रामविलास पासवान आणि बिहारचे जागावाटप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |

 
 
रालोआच्या, बिहारमधील जागावाटपाची अखेर रविवारी अधिकृत घोषणा झाली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, जदयुचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि लोजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या संयुक्त पत्रपरिषदेत जागावाटपाची औपचारिक घोषणा झाली. भाजपा आणि जदयु यांच्यात आधीच जागावाटपाबाबत मतैक्य झाले होते. मात्र, भाजपाने जदयुसोबत हातमिळवणी केल्यामुळे मोदी सरकारमध्ये मानवसंसाधन मंत्री असलेले राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह नाराज झाले. बिहारच्या राजकारणात उपेंद्र कुशवाह आणि नितीशकुमार यांचा छत्तीसचा आकडा आहे, त्यामुळे भाजपाने नितीशकुमार यांच्या जदयुला रालोआत आणल्यामुळे उपेंद्र कुशवाह दुखावले गेले.
उपेंद्र कुशवाह तसेही रालोआ सोडणारच होते. पण, आपल्या फायद्यासाठी रालोआ सोडण्याचा निर्णय घेण्याऐवजी त्यांनी, भाजपाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे आपल्याला भाजपापासून दूर जावे लागत असल्याचे चित्र उभे केले, त्यामुळे त्यांची बिहारच्या महाआघाडीतील ‘बार्गेनिंग व्हॅल्यू’ वाढली. भाजपाने आपल्यापरीने उपेंद्र कुशवाह यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, भाजपात राहण्यापेक्षा भाजपा सोडणे राजकीयदृष्ट्या जास्त फायद्याचे असल्याचा समज उपेंद्र कुशवाह यांनी करून घेतला.
 
 
 
राजदच्या नेतृत्वातील महाआघाडीत सामील होण्याचा उपेंद्र कुशवाह यांचा निर्णय चूक की बरोबर, याचा पडताळा लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच येणार आहे. मात्र, उपेंद्र कुशवाह यांच्या भाजपा सोडण्याच्या निर्णयाचा सर्वाधिक फायदा रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाने उचलला. पासवान यांना तसेही भारतीय राजकारणातील हवामानतज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. वार्याची दिशा कोणती आहे, हे राजकारणातील दोन व्यक्ती सांगू शकतात, यातील एक आहेत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार आणि दुसरे आहेत लोजपाचे रामविलास पासवान. पासवान यांचा तर या विषयाचा दांडगा अभ्यास म्हणावा लागेल. त्यामुळे केंद्रात जेव्हा कॉंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडीचे सरकार येण्याची शक्यता असते, तेव्हा पासवान भाजपा आघाडी सोडून कॉंग्रेसच्या आघाडीत जातात आणि भाजपाच्या नेतृृत्वातील आघाडीचे सरकार येण्याची शक्यता असते, तेव्हा कॉंग्रेसची आघाडी सोडून भाजपात येतात. त्यामुळे केंद्रात सरकार कुणाचेही असले, तरी पासवान यांचे मंत्रिपद पक्के असते. यावेळच्या राजकीय अस्थिरतेची किंमत पासवान यांनी भाजपाकडून पुरेपूर वसूल केली.
 
बिहारमधील लोकसभेच्या 40 पैकी जदयु आणि भाजपा प्रत्येकी 17 जागा लढवणार आहे. पासवान यांच्या पक्षाला 6 जागा देण्यात आल्या. याशिवाय रामविलास पासवान यांना आसाममधून राज्यसभेवर पाठवण्याची तयारी भाजपाने दर्शवली आहे. पासवान यांची सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याची इच्छा आहे. शारीरिकदृष्ट्या थकल्यामुळे पासवान यांना राजकारणातून निवृत्ती घ्यायची नाही, तर त्यांना आपल्या मुलाचे- चिरागचे राजकीय पुनवर्सन करायचे आहे.
चित्रपटसृष्टीत अपयशी ठरल्यामुळे चिराग राजकारणात आला. एका चित्रपटात त्याने नायकाची भूमिका केली होती. राजकारणात पदार्पण केल्यावर पासवान घराण्याचा कुलदीपक असलेला चिराग लोजपाच्या संसदीय पक्षाचा नेता झाला. त्याला आता मंत्री करण्यासाठी पासवान यांचे बापाचे हृदय तळमळत आहे. मी मंत्रिपदाचा राजीनामा देतो, माझ्या जागेवर लोजपाच्या कोट्यातून चिरागला मंत्री बनवा, अशी विनंती पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली होती, पण त्याला मोदी तयार झाले नाहीत.
 
