उत्तम गुण लक्षणे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |



आत्मज्ञान मिळवावे असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी स्वार्थबुद्धी असल्यामुळे दान, धर्म, सदाचरण, भक्ती, सद्गुण, परोपकार, नम्रता यांचे महत्त्व प्रापंचिकाला समजत नाही. त्यातील आनंद त्याला घेता येत नाही.


दासबोधाच्या पहिल्या दशकाच्या अखेरीस समर्थांनी सांगितले आहे की, चांगला मानवी देह मिळूनसुद्धा जर परमार्थबुद्धीचा विसर पडला, तर त्या त्या माणसाला मूर्ख, भ्रमिष्ट असेच म्हणावे लागेल. चांगला धडधाकट देह मिळाला, तर त्याचा उपयोग परमार्थाकरिता अवश्य केला पाहिजे, तरच त्या देहाचे सार्थक होईल. कारण, देहाचा भरवसा कोणी द्यावा. तो मृत्यूपंथाने जाणार आहे. त्या अगोदर परमार्थ साधावा, असे समर्थ सुचवतात. पारमार्थिक आचरणामध्ये सुख आहे, पण ते स्वार्थी प्रापंचिकाला कळत नाही. प्रापंचिक माणूस माझे माझे करतो आणि परमार्थाला विसरतो. असे जे प्रापंचिक जन आहेत, त्यांना आत्मज्ञानाचा गंध नसतो. आत्मज्ञान मिळवावे असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या ठिकाणी स्वार्थबुद्धी असल्यामुळे दान, धर्म, सदाचरण, भक्ती, सद्गुण, परोपकार, नम्रता यांचे महत्त्व प्रापंचिकाला समजत नाही. त्यातील आनंद त्याला घेता येत नाही. अशा निव्वळ प्रपंचात राहणार्‍यांना समर्थांनी ‘मूर्ख’ म्हटले आहे. या मूर्खाची लक्षणे विस्ताराने सांगताना समर्थ श्रोत्यांना जाणीव करून देतात की, ही लक्षणे टाकून देण्यासाठी सांगितली आहेत. (त्यागार्थ बोलिले ।) रोज वावरताना आपल्याला अनेक प्रकारची मूर्ख माणसे भेटतात. त्यांचा मूर्खपणा इतरांना सांगताना आपल्या मनात दोन हेतू असतात. एक म्हणजे त्या मूर्खाची टिंगलटवाळी करणे आणि दुसरा म्हणजे, मी त्यांच्यापेक्षा कसा शहाणा आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करणे. समर्थांनी मात्र ही ‘मूर्ख लक्षणे’ सांगताना त्या मूर्खांना हिणवलेले नाही, त्यांची टिंगलटवाळी किंवा हसे केलेले नाही. श्रोत्यांनी मूर्खपणा टाकून द्यावा आणि व्यावहारिक शहाणपण शिकावे, असा समर्थांचा विधायक हेतू आहे यात शंका नाही. आपण काही वेळा रागात एखाद्याला ‘शतमूर्ख आहेस’ असे म्हणतो. याचा अर्थ पूर्वी केव्हातरी मूर्खांचे शंभर नमुने अवगत असावेत. महाभारतातील उद्योगपर्वात व्यासांनी काही मूर्खलक्षणे सांगितली आहेत.

 

