तीन मंदिरे द्या; अन्यथा ४० हजार मंदिरे घेऊ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018
Total Views |

 

 

 

हिंदू नववर्ष समिती आयोजित मंथन कार्यक्रम


मुंबई : “अयोध्या ही प्रभू श्रीरामाची जन्मभूमी आहे. आमचे आंदोलन हे काही फक्त श्रीराम मंदिरासाठी नाही तर श्रीरामजन्मभूमी मंदिरासाठी आहे व आम्ही तिथे मंदिर उभारूच. मुस्लीम आक्रमकांनी इथल्या ४० हजार मंदिरांचा विध्वंस केला. आम्ही त्यातली फक्त अयोध्या, काशी व मथुरा ही आमची तीर्थस्थळे परत मागत आहोत. शांततेने मागत आहोत, ती तुम्ही द्या; अन्यथा आम्ही ४० हजार मंदिरे पाडून ज्या मशिदी बांधल्या त्याही परत घेऊ,” असे रोखठोक आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते खा. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केले. दादरच्या हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने रवींद्र नाट्यमंदिर येथे गुरुवारी दि. २७ डिसेंबर रोजी ‘मंथन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ‘आयडिया ऑफ इंडिया-सोशिओ इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह’ या विषयावर खा. सुब्रह्मण्यम स्वामी यांचे व्याख्यान झाले. यावेळी मंचावर हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे, उपाध्यक्ष वीरभद्र दुलाणी, कार्यवाह रमेश देवळे आणि स्वागत समिती अध्यक्ष श्रीराम दांडेकर उपस्थित होते.

 

सुब्रह्मण्यम स्वामी आपल्या भाषणात म्हणाले की, “भारताने प्राचीन काळापासून जे जे इथे आले, त्या त्या सर्वांचा आदर केला. प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतले. पण हिंदू संस्कृती हाच भारतातला मूळ प्रवाह आहे. पारशी, ज्यू समुदायांना भारतीयांनी कधीही त्रास दिला नाही. मुस्लीमही या देशात आले व इथेच राहिले. आम्ही मुळातच उपासनेच्या निरनिराळ्या पद्धतींना मान्यता देणारे लोक आहोत. त्यामुळे डाव्यांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये.” इतिहासाबाबत स्वामी म्हणाले की, “भारताचा इतिहास पराक्रमाचा, शौर्याचा, वीरांचा आहे. ज्यांनी कुणी भारतावर आक्रमण केले, त्यांना इथल्या भूमीपुत्रांनी तोडीसतोड उत्तर दिले. भारतभूच्याच मातीत गुरू गोविंद सिंह, छत्रपती शिवाजी महाराज जन्मले व त्यांनी मोगल सत्तेला आव्हान दिले. भारताचा हा जाज्ज्वल्य इतिहास मात्र आम्हाला नीट शिकवला जात नाही, कारण इतिहासाचे लेखनच परकीयांनी केले आहे. पण आता आपल्याला इतिहासाचे पुनर्लेखन करावे लागेल आणि खरा इतिहास लोकांसमोर घेऊन जावा लागेल.” आर्य व द्रविड वादावर स्वामी म्हणाले की, “ब्रिटिशांनी भारतीयांमध्ये फूट पाडण्यासाठी ही संकल्पना मांडली. पण या संकल्पनेला कोणताही आधार नाही. तरीही इथले लोक तिला उचलून धरतात. मात्र भारतीयांच्या डीएनए टेस्टनुसार आपण सर्व एकच असल्याचे पूर्वीच सिद्ध झाले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि जामनगर ते दिब्रूगड भारत एकच आहे.” राज्यघटनेबद्दल बोलत सुब्रह्मण्यम स्वामींनी पंडित नेहरूंवर टीका केली. राज्यघटनेच्या निर्मितीत डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेच योगदान होते, नेहरू त्यात कुठेही नव्हते. नेहरूंनी एकच काम केले ते म्हणजे शेख अब्दुल्लांच्या सांगण्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध असतानाही राज्यघटनेत ३७० वे कलम घुसडले. एवढेच काय ते नेहरूंचे राज्यघटनेतले योगदान आहे. पण लवकरच कलम ३७० हेदेखील रद्द केले जाईल,” असेही ते म्हणाले.

