पैसा वसूल मसालेदार मराठमोळा 'सिम्बा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |


 


ॲक्शन, ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्स यांच्यातील समतोल साधल्यामुळे 'सिम्बा' लक्षात राहतो. सिंघमआणि गोलमालच्या यशानंतर रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपट पाहणाऱ्यांचा वेगळा वर्ग तयार झाला आहे. यात सिम्बानेही वेगळी जागा मिळवली यात शंका नाही. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांसारखाच हा प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करून जातो. या चित्रपटाचा शेवट नेहमीसारखा न करता प्रवाहापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न रोहितने केला आहे. तो वेगळेपणा काय ते पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहापर्यंत जावे लागेल. या चित्रपटाची आणखी एक खासियत म्हणजे मराठी कलाकारांची फौज. रोहित शेट्टीने या चित्रपटामध्ये १४ मराठी कलाकारांसह काम केले आहे. अजय देवगण आणि अक्षय कुमार यांच्या एंट्रीला टाळ्या, शिट्यांचा वर्षाव होतो. चित्रपटाचे संवाद प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात पण भावनिक प्रसंग विचार करण्यास भाग पाडतात.

 

ॲक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा आणि सिम्बा

 

संग्राम भालेराव उर्फ सिम्बा (रणवीर सिंग) हा अनाथ असतो. लहानपणापासून पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करतो. जेव्हा त्याला कळते की पोलीस झाल्यावर पावर आणि पैसा दोन्ही मिळते. तेव्हापासून तो पोलीस बनण्याचा निर्धार करतो आणि मोठा होऊन तो एसीपी संग्राम सिम्बा भालेराव बनतो. त्याची बदली मिरामर पोलीस ठाण्यात होते. एक भ्रष्ट पोलीस इन्स्पेक्टर म्हणून त्याची कामगिरी तो तिथेही चालू ठेवतो. अशामध्येच त्याची ओळख होते ती दुर्वा रानडेशी (सोनू सूद). त्याच्या गुंडगिरी आणि काळ्या धंद्याची पूर्ण मिरामारमध्ये चर्चा असते. तो आणि त्याचे दोन भाऊ, गौरव (सौरभ गोखले) आणि सदाशिव (अम्रित सिंग) रानडे सर्व बेकायदेशीर कामे करत असतात. अशातच भ्रष्ट सिम्बा त्याचा खास माणूस म्हणून काम करत असतो. दरम्यान, सिम्बाच्या पोलीस ठाण्यासमोर कॅफे चालवणाऱ्या शगुन साठेच्या (सारा अली खान) प्रेमात पडतो. अशामध्ये त्याची ओळख होते ती आकृती दवे (वैद्येही परशुरामी) हिच्याशी. अनाथ मुलांची रात्र शाळेमध्ये शिक्षण देण्याचे काम ती करत असते. त्यानंतर असा प्रसंग घडतो की ज्यामुळे सिम्बाचे आयुष्य बदलून टाकते. तो सुधारतो का? पोलिसी खाक्या त्याकडून काय काय कामे करवून घेतो? यासाठी तुम्हाला चित्रपट गृहापर्यंत जावे लागेल. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध या दोन्हीमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात दिग्दर्शकाला यश मिळाले आहे हे नक्की.

 

का पाहावा?

 

'सिम्बा'मध्ये कॉमेडीसोबतच ॲक्शन, ड्रामा आणि रोमान्सचा योग्य समतोल आहे. रणवीर सिंग, सारा अली खान आणि सोनू सूदने त्यांच्या भूमिका योग्य पार पाडल्या आहेत. सारा अली खानची मोठी भूमिका नसली तरीही तिच्या अभिनयामुळे ती लक्षात राहते. त्याचसोबत सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, सुचित्रा बांदेकर, आशुतोष राणा, नंदू माधव, अश्विनी काळसेकर, अरुण नलावडे, विजय पाटकर, अशोक समर्थ, वैद्येही परशुरामी इ. कलाकारांनी आपापली भूमिका उत्तम निभावल्या आहेत. चित्रपटाची गाणी खास लक्षात राहत नाहीत पण तेवढ्यापुरती आपले मनोरंजन करतात. अमर मोहिले यांचे पार्शवसंगीत मात्र चित्रपट गृहाच्या बाहेर पडल्यावरही लक्षात राहते. रोहीत शेट्टीचे दिग्दर्शन 'सिंघम'ची आठवण करून देतो. फरहाद संजय यांचे संवाद हसवतातही आणि शिकवणही देऊन जातात. या चित्रपटामध्ये अजय देवगणचा छोटा कॅमियो जरी असला तरी तो उगाच टाकला आहे असे वाटत नाही.

 

का टाळावा ?

 

काही दृश्य मनाला खटकतात. एका क्षणाला पूर्वाध टिपिकल रटाळ वाटू लागतो. विशेष म्हणजे रोहित शेट्टीचा चित्रपट म्हणजे फक्त ॲक्शन आणि कॉमेडी असेल असे विचार करून जर तुम्ही हा चित्रपट बघणार असाल, तर हा चित्रपट काही सामाजिक प्रश्नांवरही भाष्य करतो. एकूणच, हा चित्रपट सिघमच्या जवळपास जातो असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे, तुम्ही हा चित्रपट कुटुंबासमवेत बघू शकता. चित्रपटाच्या शेवटी तुम्हाला खिळवून ठेवण्यासाठी यावेळेस रोहित शेट्टीने एक हॉलीवूडचा पॅटर्न वापरला आहे. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे सुट्ट्यांमध्ये चांगली पर्वणी आहे.

 

- अभिजीत जाधव

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@