ऑगस्टाप्रकरणी सोनिया गांधींविरोधात षड्यंत्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Dec-2018
Total Views |


 
 
 
 

शरद पवारांचा आरोप

 

अहमदनगर : सत्तेचा इतका अतिरेक देशात पहिल्यांदाच होत असून ऑगस्टा वेस्टलँडप्रकरणी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला आहे. “देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये हस्तक्षेप करून विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे,” असा दावा करताना देशात आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाल्याचेही पवार म्हणाले. नगरमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

आघाडीबाबत शरद पवार म्हणाले की, “देशात परिवर्तन झाले पाहिजे. त्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याची गरज आहे. आम्ही राज्या-राज्यांमध्ये आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रत्येक राज्यात वेगळी स्थिती आहे. तेथील परिस्थितीनुसार ते-ते पक्ष तेथे क्रमांक एकवर असतील. आमचा नेता आत्ताच सांगण्याची काहीच गरज नाही. निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसू आणि मग नेता ठरवू,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच “राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४० जागांवर एकमत झाले असून ८ जागांसाठी चर्चा सुरू आहे. तोही प्रश्न लवकरच निकाली लागेल. त्यामुळे आमच्यात जागावाटपावरून कोणताही गोंधळ नाही,” असे त्यांनी म्हटले.

 

त्या नगरसेवकांवर कारवाई

 

भाजपला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा द्यायचा नाही, हे मी आधीच स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही नगर महापालिकेच्या महापौर निवडीत भाजपला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचा आदेश नाकारणाऱ्यांना नोटीस पाठवली असून येत्या ५ दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल,” अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@