 
पासवान यांनी आता लोजपाची जवळपास सर्व सूत्रे चिरागच्या हातात दिली आहेत. चिरागचे महत्त्व वाढवण्यासाठी तसेच त्याच्याबद्दल भाजपाच्या नेतृत्वात सॉफ्टकॉर्नर निर्माण करण्यासाठी 2014 मध्ये लोजपाचा रालोआत येण्याचा निर्णय चिरागचाच होता, असे पासवान ठिकठिकाणी सांगत होते. विशेष म्हणजे यावेळीही मोदी सरकारबद्दलची लोजपाची नाराजी पासवान यांनी चिरागच्या मुखातून वदवून घेतली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासोबतच्या चर्चेत पासवान यांनी जाणीवपूर्वक स्वत: दुय्यम भूमिका घेत चिरागलाच आघाडीवर ठेवले होते.
 
2019 मध्ये भाजपा सत्तेवर येणार आणि नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार, याची पासवान यांना पूर्ण खात्री आहे, त्यामुळेच त्यांनी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 मध्ये मोदी यांच्या मंत्रिमंडळात लोजपातर्फे रामविलास पासवान नाही तर चिराग पासवान मंत्री बनणार, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज नाही. त्यासाठीच पासवान यांनी लोकसभा निवडणूक न लढवता राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पासवान यांची लोजपाला राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष बनवायची इच्छा आहे. सध्या पासवान यांचा पक्ष बिहारपुरताच मर्यादित आहे. राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष करण्यासाठी एकापेक्षा जास्त राज्यात पक्षाने निवडणूक लढवणे आणि विशिष्ट प्रमाणात मते मिळवणे आवश्यक असते. त्यामुळेच पासवान यांची यावेळी उत्तरप्रदेशात निवडणूक लढवण्याची इच्छा होती. त्यांनी भाजपाकडे बिहारसोबतच उत्तरप्रदेशातही आपल्या पक्षाला एकदोन जागा द्याव्या, अशी विनंती केली होती, पण भाजपाने पासवान यांच्या अन्य मागण्या मंजूर करताना ही मागणी मात्र उत्तरप्रदेशातील राजकीय समीकरणांमुळे फेटाळून लावली.
पासवान 1977 मध्ये बिहारच्या हाजीपूर मतदारसंघातून सर्वप्रथम लोकसभेवर विजयी झाले. त्यावेळी त्यांनी विक्रमी मतांनी निवडणूक जिंकत इतिहास घडवला होता. तेव्हापासून त्यांनी 1980, 1984, 1989, 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये हाजीपूर मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले. 2009 मध्ये मात्र हाजीपूर मतदारसंघात त्यांचा पराभव झाला. 2010 मध्ये ते राज्यसभेत आले. मात्र, राज्यसभेचे खासदार असतानाच त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. आता 2019 मध्ये पुन्हा त्यांना राज्यसभेचे वेध लागले आहेत. पासवान यांना स्वबळावर राज्यसभेत पाठवण्याची त्यांच्या पक्षाची ताकद नाही, त्यामुळे त्यांना भाजपाच्या मदतीची आवश्यकता आहे.
 
 
 
 
1975 मध्ये आणिबाणीला विरोध केल्यामुळे रामविलास पासवान यांना तुरुंगवासही भोगावा लागला. आणिबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता पक्षात पासवान होते. बिहारच्या राजकारणात रामविलास पासवान हे राजनारायण, कर्पुरी ठाकूर, सत्येंद्रनारायण सिन्हा आणि जयप्रकाश नारायण यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जात. 2000 मध्ये पासवान यांनी जनता दलातून बाहेर पडत लोकजनशक्ती पक्षाची स्थापना केली. पासवान यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी विश्वनाथ प्रतापिंसह, एच. डी. देवेगौडा, अटलबिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहनिंसग आणि नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम केले. संयुक्त आघाडी, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त पुरोगामी आघाडी अशा तीन आघाड्यांमध्ये काम करणार्या रामविलास पासवान यांनी 2009 मध्ये लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी करत चौथ्या आघाडीची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. नंतर या आघाडीत मुलायमिंसह यादव यांची समाजवादी पार्टीही सहभागी झाली. मात्र, या तथाकथित चौथ्या आघाडीचा आणि रामविलास पासवान यांचाही दारुण पराभव झाला.
हाजीपूर या पासवान यांच्या मतदारसंघात जनता दलाच्या रामसुंदरदास यांनी पासवान यांचा पराभव केला. लोजपाचा एकही खासदार या निवडणुकीत विजयी होऊ शकला नाही. जवळपास 50 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनात पासवान यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदार्या पार पाडल्या. राजकारणातील अनेक चढ-उतार अनुभवले.
आता पासवान यांना आपल्या मुलाला राजकारणात प्रस्थापित करण्याची चिंता भेडसावत आहे, त्यातूनच त्यांच्या सगळ्या राजकीय चाली सुरू झाल्या आहेत. भाजपालाही सध्याच्या राजकीय परिस्थितीत रामविलास पासवान यांच्यासारख्या दलित नेत्याची गरज आहे. त्यामुळेच पासवान यांच्या सगळ्या मागण्या भाजपाने मान्य केल्या आहेत.
 
 
श्यामकांत जहागीरदार
9881717817
@@AUTHORINFO_V1@@