रूपक नवीन वर्षाचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018   
Total Views |

 
३१ डिसेंबरची धामधूम सर्वत्र सुरु होत होती. कायम आपल्या विचारात आणि कामात गर्क असलेल्या चांगल्या मनाला तारुण्याने किंचित आवाज चढवूनच विचारलं, 
 
’अरे, किती वेळचा आवाज देतोय मी. लक्ष कुठंय तुझं ?’ 
 
 
आपल्या तंद्रीतून जागं होत चांगल्या मनाने तारुण्याकडे एक त्रासिक कटाक्ष टाकला आणि ते म्हणालं, ’हं, बोल काय म्हणतोयंस ?’
 
 
’म्हणायचंय काय ? आज ३१ डिसेंबर. नवीन वर्षाच्या पार्टीला जाऊ या ना ?’ तारुण्य उद्गारलं.
 
 
’नवीन वर्ष ? अरे मग पाडव्याला आपण साजरं केलं ते काय होतं ?’ चांगलं मन भाबडेपणानं म्हणालं. यावर तारुण्य खदाखदा हसायलाच लागलं. इतका वेळ तारुण्याच्या पाठीशी शांत उभं राहिलेलं वाईट मनही आता या हसण्यात सामील झालेलं चांगल्या मनाने टिपलं. हसण्याचे हुंदके आवरुन तारुण्य चांगल्या मनाकडे पाहून म्हणालं, 
 
 
’तू कुठल्या जगात आहेस अजून ? अरे, आता सगळं जग एका गावासारखं झालंय. जगाबरोबर चालायचं तर जगाचं कॅलेंडर म्हणजेच आपलं कॅलेंडर नाही का ? साऱ्या जगात नव्या वर्षाचं स्वागत होणार आणि अशा वेळी आपण काय ’पाडवा – पाडवा’ करीत बसायचं का ?’
 
 
यावर काही सेकंदांचा पॉज घेत चांगलं मन उत्तरलं, ’मान्य. एकदम मान्य. म्हणजे जगाच्या बरोबर चालणंही मान्य आणि सध्याचे आपले व्यवहार जगाच्या कॅलेंडरनुसार करावे लागतात हेही मान्य. पण मला एक सांग. जगाच्या बरोबर चालताना आपलं स्वत:चं सर्व सोडून दिलं पाहिजे की आपलं जे चांगलं ते जगाला दिलं पाहिजे ?’ चांगल्या मनाने केलेल्या या युक्तिवादावर तारुण्य चटकन काही म्हणालं नाही पण त्याच्या खांद्यावर हात ठेवून उभ्या असलेल्या वाईट मनाने मात्र आता आघाडी घेतली. एक नजर तारुण्याकडे आणि दुसरी चांगल्या मनाकडे ठेवून ते फ़णकाऱ्याने म्हणालं,
 
 
’याचं नेहमीच असंच असतं. एक तर स्वत: कुठल्या पार्ट्यांना जायचं नाही आणि दुसऱ्यांनाही नीट आनंद घेऊ द्यायचा नाही. काही साजरं करायचं असेल तर याचा त्याला नेहमीच विरोध.’
 
 
आपली नजर तारुण्यावर ठेवीत हसत हसत चांगलं मन उद्गारलं, ’असं काही नाही रे बाबा. तूच आठव की. वर्षातून कितीतरी सणसमारंभ आपण एकत्रच साजरे केले आहेत. पण खरं सांगु का ? त्या सर्व सणांना संस्कृतीचं एक भरभक्कम अधिष्ठान होतं. अर्थात त्यातल्याही बऱ्याचशा संस्कृती आता विकृती होण्याच्या मार्गावर असल्या तरी मुळात अधिष्ठान संस्कृती आणि परंपरेचं असल्याने काहीतरी पावित्र्य अजूनही टिकून आहे. तसं या ३१ डिसेंबरमागे काही दिसत नाही. ना कुठलं सांस्कृतिक अधिष्ठान ना कुठली उदात्त परंपरा. केवळ काहीतरी साजरं करण्यापुरती ’सेलिब्रेशन’ची परंपरा नाही रे आपली.’
 
 
वाईट मन आता चांगलंच चिडलं. ’याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही’ असे तुच्छतादर्शक हावभाव चांगल्या मनाकडे बघून करीत त्याने तारुण्याला इशारा केला. बुद्धिमान तारुण्य चांगल्या मनाकडे बघून आता आपली बाजू हिरिरीनं मांडू लागलं, 
 
 
’संस्कृती आणि परंपरेच्या गप्पा बस्स झाल्या आता ! एक तर ज्या संस्कृतीबद्दल तू बोलतो आहेस त्या संस्कृतीचं हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की जगात जे जे म्हणून चांगलं आहे ते ते स्वीकारा. मुख्य म्हणजे काळाप्रमाणे योग्य ते बदल करा. दुसरे म्हणजे, ’३१ डिसेंबर’ साजरा करण्यामागे काही सांस्कृतिक अधिष्ठान नाही असं कसं म्हणता येईल ? जुन्या वर्षाला समारंभपूर्वक निरोप देत नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करणं ही एक उदात्त परंपरा नाहीये का ?’ यावर वाईट मनाने मान हलवून दुजोरा दिला.
 
