चिन्यांचे ‘स्मार्ट युनिफॉर्म्स’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018   
Total Views |



नुकतेच आपल्याकडे केंद्र सरकारने दहा सरकारी यंत्रणांच्या नावासह एक परिपत्रक जारी केले. त्यामध्ये या दहा संस्थांना देशविरोधी, आक्षेपार्ह मजकूर आढळल्यास संबंधित संगणक, लॅपटॉपवर, त्याच्या वापरकर्त्यावर कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले. खरंतर हा मोदी सरकारने बनवलेला कुठलाही नवीन नियम नव्हताच, तरीही मोदी सरकार पाच राज्यांतील निवडणुकीतील पराभवामुळे घाबरून आता घराघरात काय राजकीय चर्चा सुरू आहेत, त्याचा कानोसा घेण्यासाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. हे सगळे आरोप तथ्यहीन असल्याचे नंतर जेटलींनीही संसदेत स्पष्ट केले. पण, चेवात असलेल्या विरोधकांचे काही समाधान झाले नाही. भारतात अशी सूक्ष्म नजर ठेवण्याचा उपयोग केवळ राष्ट्रविरोधी घटकांविरोधात केला जात असला, तरी शेजारी चीनमध्ये आता विद्यार्थ्यांवरही नजर ठेवण्यासाठी एक ‘स्मार्ट युनिफॉर्म’ तयार करण्यात आला आहे.

 

‘इपोक टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील गुईझोऊ आणि गुआंक्झी प्रांतातील १० शाळांमध्ये हे ‘स्मार्ट युनिफॉर्म’ दाखल झाले आहेत. या गणवेशाचे वैशिष्ट्य म्हणजे, या प्रत्येक युनिफॉर्ममध्ये एक चीप बसविण्यात आली आहे. त्या चीपमध्ये विद्यार्थ्याची सर्व प्राथमिक माहिती, त्याचा चेहरा, हाताचे ठसे इत्यादी बारकावे समाविष्ट करण्यात आले आहेत. या ‘स्मार्ट’ गणवेशामुळे चिनी पालकांना त्यांचे पाल्य शाळेतून निघाल्यापासून ते परत शाळेतून घरी परतेपर्यंत त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचाली अगदी घरबसल्या एका अॅपच्या मदतीने टिपता येणार आहेत. जर विद्यार्थ्याने शाळेच्या व्यतिरिक्त इतरत्र जाऊन शाळा बुडविण्याचा प्रयत्न केला, तरी या चीपमधून त्याची सूचना पालकांना, शिक्षकांना दिली जाईल. यावर मुलं ती मुलंच, काहीतरी पळवाटा शोधून काढतील, असा आपण विचार करू. पण, नाही; चिन्यांनी विद्यार्थ्यांच्या पळवाटांचाही आधीच विचार करून सगळे मार्ग जणू बंदच केले आहेत. म्हणजे, विद्यार्थी जर गणवेश बदलायचा प्रयत्न करेल, चीपशी कुठल्याही प्रकारची छेडछाड करेल, तरी त्याचे स्पष्ट संकेत पालकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचतीलच. एवढेच नाही, तर ही चीप गणवेश धुण्यापूर्वी त्यातून वेगळी काढून ठेवण्याचीही गरज नाही. का, तर म्हणे ही चीप तब्बल पाचशेवेळा वॉशिंग मशीनमधून अगदी सहजा धुता येईल आणि १५० डिग्री से. इतके तापमानही ही चीप सहन करू शकते. म्हणजेच, गणवेश धुतल्याने, त्यावर इस्त्री फिरवल्याने, घडी केल्याने त्याला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, हे निश्चित. थोडक्यात, अगदी सहजपणे वर्षभर, त्याहीपेक्षा जास्त काळाकरिता हा ‘स्मार्ट युनिफॉर्म’ विद्यार्थ्यांना बिनदिक्कत परिधान करता येईल. त्याचबरोबर शाळेच्या प्रवेशद्वाराशी असलेल्या सिस्टिमवर चीपमधील विद्यार्थ्यांचा संग्रहित चेहरा आणि प्रत्यक्ष शाळेत प्रवेश करणारा विद्यार्थ्याचा चेहरा याचीही तपासणी केली जाईल. म्हणजे गणवेशाची मुद्दाम अदलाबदली करण्यासारख्या प्रकारांनाही आळा बसू शकेल. एवढेच काय, विद्यार्थ्याला शाळेत डुलकी जरी लागली तरी त्याची सूचना हा ‘स्मार्ट युनिफॉर्म’ देईल. शिवाय, शाळेमध्ये कुठलीही कॅशलेस खरेदीही विद्यार्थ्याला या ‘स्मार्ट युनिफॉर्म’च्या माध्यमातून अगदी सहजपणे करता येईल. आहे की नाही, कमाल?

 

शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ‘स्मार्ट युनिफॉर्म’मुळे विद्यार्थ्यांच्या हजेरीमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. शिवाय, नोकरदार पालकवर्गालाही त्यांच्या पाल्यावर नजर ठेवणे अधिक सोयीस्कर ठरतेय. पण, चीनमधील सोशल मीडियावर मात्र सरकारचा हा प्रयोग म्हणजे मानवाधिकाराचे हनन असल्याचा प्रचारही सुरू झाला. पण, त्यामुळे चिनी सरकारच्या धोरणात फरक पडेल, याची सुतराम शक्यताच नाही. असा प्रयोग भारतीय शाळांमध्ये करण्याचा साधा विचारही जर कुणी मांडला तरी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणे वगैरे, अशा ‘स्मार्ट युनिफॉर्म’ची मुळात गरजच काय वगैरे प्रश्नांचा भडिमार केला जाईल. खरं तर आपले पाल्य आपल्या डोळ्यासमोर नसताना नेमके काय करते, कुठे जाते, कोणाशी बोलते, काय खाते यांचीच बहुतांश पालकांना माहिती नसते. म्हणूनच, हे असले प्रयोग करण्याची वेळ ओढवू शकते. पण, जर पालकांनी आपल्या पाल्याशी मित्रत्वाचे नाते निर्माण केले, त्यांच्याशी दररोज सुसंवाद साधला, त्यांची, त्यांच्या शाळेची, अभ्यासाची विचारपूस केली, तर कदाचित अशी वेळ पालकांवर निश्चितच ओढवणार नाही, हेही तितकंच खरं...

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

@@AUTHORINFO_V1@@