ऑगस्टाच उद्ध्वस्त करेल!!!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
सत्तेच्या मलिद्यासाठी हपापलेल्यांना हवे ते करण्याची मोकळीक या दोन्ही मायलेकांनी संपुआ सरकारच्या सत्ताकाळात दिल्याचे नेहमीच म्हटले गेले. त्याच्या सुरस कथाही वेळोवेळी समोर आल्या. आता ख्रिश्चियन मिशेलने तर चौकशीदरम्यानच या दोघांचे नाव घेतल्याने ‘देश का चोर-गांधी परिवार’ हेच सत्य असल्याचे स्पष्ट झाले.
 

१९४८ सालच्या पहिल्या मोठ्या जीप खरेदी घोटाळ्यानंतर देशात दरवर्षी नवनवीन घोटाळ्यांची मालिकाच चालू झाल्याचे जनतेने वेळोवेळी पाहिले. ज्या-ज्या वेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार अस्तित्वात आले, त्या-त्या वेळी कुठला ना कुठला घोटाळा, आर्थिक अफरातफर, हेराफेरी झाल्याचेही समोर आले. २००४ ते २०१४ या १० वर्षांच्या कार्यकाळात तर काँग्रेसच्या नेतृत्वातील संपुआ आघाडीने हजारो कोटींचे घोटाळे करण्याचा एक निराळाच विक्रम केला. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी खरेदी करण्यात येणाऱ्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याचीही तीच गत, जो संपुआ सरकारच्या काळातच करण्यात आला. कुठलाही व्यवहार भल्यामोठ्या आर्थिक लाभाशिवाय होणारच नाही, याची दक्षता घेणाऱ्या तत्कालीन शक्तिशाली नेतृत्वाने यातही मोठ्या प्रमाणात पैसा लाटायचा खेळ केला. पंतप्रधानपदी मनमोहन सिंग नामक कळसूत्री बाहुला जरी असला तरी सरकारचे सर्वच निर्णय या शक्तिशाली नेतृत्वाकडून घेतले जात असत. ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातही तसेच झाले आणि हे शक्तिशाली नेतृत्व कोण, हेदेखील सर्वांनाच कळून चुकले. त्याचवेळी रेनकोट घातलेला असल्याने पंतप्रधान मनमोहन सिंग मात्र या काळ्या धनवर्षावातून सहीसलामत बचावल्याचे चित्र निर्माण झाले. अर्थात, खरे-खोटे काय, हे त्या शक्तिशाली नेतृत्वाला आणि त्या रेनकोटधारी पंतप्रधानालाच ठावूक! नुकताच ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी भारताच्या तावडीत सापडलेल्या दलाल ख्रिश्चियन मिशेलने चौकशीदरम्यान या शक्तिशाली नेतृत्वाचा व त्या नेतृत्वाच्या कारवायांचा उल्लेख केला आणि देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. प्रत्यार्पण करून भारतात आणल्यापासून ख्रिश्चियन मिशेलची सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ‘ईडी’ सातत्याने चौकशी करत असून या प्रकरणी दररोज नवनवीन तथ्ये समोर येत आहेत. शनिवारी अशाच चौकशीदरम्यान ख्रिश्चियन मिशेलने ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात ‘मिसेस गांधी’ आणि ‘इटलीच्या महिलेच्या मुला’चे नाव घेतले व काँग्रेसच एकमेव देशभक्त पक्ष असल्याची पावती देत फिरणार्‍यांची झोपच उडाली. काँग्रेससारखा देशभक्त पक्ष घोटाळा करून पैसा खाईलच कसा? काँग्रेसने आपल्या स्थापनेपासून देशाचे भले कसे होईल याचीच चिंता केली, त्या पक्षाचा अध्यक्ष आर्थिक हेराफेरी कसा करू शकतो? देशउभारणीचे महान काम करणारा काँग्रेस पक्ष व त्याचा मालक असलेला एकुलता एक परिवार असे कसे पैसे लाटेल? काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच तर हे चौकशीचे नाट्य सुरू केलेले नाही ना? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आणि या मोहोळाचे ख्रिश्चियन मिशेलच्या खुलाशानंतर पद्धतशीरपणे वादळात रूपांतरही झाले. आता हे वादळ नेमके कोणाकोणाला सोबत घेऊन उद्ध्वस्त करते, तेदेखील यथावकाश स्पष्ट होईलच.

 

