दौऱ्याची हौस कशासाठी?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018   
Total Views |


 


गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दरवर्षी पावसाने निरोप घेतल्यानंतर ताप, हिवताप, डेंग्यू असे साथीचे आजार डोके वर काढतात. या आजारांमध्ये कित्येक नागरिकांचा बळी जातो. त्यातच भर पडली आहे ती क्षयरोगाची. क्षयरोग, एमडीआर आणि एक्सडीआर हे क्षयरोगाचे तीन टप्पे. एमडीआर आणि एक्सडीआरमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मुंबापुरीत आणखी एका समस्येने भीषण स्वरूप धारण केले आहे. मुंबईत बळावणाऱ्या क्षयरोगावर मात करण्यासाठी पालिकेकडून निरनिराळ्या उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र, या उपाययोजना केल्या जात असताना रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात, परंतु तेच त्यांच्या जिवावर बेतते. त्यामुळे उपचार टाळणाऱ्या रुग्णांना शोधून काढणे, हे या पथकांसमोरील मोठे आव्हान आहे. बहुसंख्य रुग्ण क्षयामुळे त्रस्त होऊन मध्येच औषध घेणे बंद करतात. त्यांना शोधून त्यांच्यावर उपचार सुरू ठेवले जातात. या आजारामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे तो जनजागृतीचा. पालिका जाहिरातीच्या माध्यमातून जनजागृती करतेही, पण त्या तुलनेत स्थानिक नगरसेवकांनीही पुढाकार घेणे आवश्यक आहे, ते दिसत नाही. असे असताना मुंबईतील क्षयरोग रुग्णालयाकडे आरोग्य समितीमधील नगरसेवक अभावानेच फिरकतात. परंतु, याच नगरसेवकांना नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि नैनितालमधील टी. बी. सॅनिटोरियम रुग्णालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा झाली आहे. त्यामुळे नगरसेवकांनी अनुक्रमे दिल्ली-नैनिताल येथे अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. त्याचा खर्च पालिकेच्या तिजोरीत करदात्यांच्या पैशांतून केला जावा, अशी नगरसेवकांची इच्छा आहे. दिल्ली-नैनितालला जाण्यास उत्सुक असलेल्या आरोग्य समितीमधील किती सदस्यांनी परळ येथील क्षयरोग रुग्णालयाला भेट दिली? मुंबईत सध्या क्षयरोग रुग्णांची संख्या किती आहे, या रुग्णांना कोणत्या-कोणत्या सोयी-सुविधा दिल्या जातात, त्यांच्या पोषण आहार योजनेबाबत सदस्यांनी किती वेळा आढावा घेतला, असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जर हे सदस्य रुग्णालयात फिरकत नाहीत किंवा ते त्या रुग्णांच्या समस्यांबद्दल अनभिज्ञ असतील तर ही दौऱ्याची हौस कशासाठी? असाच सवाल उपस्थित होतो.

 

...तर रस्ते सुधारतील का?

 

मुंबईतील रस्ते कामांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. या रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे कित्येक अपघातही घडतात. या अपघातात अनेकांचा बळी जातो, मात्र पालिकेच्या रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च राहते. खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातात मृत्यू झाल्यावर नगरसेवक पालिकेत गोंधळ घालतात. तसेच मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना भरपाई द्या आणि कंत्राटदारावर, अधिकार्‍यांवर कारवाई करा, अशी मागणी करतात. ते चार दिवस चालते, परंतु त्यानंतर पुन्हा त्याच कंत्राटदाराच्या गळ्यात कामाची माळ पडते आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ सुरू होते. पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर रस्तेदुरुस्तीची कामे हाती घेतली जातात, पण एकदा दोनदा कोसळलेल्या मुसळधार पावसातच या रस्त्यांची अक्षरक्ष: चाळण होते. नवीन खड्ड्यांची भर पडल्याने खड्डे बुजवताना पालिकेची दमछाक होते. या पार्श्वभूमीवर चेरापुंजीमध्ये सर्वाधिक पाऊस पडत असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्त्य समितीला (शहरे) मेघालयातील रस्त्यांचा अभ्यास करण्याची तीव्र इच्छा झाली आहे. मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानंतर सखल भागांत पाणी साचते. त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा होते. मेघालयातील चेरापुंजी येथे देशातील सर्वाधिक पाऊस कोसळतो. मात्र, तरीही तेथील रस्ते रस्ते सुस्थितीत आहेत. त्यामुळे तेथील पर्जन्यजल वाहिन्यांची बांधणी करताना वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी शिलाँग-मेघालय येथे अभ्यास दौरा आयोजित करण्याची इच्छा स्थापत्त्य समिती (शहर) मधील नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. तसा प्रस्ताव समिती सदस्यांनी एकमताने मंजूरही केला आहे, तर पावसाळ्यात पाणी साचून खड्डे पडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी स्थापत्त्य समिती (शहर)मधील किती सदस्यांनी प्रयत्न केले, अशी विचारणाही होऊ लागली आहे. गटनेत्यांच्या बैठकीत चर्चा होण्यापूर्वीच या अभ्यास दौर्यांबाबत टीका सुरू झाल्यामुळे त्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रस्तेदुरुस्ती आणि मुंबई महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, रस्त्यांवरील खड्डे हे कमी न होता वाढतच असतात. हा खर्च वाया गेला, असा आरोप विरोधक करत असतात. या दौऱ्यामुळे रस्त्यांच्या अवस्थेमध्ये काही सुधारणा होणार की केवळ नगरसेवकांचे पर्यटन होणार आहे, ते काही दिवसांनी स्पष्ट होईल.

 

-नितीन जगताप

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@