‘हेलिकॉप्टर दादा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



अगदी लहान वयात समाजसेवेचा विडा त्याने हाती घेतला. आपल्या वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो मुंबईत परतला. सर्वच मार्गांनी त्याने गरजूंना आणि लहान मुलांना मदत करण्यास सुरुवात केली. मुलांचं स्वप्न पूर्ण करून आज तो ‘हेलिकॉप्टर दादा’ म्हणून ओळखला जाऊ लागला.


"ए दादा, आम्हाला कधी मिळणार रे ते हवेत उडणारे हेलिकॉप्टर का विमान काय ते म्हणतात, त्यात बसायला? आम्हाला कोण बसवणार रे त्यात?" हे ऐकून त्याचे डोळे पाणावले आणि तो म्हणाला, "काळजी करू नका... मी बसवेन तुम्हाला त्यात..." आणि इथूनच त्याचा ‘हेलिकॉप्टर दादा’ असा प्रवास सुरू झाला. लहान वयात केवळ समाजसेवेचं आणि गरजूंना मदत करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून तो पुन्हा मुंबईत आला. काही कारणास्तव महाराष्ट्राबाहेर गेलेला तो मुलगा आज आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या आईच्या आणि मित्रांच्या मदतीने त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र अपार मेहनत करत आहे. ‘हेलिकॉप्टर दादा’ अशी ओळख असलेल्या या मुलाचं नाव म्हणजे यश माने. वसई-विरार क्षेत्रात राहणारा यश आपल्या वडिलांचं समाजसेवेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा मुंबईत आला. यशला गरीब मुलांविषयी फार कळकळ आहे. त्यातच त्यांना महिन्याला खाण्या-पिण्याच्या वस्तू पुरवणं, शिक्षणासाठी त्या मुलांच्या शाळांचे शुल्क भरणं, अशी अनेक कामं यश आज नित्यनियमाने करत आहे. केवळ मुंबईतच नाही, तर मुंबईच्या बाहेरदेखील तो मुलांना, रस्त्यांवरील गरजू लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था करून देत असतो. काही दिवसांपूर्वी वसई-विरार क्षेत्रात काही ठिकाणी पाण्याची मोठी समस्या उद्भवली होती. त्यावेळीही त्याने कुणाकडेही मदत न मागता स्वखर्चाने एका गावात पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले होते.

 

यशचा सुरुवातीचा प्रवास हा अतिशय खडतर होता. एखादी गोष्ट करायची ठरवली की, त्यासाठी मदत करणारे कमी आणि पाय खेचणारे जास्त अशी काहीशी परिस्थिती सर्वच ठिकाणी असते. त्याचाच परिचय सुरुवातीच्या काळात यशला आला. "तू काहीच करू शकणार नाहीस," "तुझ्यासारखे १०० पाहिलेत," असे हिणवणारे अनेक भेटल्याचे तो सांगतो. अशा परिस्थितीत अनेकदा आपण आपल्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करू शकू किंवा नाही, आपण हाती घेतलेलं हे काम पूर्ण करू शकू किंवा नाही, असे अनेक प्रश्न त्याच्या मनात आले. परंतु, त्याचवेळी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेली त्याची आई आणि त्याचा मित्रपरिवार याने त्याला साथ दिली आणि पुन्हा एकदा त्याने नव्याने कामाला सुरुवात केली. त्याला आणि त्याच्या मित्रांना एक कल्पना सुचली. त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेताना खर्चासाठी मिळणारे पैसे त्यांनी जमवण्यास सुरुवात केली. त्याच पैशांनी त्यांनी गरीब-गरजू लोकांना खाण्या-पिण्याच्या वस्तू आणून देेण्यास सुरुवात केली. कालांतराने त्याच्या कामाची दखल काही लोकांनी घेतली आणि त्याला मदत करण्यास सुरुवात केली. परंतु, तीही मदत तोकडीच होती. पण हाती घेतलेलं काम अर्धवट सोडायचं नाही असं सर्वांनी ठरवत, ते काम सुरूच ठेवलं. कालांतराने यशने ‘युवा प्रेरणा प्रतिष्ठान’ ही संस्था सुरू केली आणि सरकार दरबारी त्या संस्थेची नोंदही केली.

 

‘युवा प्रेरणा प्रतिष्ठान’च्या उभारणीतही त्याला त्याच्या आईची आणि मित्रांची साथ लाभली. काही मोजक्याच मुलांच्या जोरावर सुरू करण्यात आलेल्या या संस्थेत आज अनेक लोक जोडली जाऊ लागली आहेत. काही लोक प्रत्यक्षरीत्या तर काही लोक अप्रत्यक्षरीत्या यशच्या या कामात त्याची मदतही करत आहेत. गरीब घरातील मुलांचं स्वप्न हे केवळ स्वप्नच राहू नये, या जिद्दीने आपल्याला खर्चासाठी मिळणार्या पैशांतून त्याने नुकतीच काही मुलांना हेलिकॉप्टरची सैर घडवली. यापूर्वीही त्याने असाच उपक्रम राबवला होता. याव्यतिरिक्त आज यश हा रुग्णांनाही, बेरोजगारांनाही आपल्यापरीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. दिव्यांग बांधवांना व्हिलचेअर, काही रुग्णांचा उपचार खर्चातील वाटा उचलणं, अशा अनेक प्रकारांनी तो त्यांची मदत करत आहे. दुसरीकडे बेरोजगार असलेल्या लोकांनाही काही ना काही मदत करून रोजगारासाठी तो साहाय्य करत आहे. काही कार्यक्रमांचे आयोजन करून लहान मुलांमधील कलागुणांनाही वाव देण्याचे काम यश करत आहे. अवघ्या २१ व्या वर्षी त्याच्या हातून होणारी ही समाजसेवा नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. सहा वर्षांपूर्वी म्हणजे अवघ्या १५ व्या वर्षी त्याने सुरू केलेला हा प्रवास अनेक चढ-उतारांनी भरलेला होता. शून्यापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आज वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. कोणत्याही गोष्टीची गरज लागली, तर आज अनेकजण अगदी नि:संकोचपणे यशला संपर्क करतात आणि यशही दिवस-रात्र, ऊन-पाऊस या कोणत्याही गोष्टींची पर्वा न करता त्यांच्या मदतीला धावून जातो. यशने सुरू केलेल्या कामात त्याला त्याच्या मित्रांचीही मोलाची साथ लाभली आहे. "यापुढेही ‘युवा प्रेरणा प्रतिष्ठान’च्या माध्यमातून आम्ही असंच समाजकार्य करत राहू," असं यश आवर्जून सांगतो. त्याच्या हातून असंच चांगलं कार्य यापुढेही घडत राहील यात काही शंका नाही. त्यांच्या पंखांना यापुढेही असंच बळ मिळत राहील, अशी आशा आपण नक्कीच करू शकतो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@