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत एकही घोटाळा झाल्याचे समोर आले नाही. काँग्रेसने राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी व्यवहारावरून राळ उडविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, पण सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या आरोपातली हवाच काढून टाकली. परिणामी, हे प्रकरण थंड बस्त्यात जाईल, असे वाटले. मनमोहन सिंग पंतप्रधानपदी असताना राहुल गांधींनी भ्रष्ट नेत्यांवरील कारवाईसंदर्भातला एक अध्यादेश भर पत्रकार परिषदेत फाडून टाकला होता. राफेलप्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे मात्र राहुल गांधींना तसे करता येत नाही; अन्यथा त्यांनी तेही करायला मागेपुढे पाहिले नसते. आपल्या कृती आणि उक्तीतून एका बाजूला गांधी घराण्याचा चिराग सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थेलाही जुमानत नसल्याचे दिसत असताना काँग्रेसने मात्र मोदी सरकारवरच उलट आरोप केले. मोदी सरकार सर्वप्रकारच्या संवैधानिक संस्थांचे महत्त्व व स्थान धुडकावत असल्याचे दावेदेखील काँग्रेसच्या गोटातून करण्यात आले. आता मात्र ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणातील ख्रिश्चियन मिशेलच्या खुलाशानंतर काँग्रेसींच्या तोंडून निघणाऱ्या शब्दजंजाळातून या पक्षाची दिवाळखोरीच चव्हाट्यावर आली. “सरकारी वकील न्यायालयात राजकारण करत आहेत. पंतप्रधानांनीच त्यांना तसे आदेश दिले आहेत. आता आमचा कोणत्याही तपास यंत्रणेवर विश्वास नाही,” अशा प्रकारची मुक्ताफळे काँग्रेसच्या कपिल सिब्बलांनी उधळली. यातून दोन गोष्टी सिद्ध होतात. एक म्हणजे काँग्रेसी राजवटीत या लोकांनीही अशाच प्रकारचे राजकारण न्यायालयासह सर्वच प्रकारच्या संस्थांत केले असावे. म्हणून आता सिब्बलांच्या तोंडून आपल्याला अनुभवाचे बोल ऐकायला मिळत आहेत. म्हणजे, ही संस्थांना खरेदी करण्याची वृत्ती काँग्रेसी नेतृत्वातच आहे, हे यातून स्पष्ट होते. दुसरी गोष्ट म्हणजे, तसे जर नसेल तर या लोकांना कुठल्याही तपास यंत्रणा मान्य नाहीत, याची त्यांनी स्वतःच्याच तोंडाने दिलेली कबुली. आता असे लोक मोदी सरकारवर जे संवैधानिक संस्थांना झिडकारल्याचे आरोप करतात, ते कोणत्या आधारावर हेही त्यांनी सांगावे. कारण, मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून कोणत्याही संस्थेच्या माध्यमातून विरोधकांना आपल्या तालावर नाचविण्याचे पाप त्यांनी केले नाही. काँग्रेसने मात्र आपल्या सत्ताकाळात मनाला वाटेल तेव्हा निरनिराळ्या विधेयकांना पाठिंबा मिळविण्याच्या नावाखाली, निरनिराळे करार करण्याच्या नावाखाली संवैधानिक संस्थांची भीती दाखवत छोट्या पक्ष्यांना सापळ्यात अडकविण्याचे उद्योग केले. म्हणजेच काँग्रेसने सर्वच प्रकारच्या संवैधानिक संस्थांचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला आणि तोच पक्ष आज तोंड वर करून मोदी व भाजपवर उलट दावा करतो, याला काय म्हणावे?

 

राहुल गांधींनी गेल्या महिना-दोन महिन्यांत झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राफेल लढाऊ विमान खरेदीवरून मोदींसह भाजपवर भलतेसलते आरोप करण्याची एकही संधी सोडली नाही. ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात जामिनावर असलेल्या या इसमाने राफेलप्रकरणी कोणतेही साक्षीपुरावे मात्र कधीही न्यायालयात वा जनतेसमोरही सादर केले नाहीत. ते काँग्रेसला आणि काँग्रेसने फेकलेल्या अर्ध्या-चतकोर तुकड्यांवर तगून राहिलेल्या बुद्धिजीवी, विचारवंतांना चालते, पण ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी त्यांची दातखीळ बसते. विशेष म्हणजे, ऑगस्टाप्रकरणी ख्रिश्चियन मिशेल या दलालाने दिलेली साक्षही अविश्वसनीय ठरविण्याची त्यांच्यात अहमहमिका लागते. देशाच्या तिजोरीवर घातलेला दरोडा पकडण्याचे काम मोदींनी सुरू केले तर अशा लोकांना ते नकोसे होऊन जाते. गांधी-नेहरू आणि काँग्रेसी विचारधारेच्या नावाखाली झालेली लूट थांबविणारा नेता अशा लोकांना उद्धट नि उर्मट वाटतो. त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे, नरेंद्र मोदी आपल्यासारखा नाही, ही मनातली सल. यावरून या लोकांना कोणीही प्रामाणिक नेता सत्तेच्या सर्वोच्च स्थानी नको असल्याचेच स्पष्ट होते. दुसरी गोष्ट सोनिया गांधी आणि राहुल गांधींची. सत्तेच्या मलिद्यासाठी हपापलेल्यांना हवे ते करण्याची मोकळीक या दोन्ही मायलेकांनी संपुआ सरकारच्या सत्ताकाळात दिल्याचे नेहमीच म्हटले गेले. त्याच्या सुरस कथाही वेळोवेळी समोर आल्या. आता ख्रिश्चियन मिशेलने तर चौकशीदरम्यानच या दोघांचे नाव घेतल्याने ‘देश का चोर-गांधी परिवार’ हेच सत्य असल्याचे स्पष्ट झाले. आता याप्रकरणी सोनिया-राहुल गांधी माध्यमांसमोर येतील का? ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी स्वतःच्या सहभागाचे खुलासे देतील का? की याप्रकरणी अधिक चौकशी होऊन हे दोघेही बिनभाड्याच्या खोल्यांत राहायला जातील, हे लवकरच समोर येईल.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@