धुळ्यासाठी १०० कोटींची सिंचन योजना

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2018
Total Views |


धुळे : धुळे जिल्ह्यासाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचा बळीराजा जलसंजीवनी योजनेत समावेश करण्यात आला असून या योजनेचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून ५६ कोटी तर राज्यसरकारचा ४४ कोटी रुपयांचा हिस्सा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात धुळे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेली बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीष महाजन, रोजगार हमी योजना व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खासदार डॉ.हिना गावीत, आमदार अमरिश पाटील, कुणाल पाटील, अनिल गोटे, डी.एस.अहिरे, काशिराम पावरा, शिरीष चौधरी, विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.गंगाथरण, महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने राज्य शासनाने दुष्काळाच्या सवलती लागू केल्या असून दुष्काळी परिस्थितीत राबवावयाच्या उपाययोजना प्रशासकीय यंत्रणेने संवेदनशील राहून राबवाव्यात. जिल्ह्यातील जलाशयांमध्ये केवळ ४४ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहनही त्यांनी केले. जिल्ह्यातील उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने ४२९ लक्ष रुपयांचा कृती आराखडा तयार केला असून यामध्ये ६७ गावांसाठी ७३ उपाययोजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील १० गावांसाठी ८ टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे, तर ५२ गावांसाठी ६० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील चाराटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वैरण विकास योजनेतंर्गत चारा बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. त्याच बरोबर गाळपेरा क्षेत्रावर चारा लागवड करण्यासाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. तसेच अपूर्ण व बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. त्याच बरोबर पिण्याच्या पाण्यासाठी चिमठाणे व ३५ गावे पाणीपुरवठा ग्रीड योजनेला मंजुरी देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@