मुक्ती : अस्तित्व शोधाचा संघर्ष...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Dec-2018
Total Views |

राज्यनाट्य स्पर्धा : समीक्षण

जळगाव : 
 
राज्य नाट्य स्पर्धेत आज रविवारी 2 रोजी समर्थ बहुउद्देशिय संस्था जवखेडे आयोजित व विशाल जाधव दिग्दर्शित ‘मुक्ती’ ही नाट्यकृती सादर झाली, ती चांगली दाद मिळवती झाली.
 
विख्यात साहित्यिक जी. ए. कुलकर्णी लिखीत हे नाटक अ‍ॅड . शैलेश गोजममुंडे यांनी रूपांतरित केलेले आहे. पौराणिक काळातील ‘एकलव्य’ या धनुर्धारीच्या आयुष्याशी साम्य असणारी संहिता होती. प्रत्येकाचे आयुष्य हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे शापित असते आणि त्यापासून प्रत्येकाला मुक्ती हवी असते.
 
अशाच 2 शापित जीवांची वेदना सांगणारी आणि त्या वेदनेपासून मुक्ती शोधणारी अशी पौराणिक संदर्भ घेऊन शैलेश गोजमगुंडे यांची रहस्यमय अशी संहिता या स्पर्धेने रसिकांपुढे आणली.
 
नायक शिवांग हा भिल्ल जमातीत जन्मल्यामुळे त्याला क्षत्रिय राजपुत्रांना अध्ययन देणार्‍या आचार्याकडून विद्या प्राप्त होऊ शकत नसल्यामुळे तो त्यांच्या पुतळ्यासमोर सराव करून त्यात पारंगत होतो.
 
मात्र हे आचार्यांना कळल्यानंतर ते गुरू दक्षिणेत उजवा हाताचा अंगठा मागून घेतात . मात्र दोन्ही हातांनी तरबेज असणार्‍या शिवांग आपल्या गुरुचे सापापासून सुरक्षित करतो आणि डाव्या हाताने बाण चालवता येतो हे न सांगितल्यामुळे आचार्य त्याला जन्मभर वेदनेत राहण्याच्या रक्तपिती या व्याधींचा शाप देतात.
 
आपल्या स्वराक्षणासाठी वापरलेलं शस्त्र हे कपट नाही, हे आचार्यांना न कळल्यामुळे शिवांग संतप्त होतो आणि त्यांच्या मस्तकावर प्रहार करून निघतो. पुढे आपली चूक लक्षात आल्याने आचार्य त्याला उःशापही देतात.
 
आपल्या मुलाला चूक नसतांना शाप मिळाल्यामुळे शिवांगची आई व्यथित होऊन गुरुकन्येला शाप देते. मात्र त्यात तिचीही चूक नसल्याने तिलाही उःशाप देते आणि या दोघांना मुक्तीचा मार्ग हा बैरागी सांगतो.
 
जेव्हा हे नायक नायिका समोरासमोर येतात आणि एकमेकांच्या मुक्ती साठी एकमेकांच्या मार्फतच प्रयत्न करतात मात्र त्यात त्या उःशापात त्यांना व्याधीपासून मुक्ती न मिळता अप्रत्यक्षपणे पुन्हा तेच आयुष्य मिळते.आणि येथेच वेदनेच्या वारुळात वैराग्य ते स्वीकारून एकमेकांची वेदना आपली समजून आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन भळभळणारी व्याधींची मुक्ती स्वीकारतात.
 
 
भावेश पाटील यांची प्रकाश योजना, रोहिणी निकम यांचे पार्श्व संगीत नाटकास अतिशय अनुरूप. दीपक पाटील यांची रंगभूषा आणि वेशभूषाही पात्रानुसार अनुरूप.मात्र अंकुश काकडे यांचे नेपथ्य थोडे तोकडे पडले. दुसर्‍या अंकात साजेसा बदल करण्यात आला पण त्यातही पौराणिक नाटकाच्या गरजेनुसार विस्तार होणे अपेक्षित होते.
 
 
नाटकाचा विषय विस्तृत उकलून दाखवण्यासाठी सूत्रधार,वृंद आणि गरजेनुसार गीत ,नृत्य यांचा कुशलतेने वापर करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाले.
 

 
 
शुभम सपकाळे यांनी शिवांग आणि अश्विनी कोल्हे यांनी गुरुकन्या या भूमिकांना योग्य न्याय दिला.गणेश सोनार यांचा बैरागीही उत्तमच. त्यांचा भारदस्त आवाज आणि स्पष्ट संस्कृत उच्चार तर कौतुकास्पद. मात्र त्यांचा अभिनय पाठांतरीत वाटला. संवादफेक करीत असताना एका जागी स्तब्ध राहण्याऐवजी नैसर्गिक, अंगभूत हालचाली अपेक्षित होत्या.
 
दीपक पाटील यांनी साकारलेला सूत्रधार काहिसे आवेशी वाटला. मात्र एकंदरीत प्रयोग चांगला झाला असाच म्हणावा लागेल. रसिकांची टाळ्यांची साद वेळोवेळी मिळत होती.
 
आधुनिक काळातील पौराणिक कथेचा संदर्भ घेऊन लिहलेली ही उत्तम अशी संहिता हे या नाटकाचे खास वैशिष्ट्य.विशाल जाधव या होतकरू नव दिग्दर्शकाने नवतरुण कलाकारांना घेऊन नाटक उत्तम सादर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे केला.
 
 
नव कलाकार घडणे आणि आणि नवीन विषय ,नवीन दिग्दर्शन समोर येणे ही आजच्या पिढीची गरज आहे आणि ती गरज विशाल जाधव यांनी पार पाडली. प्रेक्षकांच्या ओठावर ‘विशाल आणि सूक्ष्म आहे ,कणात आहे मुक्ती ...भळभळणार्‍या व्याधीत नाही,तर मनात आहे मुक्ती ’ हे गीत असेलच यात शंका नाही. नाटकाच्या भावी निकालासाठी शुभेच्छा.
@@AUTHORINFO_V1@@