वैचारिक भूक शमविण्याचे ‘तरुण भारत’चे व्रत अबाधित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2018
Total Views |

भाजपा प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ‘तरुण भारत’शी बातचित

 
जळगाव, 29 डिसेंबर :
देशात अनेक वृत्तपत्रे आहेत. त्यात काही प्रादेशिक तर काही स्थानिकही आहेत. वृत्तपत्रे प्रकाशित होतात मात्र वाचकांची खर्‍या अर्थाने वैचारिक भूक भागविण्याचे काम ‘तरुण भारत’ करीत आहे. हे कार्य असेच निरंतर सुरु राहणार असल्याचे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
 
 
केशव उपाध्ये हे उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आले असता शनिवारी त्यांनी ‘जळगाव तरुण भारत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी सहकार्‍यांशी बातचीत करताना ते बोलत होते. त्यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) उदय वाघ, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाच्या जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. अस्मिता पाटील, भाजपा जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर आदी उपस्थित होते.
 
 
राजकारणात येण्यापूर्वी मी पत्रकारितेत होतो आणि माझा पत्रकारितेचा प्रारंभही ‘तरुण भारत’ म्हणजे सोलापूर तरुण भारतपासून झाला, असे सांगून केशव उपाध्ये म्हणाले की, पत्रकारितेचा अनुभव असल्याने कमी वेळात आपले मत कसे मांडावे हे शिकायला मिळाले. सुरुवातीपासून वृत्तपत्र वाचनाची आवड होतीच. आजही दररोज सकाळी विविध 16 वृत्तपत्रे वाचतो. त्यातून बहुतांश घटना आणि घडामोडींची  माहिती मिळते. त्याचा उपयोग प्रत्यक्ष जीवनात होतो. आज वृत्तपत्रे वाचन हा जीवनशैलीचा भाग बनला आहे, असेही ते म्हणाले.
 
 
परंपरा जपत काळानुरुप बदल
अलीकडच्या काळात ‘तरुण भारत’ने नवनवे प्रयोग केले आहेत, बदलत्या काळानुरुप नवे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. ‘तरुण भारत’ नव्या युगासह पुढे जात असल्याचा आनंद व्यक्त करीत दूरचित्रवाणीला आताच लोक कंटाळले असून सोशल मीडियाला त्यांनी जवळ केले आहे. भविष्यात हेच माध्यम अधिक प्रभावी राहील असे सांगत ‘महाएमटीबी’ या पोर्टल अ‍ॅपबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. ‘जळगाव तरुण भारत’ने उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत जळगावला राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच भुसावळ विभागीय कार्यालयाच्या शुभारंभानिमित्त आयोजित ‘थेट संवाद’ कार्यक्रमातून राज्याचे वन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी साधलेल्या संवादाबद्दलची माहिती उदय वाघ यांनी केशव उपाध्ये यांना दिली असता त्यांनी या उपक्रमाचेही विशेष कौतुक केले.
 
भाजपाचा प्रभाव आहेच
पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काही ठिकाणी भाजपा उमेदवारांना पराभव स्वीकारालावा लागला, मात्र अनेक ठिकाणी भाजपाला मिळालेले लोकसमर्थन हे पूर्वीपेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले. याचाच अर्थ असा की, या निवडणुकांनी भाजपाचा प्रभाव कमी केलेला नाही. काही उमेदवार अत्यंत कमी फरकाने पराभूत झाल्याने भाजपाच्या जागा अपेक्षेपेक्षा कमी आल्या असल्या तरी येत्या निवडणुकीत ही कसर भरुन काढू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या निकालांचा येत्या लोकसभा निवडणुकीत काहीही परिणाम जाणवणार नाही. कारण आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.
 
 
युतीसाठी प्रयत्न आहेतच
सध्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांवर दररोज वेगवेगळ्या स्वरुपाचे आरोप करीत आहेत. अशा स्थितीत येत्या निवडणुकीत भाजपा - शिवसेना युती होईल का? असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही युतीसाठी प्रयत्नशील आहोतच. कारण हिंदुत्त्व हाच दोन्ही पक्षांचा अजेंडा आहे. त्या मुद्यावर मत विभाजन होऊ नये म्हणून युती झाली तर उत्तमच. अन्यथा, राज्यात भाजप सक्षम असून भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. कारण भाजपा स्वयंनिर्भय पक्ष आहे आणि त्यामुळेच भविष्यातही स्वबळावर सत्ता स्थापनेची ताकद भाजपचीच आहे, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
@@AUTHORINFO_V1@@