महाभारतातील मूर्ख लक्षणांवर मुक्तेश्वरांनी ११३ ओव्या लिहिल्याचा उल्लेख ल. रा. पांगारकरांनी त्यांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या ग्रंथात केला आहे. तथापि, समर्थांनी दासबोधात सांगितलेली मूर्ख लक्षणे स्वतंत्रपणे सांगितली आहेत. ती त्यांच्या निरीक्षणातून म्हणजे लोकस्थितीच्या अवलोकनातून आलेली आहेत. समर्थ कधीही एखादा ग्रंथ समोर ठेवून लिहीत नाहीत. त्यांना चिंतन-मननातून विचार सुचलेले असतात. ते विचार आत्मप्रचितीतून आलेले असतात. याचा उल्लेख मागील लेखात आला आहे. शहाणे असूनही जे मूर्ख त्यांना समर्थ ‘पढत मूर्ख’ म्हणतात. पढत मूर्खाला आपल्या शहाणपणाचा गर्व झाल्याने त्याच्या अंगी मूर्खपणा पुरेपूर भरलेला असतो. समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक ल. रा. पांगारकर सहज विनोदाने म्हणतात की, “ही मूर्ख लक्षणे वाचताना प्रत्येक वाचकाला वाटते की, माझे चरित्र इतक्या बारकाईने समर्थांना कोणी जाऊन सांगितले?” ही मूर्ख लक्षणे लिहून झाल्यावर समर्थांना क्षणभर वाटले असेल की, कदाचित यांचा उपयोग लोक टिंगळटवाळी, निंदानालस्ती करण्याकरता करतील. म्हणून समर्थांनी लगेच पुढच्या समासात ‘उत्तम गुण’ सांगायला सुरुवात केली असावी. श्रोत्यांनी जर मूर्ख लक्षणे टाकून दिली आणि उत्तम गुण आत्मसात केले, तर ते सर्वज्ञ होतील असे समर्थांनी म्हटले आहे.

 

आता सांगतो उत्तम गुण ।

जेणे करिता बाणे खूण ।

सर्वज्ञपणाची ॥

 

या संपूर्ण समासात व्यावहारिकदृष्ट्या सर्वज्ञानी होण्यासाठी काय करू नये, म्हणजेच कोणत्या गोष्टी टाकाव्यात, याची सविस्तर यादी समर्थांनी दिली आहे. त्यात समर्थांचे विविध क्षेत्रातील ज्ञान तर आहेच, पण लोकस्थितीच्या अवलोकनातून आत्मसात केलेल्या अनुभवाचे चित्रणही आहे. त्यातील काही लक्षणांवर पुढे चर्चा केली आहे.

 

स्वामी सांगतात, वाट विचारल्याशिवाय प्रवासाला जाऊ नये. त्याकाळी आताप्रमाणे रस्त्यांचे नकाशे किंवा गुगल मॅप्स नव्हते अथवा जागतिक स्थान शोधकपद्धत (G.P.S.) अस्तित्वात नव्हती. वाट चुकली, तर भरकटण्याची शक्यता होती. वेळेचा अपव्यय व मनस्ताप टाळायचा, तर वाट नीट विचारून प्रवासाला निघणे योग्य होते. माहीत नसलेले फळ खाऊ नये, आकर्षक दिसणारे पण माहीत नसलेले फळ विषारीही असू शकते. त्याकाळी विषबाधेतून वाचवू शकतील अशा सोयी नव्हत्या. अतिवाद करू नये. वादाने काहीही साध्य होत नाही. उलट अतिवादाने माणसे दुरावतात. नात्याच्या माणसात किंवा समाजात वावरताना मनात कपट असू नये. पापद्रव्य घेऊ नये. आजच्या भ्रष्टाचाराच्या व लाचखोरीच्या युगात या उपदेशाची आवश्यकता आहे. पापद्रव्याने आपली मन:शांती बिघडते, पैसे देणार्‍याचे तळतळाट लागतात. आपल्याला मन:शांती हवी असेल, तर पुण्यमार्ग सोडू नये. कोणाचीही निंदा, द्वेष करू नये. कारण, नंतर त्याचा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो. अशा प्रकारच्या नैतिक शिकवणींचा उपदेश फार चांगल्या प्रकारे समर्थांनी या समासात केला आहे. त्यात सांगितलेल्या व्यवहारज्ञानाच्या कितीतरी गोष्टी आजही तितक्याच आचरणीय आहेत, परिणामकारक आहेत. व्यवहारज्ञानाबरोबर त्या उपदेशाने आपले व्यक्तिमत्व उंचावणार आहे. खोट्या पुरुषार्थाच्या बढाया मारण्याची अनेकांना सवय असते. अशा बढाया मारू नये. आपण एखादा पराक्रम करणार असू, तर तो पराक्रम केल्यानंतरच इतरांना सांगावा. त्या अगोदर नाही. आपण शब्द दिला, तर दिलेला शब्द पाळावा. वेळप्रसंग पडल्यावर आपल्या सामर्थ्याचा उपयोग करावा. पण, त्यासाठी वडीलमंडळींना उगीच दोषी ठरवू नये.

