बूटपॉलिशवाला ते शाळा संस्थापक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018   
Total Views |



डी. एड. महाविद्यालयात बूट पॉलिश करणाऱ्या देवराम यांच्या आज गरजू आणि वंचित वस्त्यांमध्ये स्वत:च्या शाळा आहेत. ‘शिक्षण सर्वांसाठी, त्यातही गरजूंसाठी प्रथम’ हे त्यांचे ब्रीदवाक्य. त्यांच्याविषयी...


“दहावीत असताना शहरातल्या डी.एड. महाविद्यालयात जायचो. तिथे मुलांच्या बुटांना पॉलिश करायचो. सोमवार ते शुक्रवार शाळा, अभ्यास, घरचे काम आणि शनिवार व रविवार बूट पॉलिशचे काम. वडिलांचाही चप्पल शिवायचा धंदा होता. या पारंपरिक व्यवसायाचे कसब माझ्याकडेही वारसा हक्काने आले. सांगायचा मुद्दा हा आहे की, डी. एड. महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या बुटांना पॉलिश करताना माझ्याही मनात येई मीसुद्धा असेच शिकावे,” असे देवराम केदार सांगत होते. मूळचे जामगाव अहमदनगरचे असलेले देवराम केदार. आज देवराम हे नालंदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे सरचिटणीस आहेत. तसेच हरिजन हितचिंतक सभा, कुर्ला शाखेचे सचिव आहेत. घाटकोपर रमाबाई नगरला लागून असलेल्या कामराज नगर, कुर्ला, खडवली, कल्याण येथे त्यांच्या स्वत:च्या शाळा आहेत. समाजामध्ये शैक्षणिक साक्षरतेसोबतच आर्थिक साक्षरता यावी, यासाठी देवराम यांनी वंचित वस्त्यांमध्ये पतपेढ्याही सुरू केल्या. या पतपेढ्यांचे भागधारक आणि लाभार्थी हे पूर्णत: वंचित समाजातील आहेत. देवराम यांना समाजाविषयीची तळमळ का आहे, याचे उत्तर आहे की, देवराम यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास समाजाबद्दल नुसतीच सहानुभूती नाही, तर त्यांना त्या जगण्याची अनुभूती आहे. अहमदनगरच्या जामगावातील चर्मकार समाजाच्या कचरू आणि राणूबाई या दाम्पत्याला तीन मुले आणि एक मुलगी. त्यापैकी एक देवराम. मुलांनी वडिलांना नेहमी प्रामाणिकपणे चपला शिवताना आणि कष्ट करतानाच पाहिले होते. आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तरीही केदार यांच्या घरी पाहुण्या-रावळ्यांचे स्वागत यथायोग्य केले जाई.

 

समाजाच्या अडीअडचणींमध्ये कचरू धावून जात. आईही मोलमजुरी करत असे. पण, देवराम आठवी इयत्तेमध्ये गेले आणि दिवस फिरले. कचरू यांना क्षयरोग झाला. उपचारासाठी ते मुंबईला गेले. चार वर्ष ते उपचार घेत होते. त्यावेळी एकट्या राणूबाईने घर सांभाळले. सहा आणे मजुरीवर ती काम करे. त्यातच चार मुले, ती आणि सासूबाई यांचे जगणे सुरू असे. ते दिवस फार दु:खाचे होते. देवराम सांगतात,“पैशाची चणचण, खाण्यापिण्याचे हाल हे त्यांनी सोसले. पण, त्या दिवसांतील सगळ्यात मोठे दु:ख हे होते की, घरी पै-पाहुणे यायचे बंद झाले. कारण, घरातला कर्ता पुरुष घरी नव्हता. एकट्या आईच्या जीवावर घर चाले, ती पाहुण्या-रावळ्यांची ठेप कशी ठेवणार? नेहमी पाहुण्यांची वर्दळ असलेले घर एकाकी झाले. त्याचवेळी कळले की, नाती ही नुसती रक्ताची असून भागत नाहीत, तर ती सुखदु:खात सोबत हवीत.” याच कालावधीत देवराम यांच्या शाळेत एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये शाळेचे संस्थापक आले होते. त्यांचे चालणे, वागणे आणि त्यांना मिळणारा सन्मान पाहून देवराम यांच्या बालमनाला वाटले की, मी शाळा स्थापन करू शकलो तर? ही इच्छा बालमनात रुजली. पण, घरची परिस्थिती तर इच्छेपासून कोसो अंतर दूर. तरीही देवराम यांनी ठरवले काहीही झाले तरी, परिस्थिती बदलायची. त्यासाठी शिक्षण घ्यायचे. आईचे आणि आजीचे कष्ट ते उघड्या डोळ्यांनी आणि मनाने पाहत होतेच. ते कष्ट रक्तातही उतरले. पुढे अहमदनगरला महाविद्यालयात शिकत असतानाच त्यांनी या दोन पदविका पूर्ण केल्या. त्यावेळी रात्री ३ वाजेपर्यंत ते एका प्रेसमध्ये कामही करत. प्रेसमध्ये एका तासाचे चार आणे मिळत. तीन वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आणि रात्री ३ पर्यंत काम करणे असा देवराम यांचा जीवनक्रम होता. हे दिवस जातील की नाही यावर त्यांनी कधीही विचार केला नाही. कारण, प्रामाणिक कष्ट वाया जात नाहीत, यावर त्यांचा विश्वास होता.

 

पुढे शिकत असतानाच त्यांना नोकरी लागली. ती शाळा बारामतीला होती आणि इसाई मिशनर्‍यांची होती. “ख्रिश्चनांची शाळा आहे, तिथे तू जाऊ नकोस,” म्हणून घरच्यांनी त्यांना अडवले. पण, त्यांचा स्वत:वर विश्वास होता. “नोकरी करतो म्हणून धर्म बदलेन, इतकी काही माझा धर्मावरची निष्ठा तकलादू नाही,” याची त्यांना खात्री होती. त्या संस्थेत ते चार वर्ष होते. एमपीएसी पास झालेल्या समाजातील मुलीशी त्यांचा विवाह झाला. याच काळात त्यांनी उर्वरीत शिक्षणही पूर्ण केले. त्यांना रिझर्व्ह बँकेमध्ये नोकरी लागली. आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण झाले. स्थिरता आली. देवराम यांना आरक्षणाचा फायदा झाला का? तर हो! नक्कीच झाला. पण, आर्थिक स्थिती ठीक असल्याने त्यांनी आपल्या मुलांना खुल्या प्रवर्गातूनच शिक्षण दिले. असो, सगळे चांगलेच चालले होते. या दिवसातही देवराम आपला समाज, आपला भूतकाळ विसरले नाहीत. समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आवश्यकच आहे असे त्यांना वाटे. शिक्षण संस्था काढावी ही बालपणीची इच्छाही मनात पुन्हा पुन्हा पिंगा घालत होती. त्यातूनच मग त्यांनी जीवनाचा क्रम ठरवला. समाजामध्ये फिरले. जिथे कुठे जवळपास शाळा नाही किंवा ज्या वस्त्यांपर्यत शिक्षणाचे अमृत पोहोचले नाही, अशा ठिकाणी त्यांनी शाळा सुरू केल्या. महाराष्ट्र चर्मकार परिषदेतर्फे महाराष्ट्रभर चर्मकार बांधवांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास केला. त्यावर लक्ष केंद्रित करून देवराम सध्या काम करीत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@