लक्ष लक्ष ‘अय्यपा ज्योतीं’नी उजळून गेले केरळ!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2018   
Total Views |


 
 
 
 
गेल्या आठवड्यात बुधवारी केरळच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत संध्याकाळच्या वेळेस अय्यपास्वामींचा जयघोष करीत हातात दीपज्योती घेऊन लाखो महिलांनी प्रचंड साखळी निर्माण केली होती. महामार्गावर रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या राहून या सर्व महिला अय्यपास्वामींचा जयघोष करीत होत्या. या ‘अय्यपा ज्योती’ उपक्रमात हिंदू समाजातील सुमारे १२० संघटना सहभागी झाल्या होत्या.
 

केरळमधील शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील मुली, स्त्रिया यांना प्रवेश देण्यात यावा असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर केरळसह देशात सर्वत्र या निर्णयावरून चर्चा चालू आहे. शबरीमला मंदिराची परंपरा आणि रितीरिवाज लक्षात न घेता जो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयाने सर्व वयोगटातील महिलांना त्या मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी देण्यात आली असली आणि तेथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने हा निर्णय अंमलात आणण्यासाठी सर्व प्रकारच्या नीतीचा अवलंब केला असला तरी, मंदिराची परंपरा उल्लंघून सर्व महिलांना या मंदिरात सरसकट प्रवेश करणे अद्याप शक्य झाले नाहीसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जनतेत जी प्रचंड नाराजी निर्माण झाली त्यातून तेथील हिंदू समाजाचे जनआंदोलन निर्माण झाले. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या २८ सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध केरळमध्येच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही प्रतिक्रिया उमटली आणि उमटत आहे. सर्वोच्चन्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरळमध्ये महिला प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरल्या. राज्यात कडकडीत हरताळ पाळण्यात आला. न्यायालयाचा निर्णय लक्षात घेऊन स्वत:स पुरोगामी, प्रगतिशील म्हणविणाऱ्या काही महिलांनी या मंदिरात जाण्यासाठी प्रयत्न केला. पण जनतेच्या प्रचंड विरोधामुळे त्या महिलांना आपले प्रयत्न मध्येच सोडून द्यावे लागले. शबरीमला येथील अय्यपास्वामींच्या मंदिरापर्यंतही त्यांना पोहोचता आले नाही.

 

न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध केरळमधील हिंदू समाज एकवटला असून, पूर्ण शक्तीनिशी तो या निर्णयाविरुद्ध लढत आहे. परंपरा, रितीरिवाज यांचे उल्लंघन करणे हे हिंदू समाजास आणि या समाजातील सर्व महिलांना अमान्य असल्याने रस्त्यावर उतरून या निर्णयास विरोध केला जात आहे. विविध हिंदू संघटनांचा या निर्णयास विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर केरळमधील हिंदू समाजाची जी प्रतिक्रिया उमटली त्यामुळे तेथील डावे सरकार हादरले आहे. हिंदू समाजाच्या आंदोलनाची तीव्रता अशीच वाढत चालली, तर आपले राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते, अशी भीती त्या सरकारला वाटू लागली आहे. हिंदू समाजाच्या आंदोलनामागे समाज एकवटत असल्याचे लक्षात घेऊन त्यास प्रत्युत्तर देण्याची योजना काही सरकारधार्जिण्या संस्था आणि संघटनांना हाताशी धरून केरळ सरकारने आखली आहे.

 

हिंदू समाजाच्या आंदोलनाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी केरळमधील डाव्या पक्षांनी आज, १ जानेवारी, २०१९ रोजी केरळच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत महिलांची मानवी भिंत उभारण्याचा कार्यक्रम योजला आहे. या कार्यक्रमात लाखो महिलांना सहभागी करून घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयास केरळमधील बहुतांश जनता अनुकूल आहे, हे भासविण्याचा डाव्या पक्षांचा प्रयत्न आहे. सरकारही डाव्या पक्षांचेच असल्याने सर्व ताकद लावून ही महिलांची मानवी भिंत केरळच्या उत्तरेकडील कासरगोडपासून तिरुवनंतपुरमपर्यंत उभी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात लाखो महिला सहभागी होतील, असा सरकारचा दावा आहे. केरळ राज्यास अंधारयुगात लोटण्याचा जो प्रयत्न चालला आहे, त्यापासून राज्याला वाचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचे डाव्या मंडळींकडून सांगण्यात येत आहे. पण पिनराई विजयन सरकारचा हा उपक्रम अनेक विसंगतींनी भरलेला आहे, अशी टीका केरळमधील काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर जी प्रतिक्रिया उमटली त्याला प्रत्युत्तर म्हणून ही महिलांची भिंत उभारण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री विजयन सांगतात, तर त्यांच्याच सरकारमधील एक मंत्री कडकमपल्ली सुरेन्द्रन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कोडियारी बालकृष्णन हे या कार्यक्रमाचा शबरीमला मुद्द्याशी संबंध नसल्याचे सांगतात, असे चेन्नीथला यांचे म्हणणे आहे. हा कार्यक्रम सरकारच्या महिला आणि बालकल्याण खात्यातून ५० कोटी रुपये घेऊन राबविण्यात येत असल्याचे विजयन सरकारकडून केरळ उच्च न्यायालयास सांगण्यात आले. जाहीर सभांमधून या कार्यक्रमासाठी सरकारचा एक रुपयाही घेण्यात आला नसल्याचे विजयन सांगत आहेत, हे चेन्नीथला यांनी लक्षात आणून दिले आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री विजयन हे जातीपातीचे राजकारण खेळत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 