 

बोलिला बोल विसरो नये ।

प्रसंगी सामर्थ्य चुको नये ।

केल्यावीण निखंदू नये । पुढिलासी कदा ॥

 

आळसात सुख मानू नये. नेहमी कार्यरत असावे, प्रयत्नशील असावे. कुणाचीही चहाडी करू नये. सारख्या पैजा लावत बसू नये. (पैज होड घालू नये । काही केल्या ।) परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये. एवढेच नव्हे, तर कीर्तनकाराने हरीकथा करताना स्त्रियांचे, त्यांच्या देहाचे कौतुक करणे, त्यांचे लावण्य वर्णन करणे या गोष्टी टाळायला सांगितले आहे. आज सर्व समाजाला स्त्रियांबाबत चारित्र्यावर शिकवणीची अत्यंत गरज आहे. स्त्रियांबाबत आदर बाळगायला रामदासांनी शिकवले आहे. पुढे समर्थ सांगतात, कागदपत्राशिवाय देवघेवीचे व्यवहार करू नये. (पत्रेवीण पर्वत करू नये ।) हा उपदेश कटाक्षाने पाळला, तर नंतर होणारे फसवणुकीचे प्रकार टाळता येतील. देवघेवीचे व्यवहार करताना भावनेच्या आहारी न जाता त्यात व्यावहारिक दृष्टी ठेवणे आवश्यक असते. कोणाचे उपकार घेऊ नये. तथापि, एखाद्या प्रसंगी दुसर्‍याचे उपकार घेण्याची वेळ आली, आपला नाईलाज झाला, तर त्या उपकाराची परतफेड करावी. म्हणजे आपला स्वाभिमान कायम राहतो आणि आपल्या ठिकाणी मिंधेपणा येत नाही. आपली विचारसरणी नेहमी स्वतंत्र असावी. वैचारिकदृष्ट्या केव्हाही दुसर्‍याच्या अधीन होऊ नये. दुसर्‍यावर अवलंबून राहू नये.

 

व्यापकपणा सांडू नये ।

पराधेन होऊ नये।

आपले वोझे घालू नये । कोणी येकासी ॥

न्याय मिळवण्यासाठी राजदरबारी जायचे असेल, तर साक्षीपुराव्याशिवाय जाऊ नये. आजच्या संदर्भात बोलायचे झाले, तर न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाण्याची वेळ आली, तर योग्य साक्षीपुरावे बरोबर घेऊन जावे. आपल्या जीवलगाबरोबर वाद करू नये. कोणाचाही घात करू नये. कोणाच्याही मागे त्यांच्यासंबंधी उणे बोलू नये. लोक तोंडावर स्तुती करतात पण, पाठ फिरली की त्याच्यासंबंधी उणे बोलतात. हा आपला नित्याचा अनुभव आहे. पुरुषांची बैठक असो वा महिलांचे महिला मंडळ असो. साधारणपणे जो किंवा जी गैरहजर असेल त्या व्यक्तीसंबंधी उणीदुणी चर्चा होते. समर्थ स्पष्टपणे सांगतात की, कोणाच्याही पाठीमागे त्याचे दोष, उणेपण, कमतरता याविषयी बोलू नये. धुम्रपान आणि उन्मत्त द्रव्याचे सेवन करू नये. एखादी व्यक्ती वाचाळ असून, टोचून बोलणारी असेल, तर अशा व्यक्तीशी मैत्री ठेऊ नये. अशा व्यक्ती केव्हा आपले अंतःकरण दुखवतील, दुश्चित करतील याचा नेम नसतो. खोट्याच्या वाटेला जाऊ नये. खोट्याचा कधी अभिमान नसावा. अशी ही उत्तम लक्षणे दासबोधाच्या समास २.२ मध्ये सांगितली आहेत. ती मिळवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा.

 

अपकीर्ति सांडावी । सद्कीर्ति वाढवावी ।

विवेके दृढ धरावी । वाट सत्याची ॥

असे सांगून समर्थांनी उत्तम गुण लक्षणांचा समास संपवला आहे.

 

- सुरेश जाखडी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@