पालेकरबुवांचे पाल्हाळ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |



भालजींचा स्टुडिओ जाळणे हा अभिव्यक्तीवर हल्ला नव्हता, शीख किंवा काश्मिरी पंडितांवरचे हल्ले ‘मॉब लिंचिंग’ नव्हते. अभिव्यक्तीवाल्यांपैकी कुणीही यावर एक शब्दही काढलेला नाही. पालेकरांनी लगावलेले पाल्हाळ हा २०१९च्या लढाईचाच भाग आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.

 

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना नवा शोध लागला आहे. आमीर खान आणि नसिरुद्दीन शाह हे मुस्लीम असल्यानेच त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे विधान त्यांनी केले आहे. सत्तरीच्या दशकात वास्तवदर्शी नायक साकारणाऱ्या अमोल पालेकरांना त्या काळात चांगला दर्शकही होता. मात्र, अमिताभ नावाच्या ‘अँग्री यंग मॅन’चे पदार्पण झाले आणि अमोल पालेकरांच्या कारकिर्दीला उतरती कळा आली. नंतर पालेकर चर्चेत येत राहिले ते त्यांच्या अभिनयापेक्षा त्यांनी केलेल्या विधानांमुळे. मधल्या काळात त्यांनी शाहरुख खानला सोबत घेऊन सिनेमा वगैरे काढायचा प्रयत्न केला, पण तो सपशेल फसला. मग जुन्या समाजवाद्यांबरोबरचे नवनवे कार्यक्रम करण्याचा सिलसिला सुरू आहे. ‘आता उरलो चर्चासत्रांपुरता’ अशा स्थितीत असलेल्या पालेकरांनी वरील विधानामुळे चांगलीच प्रसिद्धी ओढवून घेतली आहे. पालेकरांनी अजून एक पाल्हाळ लावले आहे ते म्हणजे, देशात वाढत असलेल्या असहिष्णुतेबाबत. पुढचा काळ कठीण असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. हे सांगत असताना आपण काहीतरी फार मोठे गुपित उघडत असल्याचाही आव त्यांनी आणला.

 

वस्तुत: पालेकरांना जे वाटते, ते नवीन नाही. मात्र, त्यांना जे वाटते त्यात त्यांनी पाडलेली भर लोकांसमोर मांडली आहे. नसिरुद्दीन शाहचा विषय निघाला असल्याने त्यांनी हे निमित्त साधले. या सगळ्या मंडळींचे आता दांभिक मठ तयार झाले असून त्यांचे घाऊक बुवावाजीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. बरं, या ढोंग्यांना अनुयायीही आहेत. कला क्षेत्रातले त्यांचे कर्तृत्व बेतास बेत असेल. मात्र, माध्यमातले त्यांचे सहअनुयायी त्यांचे आवाज बुलंद करण्याचे काम करीत राहतात. मग अशा फुटकळ विधानांनाही प्रसिद्धी मिळत राहाते. अमोल पालेकर यांच्या विधानांना महत्त्व नाही, पण देशभरात एकाच वेळी एकाच सुरात निरनिराळ्या भाषांत जे सुरू झाले आहे, त्याचा विचार करावा असेच आहे. ‘आर्टिस्ट युनाईट’ नावाने देशात असहिष्णुतेचे वातावरण असल्याचा दावा करीत देशभरात एकत्र येण्याचे ठरविले आहे. दिल्लीतून या कार्यक्रमाची सुरुवात होईल आणि देशातील प्रमुख महानगरांत हे कार्यक्रम होतील. आता मुद्दा असा की, नेमका असहिष्णूता सांगण्याचा हा मुहूर्तच का सापडला आहे? यातून काय साध्य होणार आहे आणि नसिरुद्दीन ते पालेकर हे सगळे एकामागोमाग एक का बोलत आहेत? उत्तर सोपे आहे. २०१९च्या निवडणुकीचे बिगूल तीन राज्यांच्या निवडणुकांमुळे वाजलेच आहे. काँग्रेसच्या गोटात आशांचे पीक आले आहे, तसेच काँग्रेसची ‘बी टीम’ असलेल्या कलावंतांच्या कळपातही उधाण आले आहे.

