तंबाखू सोडल्याने पोलीस झाले ब्रँड अॅम्बेसेडर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |

 


 
 
 
नाशिक : तंबाखूमुक्त नाशिक या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून पोलीस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे. पोलीस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांना गेल्या २७ वर्षांपासून तंबाखूचे व्यसन होते. त्यांनी हे व्यसन सोडले. संदीप गांगुर्डे यांच्या या भूमिकेचा आदर करून पोलीस आयुक्तालयाने ‘जॉइन द चेंज’ या नाशिकमधील तंबाखूमुक्त मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून त्यांची निवड केली.
 

पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काही दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात काम करणाऱ्या पोलीसांची बैठक घेतली. जॉइन द चेंज या नाशिकमधील तंबाखूमुक्त मोहिमेची माहिती पोलीसांना या बैठकीत देण्यात आली. त्यावेळी “आपल्यापैकी तंबाखू कोण खातात?” असा प्रश्न डॉ. सिंगल यांनी उपस्थितांना केला. तेथे उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांपैकी कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांनी तंबाखू खात असल्याचे मान्य केले.

 

तंबाखूचे दुष्परिणाम आणि त्यामुळे मृत्यू झाल्यास कुटुंबाला होणाऱ्या त्रासाची जाणीव पोलीस आयुक्तांनी संदीप यांना करून दिली. त्यावेळी सर्व उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर संदीप यांनी तंबाखू सोडत असल्याचे सांगितले. संदीप गांगुर्डे यांनी २००५ साली मुंबईतील पोलीस विभागात दाखल झाले होते. २०१५ साली नाशिकमधील पोलीस आयुक्तालयात त्यांची बदली झाली. गेल्या २७ वर्षांपासून संदीप गांगुर्डे यांना तंबाखूचे व्यसन होते. परंतु सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसमोर तंबाखूचे व्यसन सोडण्याचा त्यांनी संकल्प केला. हा संकल्प संदीप यांनी पूर्णत्वास नेऊन आपले तंबाखूचे व्यसन सोडले. रविवारी रात्री नाशिक येथे झालेल्या जॉइन द चेंज या कार्यक्रमात संदीप गांगुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.

 

“आता तंबाखूमुक्त मोहिमेचा ब्रँड अॅम्बेसेडर झाल्याने जबाबदारी वाढली आहे. तंबाखूचे व्यसन सोडल्यामुळे कोणताही त्रास होत नाही. उलट शरीर व्यायामाला साथ देऊ लागले आहे. तंबाखू खाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तंबाखूच्या व्यसनापासून दूर करण्यासाठी मी प्रबोधन करणारे आहे.” असे संदीप गांगुर्डे यांनी म्हटले.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@