हिंदुत्वाचे ज्ञान तुम्ही कुठून घेतले?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |


 


जोधपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, हिंदुत्वावरील आपल्या ज्ञानावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या काँग्रेसचा सोमवारी खरपूस समाचार घेतला. ”हिंदुत्वावर तुम्हाला जे विशेष ज्ञान आहे, ते तुम्ही कुठून घेतले आहे?,” असा बोचरा सवाल पंतप्रधानांनी केला. राजस्थानच्या जोधपूर शहरात निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. ”मी एक सामान्य ‘कामदार’ आहे आणि हिंदुत्वाचे परिपूर्ण ज्ञान असल्याचा दावा मी आजवर कधीच केला नाही, पण ‘नामदार’ (राहुल गांधी) मात्र हिंदुत्वाचे पंडित असल्यासारखे बोलत आहेत,” असा चिमटा पंतप्रधानांनी काढला. राहुल गांधींनी एका सभेत, ”नरेंद्र मोदींच्या हिंदुत्वाच्या ज्ञानाचा आधार कुठला?,” असा प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी पंतप्रधानांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पहिले राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यातील एका घटनेचाही उल्लेख केला. ”विदेशी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी नूतनीकरण केलेल्या सोमनाथ मंदिराच्या अभिषेकात सहभागी व्हायला निघालेले राजेंद्र प्रसाद यांना नेहरूंनी विरोध केला होता,” अशी आठवण त्यांनी करून दिली.

 

नेहरू यांचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ”ते नेहमीच आपल्या कोटावर गुलाबाचे फूल लावायचे. या फुलाची ओळख बगीच्याशी आहे, शेती किंवा शेतकऱ्यांशी नाही. त्यांना बगीच्याचे चांगले ज्ञान होते, पण शेतकऱ्यांच्या समस्या आणि शेतीपुढील आव्हानांची माहिती नव्हती. त्याचे परिणाम आजही देशातील शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेस पक्ष आणि पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही जोरदार हल्ला चढविला. हा पक्ष म्हणजे खोटेपणा पसरविणारे विद्यापीठच झाले आहे. जो नेता जास्तीत जास्त खोटे बोलेल, त्याला या पक्षात मोठे पद दिले जाते. त्यातच राहुल गांधी यांची खोटे बोलण्याची क्षमता तर फारच जास्त आहे. राजस्थानमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला सत्तेची फक्त पाच वर्षेच मिळतात. ही परंपरा असल्याने, यावेळी आपण सत्तेत येऊ, असे स्वप्न काँग्रेस पक्ष पाहात आहे, परंतु आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या स्वप्नांचा चुराडा होणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@