपल्या या निर्णयात विवाहित दाम्पत्यांनी हिरिरीने सहभाग घ्यावा यासाठी इन्सेंटीव्हचे लॉलीपॉपही दाखवले. जी दाम्पत्ये दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे कर्तृत्व दाखवतील, त्यांना ठराविक रक्कम बक्षिसाखातर देण्याची घोषणा नायडूंनी केली. हे बक्षीस किती रुपयांचे असेल, हे त्यांनी सांगितले नाही तरी, दोन मुलांच्या गरजा भागवून तिसऱ्यालाही न्हाऊ-माखू घालता येईल, एवढी माफक अपेक्षा नक्कीच केली जाईल. कारण, आजकाल एका मुलाचे लहानपणापासूनच्या पालनपोषणाचे सगळेच सोपस्कार, वैद्यकीय खर्च आणि नंतर येणारा शालेय खर्च पाहता, तो भागवता भागवताच पालकांच्या नाकीनऊ येते. अशात दोनपेक्षा अधिक म्हणजे मग तीन, चार वा आणखी कितीही मुले जन्माला घातली तर? म्हणजे मुलांना जन्म देता देता संबंधित महिलेच्या शारीरिक आरोग्याची ऐशी की तैशी होईलच पण, जर घरात कमावणारा एकटा पुरुषच असेल, तर त्याचेही वांधेच होतील. चंद्राबाबूंनी फक्त इन्सेंटीव्ह देण्याचेच सांगितले नाही, तर त्यांनी याचसंदर्भात आणखी एक निर्णय जाहीर केला, जो महत्त्वाचा ठरतो. सध्या दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देणाऱ्या नागरिकांना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवता येत नाहीत. पण चंद्राबाबूंनी या लेकुरवाळ्यांवरही मेहरबानी करत ही बाधाही दूर केली व अशा लोकांनाही निवडणुका लढवता येतील, हे स्पष्ट केले. चंद्राबाबूंच्या या एकापेक्षा एक धडाकेबाज निर्णयामुळे मनोबल वाढलेल्या परिजनांनी पाच-पन्नास वर्षांपूर्वीचे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’चे आशीर्वाद दिल्यास नवल वाटणार नाही! दुसरीकडे चंद्राबाबूंनी घेतलेल्या या निर्णयाचे आयुष्य किती वर्षांचे असेल? आता जन्माला येणारी मुले रांगून नंतर आपल्या पायावर उभी राहीपर्यंत तरी हा निर्णय टिकेल का? कारण, अधिकाधिक मुले जन्माला घालण्याचे काम तर विवाहित दाम्पत्ये जबाबदारीने-इमानदारीने निभावतीलच. कदाचित आगामी एका वर्षातच आंध्र प्रदेशचे रूपांतर भरल्या गोकुळात झाल्याचेही दिसेल. पण चंद्राबाबूंचे काय? चंद्राबाबूंच्या डोक्यावरील सत्तेचा चंद्र अस्ताचलाला गेला तर? नायडूंची सत्ता गेल्यानंतर त्यांच्या आवाहनाखातर कर्तृत्व दाखवलेल्यांच्या भवितव्याचे काय? ही निरनिराळे आमिषे दाखवून जन्माला आलेली संतती मोठी होईलच पण, तोपर्यंत चंद्राबाबूंचे शासन सत्तेवर राहीलच याची काय खात्री? चंद्राबाबू सत्तेवरून पायउतार झाल्यास जे सरकार सत्तेवर येईल तेदेखील हेच निर्णय कायम ठेवेल का? नाहीतर राजा उदार झाल्याच्या आनंदरंगात विवाहित दाम्पत्ये अधिकाधिक मुलांना जन्माला घालतच राहतील आणि एकाएकी या राजाच्या डोक्यावरचा मुकूट खाली उतरायचा! अशावेळी या रंगाचा बेरंगच होणार ना?

 

भारतात काही वर्षांपूर्वीहम दो हमारे दो’ हे अभियान भलतेच लोकप्रिय झाले होते. मधल्या काळात दोन मुलांच्या जन्मात तीन वर्षांचे अंतर असावे, हेदेखील आवाहन प्रत्येक ठिकाणी ऐकायला, वाचायला, पाहायला मिळायचे. ‘मुलगा अथवा मुलगी एक वा दोनच भली’, ‘छोटे कुटुंब-सुखी कुटुंब’ अशा घोषणाही नागरिकांसमोर येत असत. पण गेल्या काही वर्षांपासून कुठेही लोकसंख्यावाढीची बोंबाबोंब होताना दिसली नाही. हा चमत्कार नेमका कसा झाला? तर जगातील बलाढ्य देशांतल्या कंपन्या हजारो उत्पादनांची निर्मिती करतात. ही सगळीच उत्पादने ज्या ठिकाणी तयार होतात, तिथली लोकसंख्या-ग्राहकसंख्या मुळातच कमी आहे. म्हणून त्यांनी आपली उत्पादने खपवण्यासाठी शोधलेली बाजारपेठ म्हणजे चीन आणि भारत. प्रचंड लोकसंख्येच्या या देशांत बहुराष्ट्रीय कंपन्यांची कोणतीही उत्पादने सहजासहजी विकली जातात. पण जर ही उत्पादने विकत घेणारी लोकंच नसतील तर? साहजिकच या कंपन्यांना तोटाच तोटा होणार. म्हणजेच वाढती लोकसंख्या ही या कंपन्यांसाठी ग्राहकाचे काम करते आणि त्यातूनच बाजारपेठेत पैसाही खेळता राहतो. सोबतच जसजशी नागरिकांची नोकरी, व्यवसाय वा व्यापारी गतिविधींमुळे आर्थिक क्षमता वाढते, तसतशी त्यांच्या खरेदीशक्तीतही वाढ होत जाते. यातून फायदा होतो तो वेगवेगळ्या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचा, विक्रेत्यांचा. चंद्राबाबू नायडूंनाही या कंपन्यांचा उमाळा दाटून आला असावा, म्हणूनच त्यांनी अधिकच्या संततीनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा अजब निर्णय घेतला. जेणेकरून कंपन्यांना ग्राहकांची कमतरता कधी जाणवणारच नाही आणि सातत्याने फायदाच फायदा होत राहील. आता चंद्राबाबूंच्या या आवाहनाला भुलून किती लोक पुत्रपौत्रादीकांनी समृद्ध होतात, हे पाहावे लागेल. शिवाय या अधिकाधिक मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांचा सांभाळ करता करता कोणाची दाणादाण उडू नये ही अपेक्षादेखील केली जाईलच!

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@