संवादाचा पूल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Dec-2018
Total Views |

 


 
 
तरुण मुलांच्या बाबतीत पालकांना हेतुपुरस्सर धोके पत्करणे आणि तफावतीच्या दरीवर संवादाचा पूल बांधत राहणे अत्यंत गरजेचे आहे.
 
न्यू इयर पार्टी. १६ वर्षाची रितू पहिल्यांदाच मित्रमंडळींबरोबर पार्टीला गेलेली. रात्री साडेबाराच्या आत तर ती घरात येणे अशक्य. यावर्षी तिने खूपच हट्ट केला म्हणून मग जाऊ दिलं, नाहीतर नेहमीप्रमाणे कुटुंबाबरोबर नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा प्लॅन झालाच असता. दोस्तांची पार्टी म्हणजे तिथे काय काय असेल कुणास ठाऊक? रितू लहान आहे अजून. जग वाईट आहे हे कसं सांगणार तिला? विनीतच्या मनातली खळबळ त्याच्या येरझाऱ्यांवरून मानसीने टिपली. घड्याळात रात्रीचे साडेअकरा. रितूच्या आजीला “तुम्ही झोपा शांतपणे. येईल रितू थोड्या वेळात,” असे सांगून, खोलीतला दिवा मालवून ती सोफ्यावर येऊन बसली आणि विनीतच्या येरझाऱ्या शांतपणे बघत राहिली. तो स्वत:हून बोलेपर्यंत त्याच्याशी आत्ता काहीही बोलणे म्हणजे वादाला निमंत्रण हे तिला २० वर्षांच्या अनुभवाने माहीत होते. एरवी आपल्या शांत स्वभावाचे चारचौघात कौतुक करणारा विनीत आता कुठल्याही क्षणाला आपल्या त्याच शांतपणावर भडकणार आहे, हेही तिला जाणवत होते. “मानसी, मी रितूला फोन करतो. पण, ती उचलत नाहीये. काय गरज होती तिला पार्टीला पाठवायची? लहान आहे ती अजून. तिचं भलं-वाईट कळतंय का तिला? केवढी रिस्क आहे ही? तू इतकी शांत कशी बसू शकतेस? अजिबात कशी काळजी नाही तुला?” विनीतच्या शेवटच्या वाक्यावर मात्र मानसीने त्याला थांबवले.
 
“विनीत, मी आई आहे तिची. मला काळजी नाही असं कसं होईल रे?” मानसीने सौम्य आवाजात, पण स्पष्टपणे दिलेल्या या प्रतिसादाने विनीत थोडा खजील झाला. तो तिच्याशेजारी बसला. मानसी शांतपणे त्याच्याशी बोलू लागली, “मित्रा, रितू आपलं बछडं असलं आणि ती तशीच इवलीशी चिमणी राहावी असं आपल्याला कितीही वाटलं तरी, ती आता मोठी झाली आहे, हे आपण स्वीकारायला हवं. आपल्या जगाचा भाग नसलेलं तिचं स्वतंत्र असं एक जग आहे. ते यापुढे वाढत जाणार आणि ती त्यात जास्त रमत जाणार हेही आपल्याला माहीत आहे. तिचं पहिलं पाऊल टाकणं जसं आपण उत्साहानं साजरं केलं होतं, तशीच तिच्या बाहेर पडू पाहणाऱ्या या पावलांनादेखील आपण पाठिंबा द्यायला हवा. तिच्या वाटांवरचे टक्के-टोणपे तिलाच सहन करायला हवेत. यावेळचा तिचा पार्टीला जाण्याचा हट्ट खरंतर मलाही मुळीच पसंत नव्हता. पण, तिच्या उत्साहावर विरजण घालून मला तिला ‘हम करे सो कायदा’ असा संदेश द्यायचा नव्हता. अशा पार्ट्यांमधल्या धोक्यांविषयी आणि घ्यायच्या काळजीविषयी मी सविस्तर बोलले तिच्याशी. तिच्याबरोबर कोण जाणार आहे, त्यांचे फोन, पत्ते हे सगळं माझ्याकडे आहे. तिच्या मित्रमंडळींच्या पालकांशीही बोलणं झालं आहे माझं. महत्त्वाचं म्हणजे, माझा रितूवर विश्वास आहे आणि हे तिला व्यवस्थित माहिती आहे. मला खात्री आहे की, असल्या पार्ट्यांमधला फोलपणा आज ना उद्या तिच्या लक्षात येईल. पण, हे ज्ञान तिला तिच्या अनुभवातून होणं गरजेचं आहे... आपण निर्बंध घातले, तर फक्त कटुता येईल.” विनीतने एक दीर्घ श्वास घेतला. छानसं हसून तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलने म्हणाला, “बायको, लय भारी आहेस तू.”
 

बहुतांश घरांमध्ये पालक आणि तरुण मुलांच्या बाबतीत मूल्यांविषयीची अशी तफावत दिसून येते. या तफावतीतून उद्भवलेल्या मतभेदांचे पर्यवसन घरात कुणाची सत्ता चालते, यावर अवलंबून असते. मूल केंद्रस्थानी असलेल्या घरांमध्ये तरुण मुले पालकांशी बेफिकिरीने वागतात, बेदरकार चुका करतात. घाबरून असणारे पालक काय करणार? ‘ऐकतच नाही हो’ असे म्हणत हतबल वाटून घेतात. पालकांची सत्ता असणाऱ्या घरांमध्ये त्यांच्यासमोर दबून राहणारी मुले मनात मात्र विद्रोह जपतात. जरा मोकळीक मिळाली की, बेदरकारपणे वागतात. यांच्या चुका पालकांना कळल्या, तर हुकूमशाही शिक्षा. त्यातून पुन्हा वाढीस लागलेला विद्रोह हे चक्र चालूच राहते. म्हणूनच तरुण मुलांच्या बाबतीत पालकांना हेतुपुरस्सर धोके पत्करणे आणि तफावतीच्या दरीवर संवादाचा पूल बांधत राहणे अत्यंत गरजेचे आहे.

 

- गुंजन कुलकर्णी

(लेखिका नाशिक येथे बाल व कुटुंब मनोविकासतज्ज्ञ आहेत.)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@