संवेदनशीलता जपणारे नाशिक पोलीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2018   
Total Views |



पोलीस म्हटले की, आपल्या नजरेसमोर उभी राहते ती एक कणखर प्रतिमा. कधीतरी त्यांच्या कामाप्रती असणारा अपप्रचारदेखील ऐकावयास मिळतो. कायम पोलीस दलातील गैरकारभाराच्या बातम्या या ऐकिवात असतात. मात्र, गुन्हे तपासात अग्रक्रम ठेवण्याबरोबरच मानवी मनातील संवेदनशीलता जपणारे पोलीस दल म्हणून नाशिक शहर पोलीस दलाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.


पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या नेतृत्वखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून नाशिक शहर पोलीस दलामार्फत विविध कल्याणकारी उपक्रमही राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दि. ३० डिसेंबर रोजी ‘नाईट रन’द्वारे शहरवासीयांना तंबाखूमुक्तीचा संदेश देण्यात येणार आहे. बदला घेणे, या धारणेपेक्षा बदल घडविणे, या पद्धतीवर विश्वास असणाऱ्या नाशिक पोलीस दलाने या मोहिमेचे नावही ‘नाईट ऑफ रन फॉर जॉईन द चेंज’ असे समर्पक ठेवले आहे. या माध्यमातून भारताचे भविष्य असणाऱ्या तरुण पिढीला निर्व्यसनी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य देण्याचा प्रयत्न नवीन वर्षात पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे. पोलीस दलातर्फे नाशिकमधील मानवता क्युरी कॅन्सर सेंटरच्या सहकार्याने ‘जॉईन द चेंज तंबाखूमुक्त नाशिक अभियान’ सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपक्रमाचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून नाशिक पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल संदीप गांगुर्डे यांची निवड करण्यात आली आहे.

 

गांगुर्डे हे गेल्या २७ वर्षांपासून तंबाखूचे सेवन करत होते. मात्र, त्यांना व्यसनमुक्तीचे महत्त्व दलातर्फे पटवून देण्यात आल्यावर त्यांनी भर पोलीस दरबारात “तंबाखूचे सेवन यापुढे कधीही करणार नाही,” असे जाहीर केले. सरकारी दल असलेल्या पोलीस दलाने संपूर्ण शहरातील नागरिकांसाठी असा संकल्प करणे आणि तरुण पिढीला निर्व्यसनी, निरोगी आणि सुदृढ आयुष्य देण्यासाठी प्रयत्न करणे, हे राज्यात पहिल्यांदाच होत आहे, हे विशेष! या उपक्रमात केवळ पोलीस दलातील कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सहभागी करून घेण्यात आले आहे. राज्यात प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या ५ किमीच्या या दौडमध्ये सुमारे सहा हजार नाशिककर आपला सहभाग नोंदविणार आहेत. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनीही नाशिक पोलीस दलाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. नाशिक शहर पोलीस दलाने आजवर सुमारे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल या दलातर्फे फिर्यादींना परत करण्यात आला आहे. नाशिक पोलीस दलातर्फे मुद्देमाल वाटपाचा कार्यक्रम वेळोवेळी आयोजित करून फिर्यादी व अर्जदार यांना मुद्देमाल वाटप करण्यात आलेला आहे. पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी पोलीस मुख्यालय, नाशिक शहर येथे अद्ययावत ‘व्यायामशाळा’ उभारण्यात आलेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या विश्रामगृहाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नवीन पोलीस क्लबच्या बांधकामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आलेली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांकरिता पोलीस मुख्यालयात ‘मंथन वाचनालय’ सुरू करण्यात आलेले असून २५०० पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

 

पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांच्या रोजगारासाठी आयुक्तालयीन विविध कंपनी उद्योजक, आयमा, निमा यांच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून रोजगार मेळावा मार्गदर्शनपर शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी नाशिक मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खास महिला पोलीस कर्मचाऱ्यांकरिता पोलीस ठाण्याच्या इमारतीत चेंजिंग रूमही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांच्या लहानग्यांसाठी पाळणाघरदेखील सुरू होणार आहे. पोलीस पाल्यांच्या करियर उपलब्धीकरिता पोलीस मुख्यालयात शूटिंग रेंजदेखील उभारण्यात आली आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तणावमुक्त करण्याकरिता योग शिबीर, एम. एस. धोनी व दंगल यासारखे प्रेरणादायी चित्रपट दाखविणे, सही रे सही या मराठी नाटकांच्या प्रयोगाचे आयोजन करणे, धार्मिक प्रेक्षणीय स्थळे-शिर्डी, त्र्यंबकेश्वर इ. ठिकाणी नियमित सहलींचे आयोजन करणे, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी देणे हे उपक्रम राबविण्यात येतात. तसेच, पोलीस पाल्यांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीकरिता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. याशिवाय छोटा पोलीस, वाहतूक राजदूत, नो हॉर्न, वाहतूकमित्र, वाहतूक सारथी, हेल्मेट रॅली, वाहतूक पोलिसांच्या सुरक्षेसाठी बॉडी वॉर्न कॅमेरा, चारचाकीसाठी हायड्रोलिक टोईंग व्हॅन, सायबर जागरूकता, ऑपरेशन आधार, भिकारी निर्मूलन कार्यक्रम, ऑपरेशन मुस्कान आदी कार्यक्रमदेखील राबविण्यात येत असतात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@