 
प्रदीर्घ श्वास घेऊन चांगलं मन निर्धारानं बोलू लागलं, ’तारुण्या ! तू मोठा बुद्धिमान तर आहेसच, पण चतुरही आहेस. बुद्धिमान अशासाठी की तुझा युक्तिवाद खरोखरीच बिनतोड आहे आणि चतूर यासाठी की जे आपल्याला सोयीचं नाही त्याचा उच्चारही तू केला नाहीस. तू म्हणालास ते अगदी खरंय. जगात जे जे म्हणून चांगलं ते ते स्वीकारणे आणि काळाप्रमाणे योग्य ते बदल करीत राहणे हे आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, हे निर्विवाद. ’केवळ आपलं नाही म्हणून टाकून द्या’ इतका संकुचित विचार मीही कधी करीत नाही. हा विषय केवळ नवीन वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत करणं एवढ्यापुरताच मर्यादित असता तर कदाचित मीच इतका विरोध केला नसता. आपला सांस्कृतिक वारसा तू बरोबर सांगितलास पण ’३१ डिसेंबर’ च्या रात्री या देशातले तुझे सगळे सगेसंबंधी मद्यालयात किंवा अन्यत्रही मद्याच्याच सहवासात बेभान असतात आणि तेच मुख्य आकर्षण असतं, हे सांगायचं मात्र तू चतुराईने टाळलंस. एकीकडे ३१ डिसेंबरला एकूणच निसर्गात जाणवणारे शैथिल्य, मरगळ आणि दुसऱ्या बाजुला चैत्रात गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गात होणारे स्वाभाविक चैतन्यमयी बदल याबद्दल मी फ़ार काही बोलत नाही. तू स्वत: बुद्धिमान असल्याने तुला ते सर्व माहित आहे. काळाच्या बरोबर चालत असताना निसर्गाच्याही बरोबर जायला हवे की नको ? जेव्हा सृष्टीमध्ये सर्वत्र नवचैतन्याची बरसात निसर्गातूनच होते, त्याचवेळी जुनी मरगळ झटकून मांगल्यमय गुढी उभारुन नवीन वर्षाचा शुभारंभ करणे आणि ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत दारु पिऊन धुंदपणे कर्कश्य संगीतावर धांगडधिंगा करीत पहाटे दिनारंभाला मात्र गाढ झोपी जाणे या दोन्हीत काहीतरी फ़रक तुला जाणवतो की नाही ? ज्या तारुण्यावर देशाची सगळी भिस्त असते ते तारुण्य वर्षाच्या प्रारंभी दारु पिऊन बेभान होतं आणि सुरुवातच अशी झाल्याने पुढे वर्षभरही वेगवेगळ्या निमित्ताने अशीच साजरीकरणे चालूच राहतात, ही कल्पनाच मला असह्य वाटते.’
 
 
थोडी शांतता पसरली. पण अजून वाईट मनाचा हात खांद्यावरच असल्याने काही क्षण विचार करुन तारुण्य म्हणालं, ’मी म्हणजे बिनधास्तपण. मी म्हणजे बेफ़िकिरी मी म्हणजेच चैतन्य.. मग मी सोबत असताना लोकांनी थोडी मौजमजा केली तर त्यासाठी एवढे बौद्धिक कशाला द्यायला हवे ? मौज-मजा करुच नये की काय ?’
 
 
आता मात्र चांगलं मन हसू लागलं. हसू आवरुन ते म्हणालं, ’आत्ता काही वेळापूर्वी जी संस्कृती तू मला समजावून सांगत होतास ती आहे त्यागावर आधारलेली. आपल्या देशातील घराघरात आजही फ़ोटो लागतात ते कुणा धनाढ्य व्यापाऱ्यांचे नाहीत तर ज्ञानेश्वर-तुकारामांपासून ते विवेकानंदांपर्यंतच्या परंपरेतील सर्वसंगपरित्याग केलेल्या साधु-संन्याशांचेच. मग असे असताना ही मौज-मजा आली कुठून ? तारुण्यात मौज-मजा करता येते हे खरेच, पण मग आपल्या मातृभूमीच्या उत्थानासाठी काम करायचे झाल्यास तारुण्यापेक्षा योग्य कालावधी कुठला ? छत्रपती शिवराय, महात्मा फ़ुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, भगतसिंघ या महापुरुषांनी तारुण्यात केवळ मौज-मजाच करायचे ठरवले असते तर आज आपण कुठे असतो ? आजही देशाची स्थिती पाहिली तर आयुष्यभर पुरतील इतकी चांगली कामे आपली वाट पाहताहेत. तू नुसतं मनात आणलंस तर देशातले दैन्य तुला सहजपणे समृद्धीमध्ये परिवर्तित करता येईल. तुझे सामर्थ्य खरोखरीच अफ़ाट आहे. फ़क्त मौज-मजेच्या या दुष्टचक्रात अडकणे तुला खूप निग्रहाने टाळायला हवे. अरे, नवीन काही साजरे करायला आपला विरोध कधीच नव्हता आणि नसणारही आहे. पण संस्कृती म्हणून विकृतींचा प्रसार रूढ होत असेल तर मात्र आमच्या देशातील तरुणाईला नशेत अडकवू पाहणारे असे असे प्रयत्न हाणून पाडलेच पाहिजेत. आणि तुझ्याशिवाय हे कोण करणार ? तूच, केवळ तूच हे करु शकतोस.’
 
 
चांगले मन आता बोलायचे थांबले होते. वाईट मन अचानक कुठेतरी दिसेनासे झाले. तारुण्य अंतर्मुख झाले.
३१ डिसेंबरची रात्र संपून नवीन वर्षाचा सूर्य उगवला. सूर्याइतक्याच तेजस्वी तारुण्याने सूर्याकडे पाहिलं, क्षणभर डोळे मिटले आणि खणखणीत आवाजात सूर्यनमस्काराचा पहिला मंत्र म्हटला, 
 
’ॐ मित्राय नम:’
  
…..खास नवीन वर्षाच्या निमित्ताने !
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@