अंध मुलीने छेड काढण्याऱ्याला शिकवला चांगलाच धडा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |

 

 
 
 
 
मुंबई : १७ डिसेंबर २०१८ रोजी दादरमधील जीआरपी पोलीसांनी एका अंध मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाला अटक केली. त्या अंध मुलीने दाखवलेल्या धाडसामुळेच या आरोपीला अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. उझमा अन्सारी असे या मुलीचे नाव असून ती १५ वर्षांची आहे.
 

त्या रात्री साडेआठ वाजता उझमा आणि तिचे वडील दादरहून कल्याणला ट्रेनने जात होते. अपंगांसाठी असलेल्या राखीव डब्यातून ते प्रवास करत होते. या प्रवासा दरम्यान एका तरुणाने उझमाला वाईट हेतूने स्पर्श करण्यास सुरुवात केली. याबद्दल लगेच आवाज उठवत तिने आपल्या वडिलांना आणि डब्यातील इतर प्रवाश्यांना सांगितले. अशाप्रसंगी उझमा अजिबात घाबरली नाही, उलट तिने त्या तरुणाचा हात जोरात मुरगळला. उझमाने घेतलेले कराटेचे प्रशिक्षण आणि स्वसंरक्षणाचे धडे यावेळी तिच्या उपयोगी आले.

 

तो तरुण उझमापेक्षा उंचीने मोठा असूनही तिने त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. त्याला पळू दिले नाही. माटुंगा स्थानक येईपर्यंत तिने त्याला रोखून ठेवले. त्यानंतर त्या तरुणाला पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीचे नाव विशाल सिंह असून तो २४ वर्षांचा आहे. विशाल सिंह विनातिकीट अपंगांच्या डब्यातून प्रवास करत असल्यामुळे त्याप्रकरणीही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. विशाल सिंह याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीसांनी उझमाच्या धाडसाचे कौतुक केले. उझमा कराटेमध्ये इतकी उत्तमरित्या प्रशिक्षित आहे की तिने विशालचा हात मोडला असता. अशी माहिती पोलीसांनी दिली.

 


 
 
 
उझमा अन्सारी ही दादर येथील कमला मेहता या अंध शाळेची विद्यार्थिनी आहे. उझमाने दाखवलेल्या या धाडसाबद्दल कमला मेहता अंध शाळेत काल दिनांक २६ डिसेंबर रोजी तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभाच्या या कार्यक्रमाला पोलीस अधिकारीदेखील उपस्थित होते. पोलीसांनी उझमाच्या साहसाचे कौतुक करत तिला बक्षीस दिले.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/


 
 
@@AUTHORINFO_V1@@