होमियोपॅथीक तपासणी(केस टेकिंग - 3)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018
Total Views |



जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा त्याच्या शरीरातील पेशींमध्ये व मानसिकतेतही बदल होत असतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांची कसोटी असते. कारण, या सर्व आजाराच्या लक्षणांमध्ये काही लक्षणे ही त्या अवयवाची असतात


होमियोपॅथीक तपासणी म्हणजेच केस टेकिंगच्या वेळेस होमियोपॅथीतज्ज्ञाला अतिशय दक्ष असावे लागते. रुग्णाची तपासणी करताना व त्याची माहिती घेताना सर्वात मोठी गोष्ट म्हणजे होमियोपॅथीतज्ज्ञ हा पूर्वग्रह दुषित नसावा. होमियोपॅथीतज्ज्ञाने पूर्णपणे निर्विकार होऊन तपासणी करावी, असे डॉ. हॅनेमान यांनी सांगितले आहे. येणाऱ्या रुग्णाबद्दल किंवा त्याला झालेल्या रोगाबद्दल मनात कुठल्याही प्रकारचा पूर्वसमज करून केलेली तपासणी ही चुकीची ठरू शकते. त्यामुळे होमियोपॅथीतज्ज्ञ नेहमी सतर्क असावा यालाच 'Unprejudiced Observer' असे म्हटले आहे. तपासणी करताना तज्ज्ञाने फक्त रुग्णाच्या बदलत्या प्रकृतीचे बारकाईने निरीक्षण करावयाचे असते. बदलत्या प्रकृतीमुळे चैतन्यशक्ती विविध प्रकारची लक्षणे शरीर व मनावर दाखवू लागते. ही लक्षणे अनेक असतात. पण ती ज्या बदललेल्या प्रकृती (State Of Disposition) मुळे दिसत असतात. त्या प्रकृतीचा व अवस्थेचा अभ्यास करणे फार महत्त्वाचे असते. कारण, त्यातच आजाराचे मूळ दडलेले असते.

 

जेव्हा माणूस आजारी पडतो तेव्हा त्याच्या शरीरातील पेशींमध्ये व मानसिकतेतही बदल होत असतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांची कसोटी असते. कारण, या सर्व आजाराच्या लक्षणांमध्ये काही लक्षणे ही त्या अवयवाची असतात. रोगाची सर्वसाधारण लक्षणे असतात व काही लक्षणे अशी असतात की, ती त्या रोगाशी संबधित नसतात, तर ती त्या रुग्णाच्या अवस्थेशी व प्रकृतीशी निगडित असतात. ही लक्षणे व आजाराची वाढण्याची व कमी होण्याची कारणे (Modalities) ही पूर्णपणे त्या त्या रुग्णाशी निगडित असतात. त्यामुळे ही लक्षणेही चैतन्यशक्तीकडूनच आलेली असतात. त्यामुळे या लक्षणांना केस टेकिंगमध्ये फार महत्त्व दिले आहे.

 

होमियोपॅथीतज्ज्ञाने कटाक्षाने पाळण्याची गोष्ट म्हणजे आपली पंचेंद्रिये अतिशय जागृत ठेवणे. याचमुळे त्यांना रुग्णाची खरी अवस्था व प्रकृती शोधता येते. उदाहरणार्थ, डोळ्यांनी संपूर्ण निरीक्षण करता येते. एखादे वेगळे लक्षण आपल्याला समजते. रुग्णाने सांगितलेला प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकून घ्यावा. कारण, त्यातूनच त्या माणसाची अवस्था व प्रकृती कळते. रुग्णाच्या शरीराला येणारा विशिष्ट प्रकारचा वास किंवा दर्प किंवा दुर्गंधीसुद्धा फार महत्त्वाचे लक्षण असते. हा वास हा मुख्यत्वे शरीरातील स्रावांमुळे येत असतो. त्यानुसार मग रुग्णाच्या प्रकृतीचे निदान केले जाते. रुग्णाची तपासणी करताना जेव्हा तज्ज्ञ व्यवस्थित तपासणी करतो. तेव्हा स्पर्शज्ञानाने अनेक लक्षणे समजतात. पोटाचा जडपणा, वायू, स्नायू वा हाडांना आलेली सूज किंवा संसर्ग किंवा कुठलाही प्रकारचा चर्मरोग इत्यादींचे निदान करता येते. म्हणूनच ही सर्व ज्ञानेंद्रिये दक्ष असावी लागतात (sound senses). होमियोपॅथीक तपासणी ही नुसती माणसाच्या अवयव व पेशींची तपासणी नसून, संपूर्ण माणसाची तपासणी असते. त्यामुळेच ती इतर औषधशास्त्रांपेक्षा उजवी ठरते. पुढील भागात आपण या तपासणीतील अजून काही बारकावे माहीत करून घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@