तोडकीमोडकी युतीसम्राट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2018   
Total Views |



 
 
 
 
कोणी निवडणूक लढण्यासाठी जागा देतं का जागा?’ न जाणो, कित्येक वेळा लढून लढून या हरणाऱ्या पण जिंकण्यासाठी सारं काही धाब्यावर बसविणाऱ्या, सत्तेसाठी हपापलेल्या स्वयंघोषित नेत्याला आणि त्याच्या गल्लीबोळापुरत्या विस्तारलेल्या राजकीय पक्षाला कुणी निवडणूक लढण्यासाठी जागा देत का जागा? इति तोडकेमोडके युती सम्राट! आता तोडकेमोडके युतीसम्राट म्हणजे कोण, हे विचारायची गरजच पडणार नाही. कारण, याच्या दारात का त्याच्या दारात पडावे, अशा संभ्रमात काँग्रेसी गवतासारखे काही सतत नामुष्की पत्करणारे राजकारणी आहेत. ते आतापासून प्रस्थापित राजकीय पक्षाकडे आशाळभूतपणे पाहत बसलेले आहेत. त्यांचे एकच लक्ष्य, ते म्हणजे आपली गरज असलेल्या त्यातल्या त्यात प्रस्थापित पक्षाची मर्जी संपादित करायची. ती मिळवून आपल्या छोट्या बारकुंड्या पक्षाला निवडणुकीत जागा मिळवायच्या. त्या पक्षाच्या बळावर आपल्या पक्षाचा उमेदवार आला तर आला निवडून. गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही, तर मोडून खावी इतकं सोपं. हरलो तर प्रस्थापित पक्षावर खापर फोडायचे. जिंकलो तर आपल्या उमेदवाराचा घोडेबाजार करायचा. किती छान. तर असे हे तोडकेमोडके युतीसम्राट. कोणतीही नीतीमत्ता नाही. कोणतीही ध्येये नाहीत. केवळ आणि केवळ स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी आणि राजकीय महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी चाललेला हा युती करण्याचा खेळखंडोबा. अर्थात, सध्याचे राजकीय वातावरण पाहता समानधर्मी विचार करणाऱ्यांनी युती करावी, हे चांगलेच आहे. पण तरीही प्रश्न पडतोच की, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, खा. राजू शेट्टी आणि आ. कपिल पाटील या तिघा नेत्यांना समानधर्मी असणारा विचार कोणता असेल? कोणते असे राष्ट्रीय किंवा सामाजिक कल्याणकारी ध्येय आहे, जे यांना ‘युती’ करण्यासाठी प्रेरित करते? तसेच भाजप आणि काँग्रेसला पर्याय म्हणून जी कोणती महाआघाडीबिघाडी बनत आहे, त्या महाआघाडीमधल्या राजकीय पक्षांची कोणती राष्ट्रीय सामाजिक भूमिका समान आहे? ‘ढूँढते रह जाओगे’ हेच याचे उत्तर असेल. कारण, प्रत्येक तोडक्यामोडक्या युतीसम्राटांना मुंगेरी लाल सारखे हसीन सपने पडत असतात की, ते काहीतरी करून पंतप्रधान बनणार, गेला बाजार मुख्यमंत्री तरी होतील. काय होणार या तोडक्यामोडक्या युतीसम्राटांचे?
 

तू नही तो और सही

 

महाआघाडीचे चऱ्हाट सुरू झाले आहे. कोणत्या पक्षाला किती जागा देणार वगैरे वगैरे चर्चा सुरू आहेत. काही पडद्यावर तर काही पडद्याआड तर काही गुलदस्त्यात. मात्र, या महाआघाडीमध्ये मोठ्या उमेदवारीने की मिनतवारीने सहभागी होण्यासाठी पुढे सरसावलेल्या छोट्या-मोठ्या राजकीय नेत्यांना आतापासून काय करू नि काय नको, असे झाले आहे. अर्थात, महाआघाडी बनणार ती भाजपला रोखण्यासाठीच म्हणा. महाराष्ट्रामध्ये महाआघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनता दल आणि कम्युनिस्ट पक्ष यांनीही गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. या सर्व पक्षांचे वैचारिक साम्य आणि प्रत्यक्ष कृतीशिलता काय आहे? सतत समाजात, देशात या न त्या कारणाने अस्थिरता पसरवायची, अमुक करा नाही तर हिंसक आंदोलन करून लोकांना जगणे मुश्किल करतो वगैरे ही काम करणे म्हणजे देशसेवा करणे, असे मानणारे जर राजकीय पक्ष असतील, तर त्यांच्या युतीचे काय होणार? कशासाठी... पोटासाठी? हे सर्वसामान्य लोकांचे ध्येय असेल, पण या पक्षांचे ध्येय मात्र ‘कशासाठी... स्वार्थासाठी’ हेच असते. त्यांच्या एकत्र येण्याने लोकांना काय मिळणार आहे? अर्थात जनतेचा विचार करायला राजकीय पक्ष बांधिल आहेत की नाही, हासुद्धा आता मोठा ‘ईद का चाँद’ मुद्दा झाला आहे. त्यामुळे या पक्षांना तुमचे समाजकारण, देशकारण सांगा असे विचारत बसण्यात अर्थ नाही. असो, हे सर्व छोटेमोठे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत आणि त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडणुकीतील तिकिटांच्या जागावाटपाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा, असे बजावले आहे. कारण, म्हणे तीन राज्यांत सत्ता आल्याने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने बाकीच्या छोट्या- मोठ्या पक्षांना देशी जेवणासारखं तोंडी लावणं किंवा विदेशी जेवणातल्या सुरुवातीच्या स्टार्टर मेनूसारखे चवीपुरते ठेवले आहे. राष्ट्रवादीची विश्वासार्हता तर त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार यांच्यासारखीच असल्याने, या पक्षाबाबत युतीइच्छुक छोटेमोठे पक्ष शंकाशीलच आहेत. सत्ताधारी भाजपला शह देण्यासाठी एकत्र येण्याची इच्छा असणारे हे सर्व पक्ष काही महिन्यांपूर्वी ‘तुम बिन जाऊ कहाँ’ म्हणायचे. पण, आता म्हणत आहेत, ‘तू नही तो और सही...’

 
 
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@