 

कलाकारांची अभिव्यक्ती व तिचे स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार कलाकारांना आहेच. न्याय व शासन व्यवस्थेने प्रसंगी दोन पावले पुढे टाकून या कलाकारांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. कलाकार कुठल्याही स्तरातला असो, मात्र त्याच्या अभिव्यक्तीचे रक्षण झालेच पाहिजे. २०१४ आणि त्याच्या आधी २००० सालापासून अशाच प्रकारच्या अभिव्यक्तीला उधाण आले होते. मोदी आणि हिंदुत्वाच्या द्वेषाने पछाडलेल्या कलाकारांचे असेच तांडेच्या तांडे घुमायला लागले होते. लोकशाही व्यवस्थेत ‘कोणाच्याही बाजूने नाही,’ असे सांगणारा एक मोठा गट आहे. हा सगळ्यात गंभीर विषय, कारण ही मंडळी खोटे बोलून द्वेष पसरविण्याचे काम करीत असतात. तोंडाने द्वेषाच्या बाबतीत जे काही सुरू आहे ते सांगतील. मात्र, स्वत:चे यांचे आचरणही असेच असते. बाजू असतेच आणि ती नरेंद्र मोदी, संघ सहयोगी संघटना याच्याविरोधात असली तरीही काही विशेष फरक पडत नाही. मुद्दा असा की, मग आपण निष्पक्ष असल्याचा आव का आणावा? कलाकाराच्या बुरख्याआड दडून काँग्रेसला साजेसे वातावरण निर्माण करण्याच्या वातावरणाला हातभार का लावावा? सरळ पक्षाचे सदस्यत्व का घेऊ नये? केतकरही अशाच निष्पक्षवाल्यांचे मेरूमणी होते. गुरे कितीही उनाडली तरी संध्याकाळी आपल्या गोठ्यातच परत येतात, तसेच केतकरही आपल्या उतारवयात काँग्रेसवासी झालेच. त्यांना राज्यसभेचे तिकीटही मिळून गेले. ‘आर्टिस्ट युनाईट’चा प्रसार करणाऱ्यांची नावेच अशी आहेत जे ‘कार्डहोल्डर’ असावे. आधी म्हटल्याप्रमाणे कलाकारांच्या अभिव्यक्तीला कुठलाही अडसर आणू नये, मात्र ‘सिलेक्टिव’ अभिव्यक्तीचे काय? भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपटसृष्टीतले सर्वात मोठे योगदानकर्ते म्हणूनही त्यांचे नाणे खणखणीतच होते. छत्रपतींवरच्या त्यांच्या सिनेमातले भाग आजही युट्युबसारख्या माध्यमात हक्काचे स्थान मिळवितात. याच भालजींच्या कोल्हापुरातील स्टुडियोला आग लावण्यात आली होती. यासाठी ते संघाचे आहेत, एवढेच कारण पुरेसे होते. पालेकर वगैरे मंडळी याविषयी एकही शब्द बोलत नाहीत.

 

‘अर्बन नक्षलवाद’ समजून घ्यायचा प्रयत्न करतोय, असे पालेकर म्हणतात. आपल्याच कंपूतला कुणीही पालेकरांनी उलटसुलट करून पाहावा लगेच ‘अर्बन नक्षलवाद’ म्हणजे काय ते त्यांना कळेल. कोबाड किंवा अनुराधा गांधी यापैकी कुठलेही प्रकरण पालेकरांनी नीट न्याहाळून पाहावे. गुगलवर त्यांचे फोटो पाहावे. विवेक शाबूत असेल तर लगेच कळेल. ‘मॉब लिंचिंग’वरही मंडळी बोलतात. न्यायालय सज्जन कुमारना शिक्षा देते. मात्र, यांच्या कंपूतले कुणीही काहीही बोलत नाही. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर झालेल्या हत्या ‘मॉब लिंचिंग’ नव्हत्या? शिखांचे शिरकाण हे काय होते? इथे न्यायालय निकाल देते, त्यावर नसिरुद्दीन शाह काहीच बोलत नाही. उच्चार सुधारायला तो आपल्या मुलाला कुराण वाचायला देतो. मात्र, तो सेक्युलरही असतो. भारत वगळता असला दांभिकपणा जगात अन्य कुठेही नसावा आणि त्यात अशा प्रकारचे कलाकार सहभागीही होत नसावे. काश्मिरी पंडितांचे गाडीतून हाकलवून देणे, बांगलादेशी घुसखोरांनी आसामी माणसाचा रोजगार हिरावणे, मतपेढ्यांसाठी त्यांना बांगलादेशातून आणून इथे बसविणे या सगळ्या घटना कुठल्याही कलाकारांच्या संवेदनशील मनाला हळव्या करतील अशाच आहेत. मात्र, एकदा आपले लागेबांधे पक्के झाले की, कलाकाराच्या बुरख्याआडून अप्रत्यक्ष प्रचार करणे सोपेच असते. उद्या आपले लाडके सरकार आले की, पुन्हा ‘पद्मश्रीं’चा रतीब सुरू होईलच.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@