केरळच्या मुख्यमंत्र्यांनी ‘वनिता मतिल’ म्हणजे महिलांची मानवी भिंत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे लक्षात घेऊन केरळमधील हिंदू समाजाने त्यास आधीच जोरदार उत्तर दिले आहे. गेल्या आठवड्यात बुधवारी केरळच्या उत्तर टोकापासून दक्षिण टोकापर्यंत संध्याकाळच्या वेळेस अय्यपास्वामींचा जयघोष करीत हातात दीपज्योती घेऊन लाखो महिलांनी प्रचंड साखळी निर्माण केली होती. महामार्गावर रस्त्याच्या कडेला शांतपणे उभ्या राहून या सर्व महिला अय्यपास्वामींचा जयघोष करीत होत्या. या ‘अय्यपा ज्योती’ उपक्रमात हिंदू समाजातील सुमारे १२० संघटना सहभागी झाल्या होत्या. शबरीमला कृती समितीच्यावतीने आयोजित केलेल्या या उपक्रमात लाखो अय्यपाभक्त सहभागी झाले होते. कृती समितीचे निमंत्रक विश्व हिंदू परिषदेचे नेते एस. जे. आर. कुमार यांनी २१ लाख भाविक या उपक्रमात सहभागी झाले होते, अशी माहिती दिली. अय्यपा ज्योतीच्या या दीपसाखळी उपक्रमामध्ये मोडता घालण्याचे प्रयत्न डाव्या पक्षांकडून काही ठिकाणी करण्यात आले. उत्तर केरळमध्ये डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे ३१ लोक जखमी झाले त्यात १० महिलांचा समावेश होता. मार्क्सवाद्यांचा प्रभाव असलेल्या कन्नूर आणि कासरगोड भागात या हल्ल्यांच्या घटना घडल्या. या कार्यक्रमामुळे आपल्या पायाखालची वाळू घसरत चालल्याची भीती डाव्या मंडळींच्या मनात निर्माण झाल्याने त्यातून हल्ल्याच्या अशा घटना घडल्या हे उघडच आहे.

 

उत्तरेकडील कासरगोडपासून दक्षिणेतील तिरुवनंतपुरम जिल्ह्यापर्यंत ‘अय्यपा ज्योतीं’ची साखळी महामार्गाच्या कडेला उभारण्यात आली होती. अशा लक्ष लक्ष ‘अय्यपा ज्योतीं’नी केरळ उजळून निघाले होते. त्या खेरीज या ज्योतीचा उपक्रम अन्य ११ राज्यांमध्येही योजण्यात आला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, नायर सर्व्हिस सोसायटी यांच्यासह अनेक हिंदू संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या. ‘अय्यपा ज्योती’ कार्यक्रमामुळे राज्य सरकारला शबरीमलाबाबतची आपली भूमिका बदलणे भाग पडेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष पी. एस. श्रीधरन पिल्ले यांनी म्हटले आहे. ‘अय्यपा ज्योती’ उपक्रमात महिलांचा सहभाग तर प्रचंड होताच; त्याच्या जोडीला समाजाच्या विविध स्तरांतील मान्यवरही त्यात सहभागी झाले होतेशबरीमला मंदिर २१ दिवसांच्या मकरविल्ल्क्कू उत्सवासाठी रविवारी उघडण्यात आले आहे. २० जानेवारी रोजी हे मंदिर बंद होणार आहे. या मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्यात यावा, असा जो निर्णय सर्वोच्चन्यायालयाने घेतला आहे, त्याविरुद्ध ज्या फेरयाचिका करण्यात आल्या आहेत, त्यावरील सुनावणी येत्या २२ जानेवारी रोजी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. आता सर्वोच्च न्यायालय त्यावर काय निर्णय देते याकडे सर्व अय्यपाभक्तांचे लक्ष आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
@@AUTHORINFO_V1@@