मणिकर्णिकाचे प्रमोशन करणार नाही कंगना?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

 


 
 
मुंबई : ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा अभिनेत्री कंगना रनोटचा सिनेमा गेल्या वर्षभरापासून सतत कोणत्या ना वादात सापडत आहे. या सिनेमातील क्रू मेंबर्सचे पैसे थकवल्याचा आरोप निर्मात्यांवर करण्यात आला आहे. अभिनेत्री कंगना रनोटने मात्र या क्रू मेंबर्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे ठरवले आहे. “हा आरोप जर खरा असेल तर क्रू मेंबर्सचे पैसे त्यांना जोपर्यंत परत मिळत नाहीत तोपर्यंत मी मणिकर्णिकाचे प्रमोशन करणार नाही”, असा पवित्रा कंगनाने घेतला आहे.
 

सिनेमासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचे पैसे थकवणे ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सिनेमा पूर्ण होण्यासाठी हातभार लावणाऱ्या लहानसहान कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. ही गोष्ट खूप अन्यायकारक आहे. असे कंगना याबाबत म्हणाली. एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलताना कंगनाने आपली याबाबतीतील भूमिका स्पष्ट केली. मणिकर्णिकाच्या निर्मात्यांनी क्रू मेंबर्सचे तब्बल दीड कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप क्रू मेंबर्सनी केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून हे क्रू मेंबर्स ‘मणिकर्णिका’ या सिनेमासाठी काम करत होते. या सिनेमातील ज्युनिअर कलाकारांचे २५ लाख रुपयांचे मानधन थकवल्याचा आरोपही सिनेमाच्या निर्मात्यांवर करण्यात आला आहे. वेस्टर्न इंडियाच्या सिनेकर्मचाऱ्यांच्या संघटनेने हा आरोप केला आहे.

 

ऑक्टोबर महिन्यापर्यंत या सर्वांचे पैसे मिळणे अपेक्षित होते. सिनेमाचे निर्माते कमल जैन यांच्या संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही. याप्रकरणी आता मजूर समितीशी संपर्क साधण्यात येणार आहे. अभिनेत्री कंगना रनोटने मणिकर्णिका या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमाशी संबंधित प्रत्येक लहानसहान गोष्टीत कंगना जातीने लक्ष घालताना दिसते. यापूर्वी मणिकर्णिकाचे कलाकार एकापाठोपाठ एक करत सिनेमा सोडून गेल्यामुळे हा सिनेमाविषयी वाद निर्माण झाला होता. आता मात्र क्रू मेंबर्सचे मानधन थकविल्याचा आरोपामुळे मणिकर्णिका एका नव्या वादात सापडला आहे. पुढील वर्षी २५ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@