 

संस्कृत भाषेच्या संवर्धन व विकासावरही स्वामींनी आपली भूमिका मांडली. “नासाने केलेल्या संशोधनानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी संस्कृत भाषा सर्वोत्तम आहे. भारतात गेल्या काही वर्षांत संस्कृत जरी मृतप्राय झाल्याचे म्हटले जात असले तरी आता मात्र संस्कृत संवर्धनाचे काम जोरात सुरू आहे. आगामी काळात संस्कृत भाषा जनसामान्यांच्या व्यवहारातही यायला हवी,” अशी इच्छाही त्यांनी बोलून दाखवली. अयोध्येतील श्रीराम मंदिराबाबत खा. सुब्रह्मण्यम स्वामी म्हणाले की, “सध्या अयोध्येतील मंदिराचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर लवकर निर्णय घेतला जावा, अशी अपेक्षा संत समाजाकडून व्यक्त केली जाते. पण १९९४ साली पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारने अयोध्येत मंदिराचे पुरावे मिळाले तर त्या जागेचे अधिग्रहण करून मंदिराचे काम सुरू केले जाईल, असे कबूल केले होते. जर न्यायालयीन निकाल आला नाही तर आताच्या सरकारनेही ही जागा अधिग्रहित करून मंदिर बांधायला हवे. हा प्रश्न याच मार्गाने सुटेल, कारण सरकार देशातली कुठलीही जमीन कधीही अधिग्रहित करू शकते.” मशीद हा इस्लामचा अविभाज्य घटक नाही, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत स्वामी म्हणाले की, “जगातल्या कितीतरी इस्लामी देशांत मशिदींचे स्थानांतरण केले जाते. अयोध्येतही तसे होऊ शकते. मुस्लीम आक्रमकांनी हिंदूंची ४० हजार मंदिरे तोडल्याचा, त्यांचा विध्वंस केल्याचा पुरावा उपलब्ध आहे. आम्ही त्यातली फक्त अयोध्या, काशी आणि मथुरा हीच स्थाने परत मागत आहोत. ती शांततेने आमच्याकडे सोपवावी. तीन मंदिरे देणार असाल तर; अन्यथा आम्ही ४० हजार मंदिरे घेऊ. तुम्हाला कोणता सौदा मंजूर आहे?,” अशा शब्दांत डॉ. स्वामी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्यांना सुनावले.

 

देशाच्या आर्थिक परिस्थितीबाबत स्वामी म्हणाले की, “भारताने स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेले सोव्हियत मॉडेल बिनकामाचे होते. परिणामी भारताचा विकास मंदावला. शेती नेहमीच तोट्यात राहिली. आपल्याला आपल्या पद्धतीनुसार नवे आर्थिक मॉडेल विकसित करावे लागेल. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करून शेतीचे उत्पादन वाढवले पाहिजे. दुग्धोत्पादनासाठी देशी गायीच्या वाढीला व पालनाला प्रोत्साहन दिले पाहिजे. तर शेती व शेतकऱ्यांबरोबरच अर्थव्यवस्थाही सुधारेल. सोबतच प्राप्तीकर रद्द केला जावा,” अशी भूमिकाही डॉ. स्वामी यांनी मांडली. “प्राप्तिकर रद्द केल्यास लोक बँकेत पैसे ठेवतील तसेच गुंतवणुकीला चालना मिळेल व त्यातून अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहील,” असे मतही त्यांनी मांडले. “कोळसा खाणींचे पूर्ण क्षमतेने उत्खनन केले पाहिजे,” असेही ते म्हणाले. दरम्यान, हिंदू नववर्ष स्वागत समितीचे कार्याध्यक्ष भूषण मर्दे यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली. तसेच सकारात्मक गोष्टींवर सकारात्मक चर्चेसाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

 

स्वत:मधल्या सिंहाला जागे करा

 

“हिंदू लोक प्रथमपासूनच शूरवीर आहेत. पण परकीय व ब्रिटिशांमुळे इथे पराभूत भावना बळावली, पण कोणी आक्रमण केले की १०० शेळ्यांच्या कळपाचा उपयोग नसतो तर एकटा सिंहच कोणतेही आव्हान पार पाडू शकतो. हिंदूंनी स्वत:मधल्या सिंहाला जागे केले पाहिजे. तरच जग तुम्हाला ओळखेल,” असे खणखणीत मत सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मांडले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@