मंत्रोच्चारात ‘गोदास्पंदन’ कार्यक्रमाचा शुभारंभ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018
Total Views |



त्र्यंबकेश्वर : ‘संस्कार भारती’ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय कला संग्रहालय, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘गोदास्पंदन’ या तीन दिवसीय कार्यक्रमास दि. २८ डिसेंबर रोजी येथील कुशावर्त तीर्थ येथे मंत्रोच्चारात कलश पूजन आणि गोदा पूजन करून मंगलमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० च्या सुमारास येथील कुशावर्त तीर्थावर पूजनप्रसंगी ‘संस्कार भारती’चे कार्यकर्ते, प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक राजदत्त, आयजीएनसीचे अभय मिश्रा, त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, प्रभारी नगराध्यक्ष स्वप्नील शेलार, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे सत्यप्रिय शुक्ल, रा. स्व. संघाचे नाशिक महानगर सहसंघचालक प्रदीप केतकर आदी उपस्थित होते. यावेळी, विधिवत कलश पूजन आणि गोदा उगमस्थान असलेल्या कुशावर्त तीर्थाचे पूजन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

 

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात राजदत्त, पुरुषोत्तम लोहगावकर, सत्यप्रिय शुक्ल यांनी त्र्यंबकेश्वर येथील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राजदत्त म्हणाले की, “गोदास्पंदन हा एक अनोखा उपक्रम असून ‘संस्कार भारती’ने हे कार्य यशस्वी केले आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.” गोदास्पंदन कार्यक्रमातील ‘नदी स्वच्छता’ या उपक्रमाबद्दल भाष्य करताना राजदत्त म्हणाले की, “मानवाच्या विकासात नदीचा वाटा हा बहुमोल आहे. त्यामुळे तिची स्वच्छता ही अत्यंत आवश्यक बाब आहे आणि याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावयास हवी. स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून करावयास हवी.”

 

यावेळी बोलताना लोहगावकर म्हणाले की, “गोदा ही सत्य युगापासून प्रवाही आहे. मात्र, आजच्या कलियुगात तिला अनेकविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. गोदेचे जलस्त्रोत पुनर्जीवित व्हावे यासाठी त्र्यंबक नगरपरिषदेच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.” यावेळी सत्यप्रिय शुक्ल यांनी त्र्यंबकनगरीपासून या उपकारांची सुरुवात केल्याबद्दल ‘संस्कार भारती’ व ‘आयजीएनसीए’ यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले. यावेळी ‘संस्कार भारती’चे अखिल भारतीय सहकोषप्रमुख रवींद्र बेडेकर यांनी त्र्यंबकवासीयांचे मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल आभार मानले. तसेच, ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून ‘नदी’ या विषयावर सुरू असलेल्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@